Vastu Shastra: दिवसाची सुरुवात 'या' गोष्टींना पाहून होणार नाही याची काळजी घ्या; तरच दिवस चांगला जाईल!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2023 09:34 AM2023-03-28T09:34:00+5:302023-03-28T09:35:01+5:30

Vastu Shastra: दिवस छान जाण्यासाठी सुरुवात चांगली होणे महत्त्वाचे, ती सुरूवात चांगली व्हावी म्हणून या टिप्स!

Vastu Shastra: Be careful not to start the day looking at 'these' things; Only then will the day be good! | Vastu Shastra: दिवसाची सुरुवात 'या' गोष्टींना पाहून होणार नाही याची काळजी घ्या; तरच दिवस चांगला जाईल!

Vastu Shastra: दिवसाची सुरुवात 'या' गोष्टींना पाहून होणार नाही याची काळजी घ्या; तरच दिवस चांगला जाईल!

googlenewsNext

दिवस खराब गेला की त्याचे खापर फोडताना एक वाक्य आपण हमखास म्हणतो, 'आज सकाळी कोणाचे तोंड बघितले काय माहीत?' परंतु वास्तू शास्त्र सांगते, की सकाळी उठल्यावर केवळ व्यक्तीच नाही तर ठराविक वस्तूंचेही दर्शन टाळा. 

सकाळ प्रसन्नतेने झाली तर दिवस प्रसन्न जातो. यासाठी आपल्या पूर्वजांनी अन्य कोणत्याही गोष्टींचे दर्शन घेण्याआधी आपल्या हाताचे दर्शन घ्या असे सांगितले आहे. हाताचेच का? तर आपण हातांनी दिवसभर काम करतो. आपल्या हातांमध्ये श्रीकृष्ण, लक्ष्मी आणि सरस्वती या देवतांचा वास असतो. त्यांच्या कृपेने आणि त्यांच्या साक्षीने प्रत्येक काम चांगलेच घडावे यासाठी प्रभाते करदर्शन घ्यावे आणि जमिनीवर पाय ठेवण्याआधी तिला नमस्कार करावा असे आपले पूर्वज आपल्याला सांगत असत. आपण आताही या गोष्टीचे अनुसरण करू शकतो, त्याचबरोबर आपल्याला वास्तू शास्त्राने सांगितलेल्या गोष्टीही लक्षात ठेवल्या पाहिजेत. त्या पुढीलप्रमाणे-

आरसा : वास्तूनुसार सकाळी उठल्यावर आरशात तोंड पाहू नये. कारण सकाळी आपण आळसावलेले असतो. अशातच स्वतःला आळसावलेले पाहिले तर आळस आणखीनच अंगावर येऊ शकतो. यासाठी सकाळी उठल्यावर आरशात न पाहता आधी चेहरा पाण्याने स्वच्छ धुवा. मरगळ झटकून टाका आणि नंतर स्वतःला आरशात बघा.

खरकटी भांडी : शास्त्रानुसार जेवण झाल्यावर भांडी खरकटी ठेवू नयेत असे म्हणतात. म्हणून पूर्वीच्या काळी जेवण झाल्या झाल्या भांडी घासून टाकली जात असे. मात्र आता सगळेच जण व्यस्त जीवन शैलीमुळे ठराविक कामे वेळच्या वेळी करू शकतीलच असे नाही. यावर पर्याय म्हणून भांड्यांमध्ये पाणी घालून ठेवा आणि सकाळी सकाळी ती निदर्शनास पडणार नाही याची काळजी घ्या. त्यामुळे नकारात्म ऊर्जा निर्माण होऊन दिवस खराब जाऊ शकतो. तोंड धुवून ताजेतवाने होईपर्यंत खरकटी भांडी दिसणार नाहीत याची काळजी घ्या. 

बंद घड्याळ : वास्तूनुसार घरात कधीही बंद घड्याळ लावू नये. जर तुम्ही सकाळी उठून बंद घड्याळ पाहिले, तर त्यावर विसंबून तुमचा दिवस उशिरा सुरु होऊ शकतो. त्यामुळे अन्य कामांमध्ये दिरंगाई होऊ शकते आणि त्यामुळे तुमची चिडचिड होऊ शकते. म्हणून घरात बंद घड्याळ असेल तर ते आधी दुरुस्त करा किंवा त्याजागी नवे घड्याळ लावा, मात्र जुने घड्याळ वापरू नका!

आक्रमक चित्र : आपली बुद्धी डोळ्याला दिसणारी प्रत्येकी छबी डोक्यात साठवून ठेवते आणि ती प्रतिमा आणि त्याच्याशी संबंधित विचार दिवसभर घोळवत ठेवते. म्हणून सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना आपल्या डोळ्यासमोर प्रसन्न चित्राकृती असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. म्हणून अधिकतर लोक देवाचे, लहान बाळांचे, निसर्गाचे, फुलांचे चित्र आपल्या बेडरूम मध्ये लावणे पसंत करतात. वास्तुशास्त्राच्या दृष्टीने ती योग्य निवड मानली जाते. 

Web Title: Vastu Shastra: Be careful not to start the day looking at 'these' things; Only then will the day be good!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.