Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशेला लावलेला दिवा तुमच्या वास्तूमध्ये धन, संपत्ती, ऐश्वर्याची उणीव भासू देत नाही!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2023 11:43 AM2023-06-23T11:43:40+5:302023-06-23T11:45:25+5:30
Vastu Tip: आपण रोज सायंकाळी दिवा लावतो, पण तो योग्य दिशेला लावला तर त्यामुळे लाभच लाभ होतील हे नक्की!
वास्तुशास्त्रामध्ये घरातील प्रत्येक वस्तू ठेवण्याची योग्य दिशा सांगितली आहे. असे म्हटले जाते की दिशेनुसार वस्तू ठेवल्याने वस्तू लाभते आणि वास्तूदेखील प्रसन्न राहते. ज्यामुळे घरात सुख, समृद्धी आणि शांती नांदते. वास्तुशास्त्रात दिवे ठेवण्याचे नियम सांगितले आहेत. घरामध्ये योग्य दिशेला ठेवलेला दिवा तुमचे भाग्य उजळवू शकतो असे म्हणतात.
हिंदू धर्मात प्रत्येक घरात सकाळ संध्याकाळ देवासमोर दिवा लावण्याचा नियम आहे. असे म्हणतात की देवासमोर दिवा लावल्याने आपले चित्त प्रसन्न होतेच शिवाय देव्हारा उजळून निघतो आणि देवाचा आशीर्वाद मिळतो, त्यामुळे वास्तू प्रसन्न राहते.
प्रत्येक शुभ कार्यात अग्निदेवाची पूजा केली जाते. दिवा लावल्याशिवाय कोणतीही पूजा पूर्ण होत नाही. रोज सकाळ संध्याकाळ आपणही देवाजवळ दिवा लावतो. त्याचबरोबर वास्तुशास्त्रात दिवे ठेवण्याचे काही नियम सांगण्यात आले आहेत.कोणते ते जाणून घेऊ.
- वास्तुशास्त्रानुसार घराच्या पश्चिम दिशेला दिवा ठेवणे सर्वात शुभ मानले जाते. पश्चिम दिशेला दिवा लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा राहते आणि सुख-समृद्धी येते असे म्हणतात. दिवा पश्चिम दिशेला का? तर या दिशेला सूर्यास्त होतो. सूर्याच्या पश्चात मिणमिणत्या ज्योतीने अंधारावर मात करणाऱ्या छोट्याशा दिव्याचे महत्त्व वाढते, म्हणून ती दिशा शुभ!
- दिवा जरी पश्चिम दिशेला ठेवला तरी वात पूर्व दिशेला ठेवावी. वर म्हटल्याप्राणे ती ज्योत सूर्याची प्रतिनिधि म्हणून जबाबदारी पार पडणार असते. म्हणून वात पूर्वेला ठेवावी, असे वास्तू तज्ञांचे मत आहे. पूजा करताना दिव्याची ज्योत पूर्व दिशेला ठेवल्याने कुटूंबातील व्यक्तीना दीर्घायुष्य लाभते असे म्हटले जाते. यासोबतच घरात सुख-शांती नांदते.
- वास्तुशास्त्रानुसार उत्तर दिशेला दिवा ठेवल्याने घरात धनाची कमतरता भासत नाही. शास्त्रात उत्तर दिशा ही कुबेराची दिशा मानली आहे. कुबेराची पूजा तसेच त्यांच्याप्रती कृतज्ञता म्हणून हा दिवा लावला जातो.
- वास्तुशास्त्रानुसार दिव्याची ज्योत दक्षिण दिशेला कधीही ठेवू नये. दक्षिण दिशा ही यमराजाची दिशा असल्याचे सांगितले जाते. दिव्याची ज्योत या दिशेला ठेवल्याने धनहानी होते.
- वास्तुशास्त्रानुसार पूजा करताना विशेष काळजी घ्यावी की तेलाचा दिवा नेहमी उजव्या बाजूला ठेवावा आणि तुपाचा दिवा नेहमी डाव्या बाजूला ठेवावा.
यासोबतच दिवा लावताना त्याच्या वातीचीही काळजी घेतली पाहिजे. एकाच काडीने तेलाचा व तुपाचा दिवा लावू नये!