Vastu Shastra: वास्तूशास्त्रानुसार, अन्न फेकणे हा अन्नपूर्णेचा अपमान आणि दारिद्रयाला थेट आमंत्रणच!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2024 11:09 AM2024-06-10T11:09:05+5:302024-06-10T11:11:11+5:30

Vastu Tips: शक्तीच्या अनेक रूपांपैकी एक म्हणजे क्षुधाशांती करणारी अर्थात आपल्याला जेवू घालणारी अन्नपूर्णा रुष्ट होऊ नये म्हणून पाळा पुढील नियम!

Vastu Shastra: If Annapurna is insulted by you, then the house will destroy soon! | Vastu Shastra: वास्तूशास्त्रानुसार, अन्न फेकणे हा अन्नपूर्णेचा अपमान आणि दारिद्रयाला थेट आमंत्रणच!

Vastu Shastra: वास्तूशास्त्रानुसार, अन्न फेकणे हा अन्नपूर्णेचा अपमान आणि दारिद्रयाला थेट आमंत्रणच!

ताटावरून उठविणे, उठणे, ताट फेकून देणे हे अत्यंत वाईट असते. माणसाच्या हातून कळत नकळत काही चुका होत असतात, पण त्यांचे परिणाम मात्र त्रासदायक असतात. घरोघरी आढळणारी एक मोठी चूक म्हणजे अन्नाचा अपमान. एखादा माणूस जेवायला बसलेला असतो तेवढ्यात घरात किरकिर सुरू होते. पती-पत्नी, मुले किंवा कुणीतरी पाहुण्यापैकी अचानक नको ते विषय काढतात. शब्दाला शब्द वाढत जातात. भांडणे सुरू होतात व कुणीतरी रागाने जेवणावरून उठून जातो. अन्न तसेच राहते. अन्नाचा म्हणजे अन्नपूर्णेचा अपमान होतो. नंतर घराण्याला उतरती कळा लागते. तसे होऊ नये, यासाठी पुढील नियमांचे पालन करा. 

■ घरचा कर्ता पुरुष अथवा स्त्री जेवायला बसले असताना त्यांना घरातील कोणत्याही अडचणी सांगू नका.त्यांना शांतपणाने चार घास खाऊ द्या.

■ शत्रू जरी काही खात-पीत असेल, जेवत असेल तर त्याला सुखाने खाऊ द्या. काहीही बोलू नका.

■ अन्नावरून रागाने उठणारी व्यक्ती अथवा त्याला तसे करण्यास भाग पाडणारा कुणीही असो, दोघांनाही अन्नाचा शाप लागतो.

■ एखाद्याचा तोंडचा घास काढून घेणे हे शापाला आमंत्रण देते.

■ मतभेद वगैरे असतील तर नंतरही त्यावर बोलता येते, पण समोर अन्न असताना चुकूनही तोंडातून अपशब्द काढू नयेत. तसेच कुणाला कोणता सल्लाही देऊ नये.

■ घर असो वा हॉटेल, लग्न, मुंजीचा कार्यक्रम अथवा कोणताही समारंभ असो, लोकांनी शांत मनाने जेवण केले तरच तो आशीर्वाद ठरतो व रागारागात कसे तरी चार घास पोटात ढकलल्यास तो अन्नपूर्णेचा अपमान होतो व वेळ येताच त्याचे अनिष्ट परिणाम जाणवू लागतात.

■यासाठी जेवण्यापूर्वी ताटाभोवती पाणी फिरवून चित्राहुती काढली जाते व काही शिते ज्ञात अज्ञात जीवासाठी काढून ठेवण्यासाठी प्रथा आहे.

■ मंगलकार्याच्यावेळी ताटाभोवती रांगोळी काढली जाते.

■ अन्नपूर्णा देवी प्रसन्न राहावी. संपूर्ण कुटुंबाचे रक्षण व्हावे, घर धनधान्याने भरलेले असावे, सर्वांची भरभराट व्हावी हा त्या मागील हेतू असतो.

■ अन्न शिजविणारी अथवा वाढणारी किंवा हॉटेलात सप्लाय करणारे हातात अन्न असताना असणारी कोणतीही व्यक्ती असो त्यांचे चांगले, वाईट विचार हातात धरलेल्या अन्नात उतरतात त्यासाठी मन शांत नसताना अथवा राग, रुसवे तसेच मन प्रक्षुब्ध असेल तर शक्यतो खाणे-पिणे करू नये.

■ मनुष्यप्राणी राबतो पोटासाठी पण ते अन्न जर तुम्ही शांतपणे खात नसाल तर त्या राबण्याचा उपयोग काय? अन्नाच्या नासाडीने अन्नपूर्णेचा अपमान होत असेल तर त्याचे अनेक दोष निर्माण होतात व ते पुढे त्रासदायक ठरतात. हे दोष दूर व्हावेत यासाठी पंचमहायज्ञ रोज करावा

■ 'अतिथी देवो भव' ही म्हणही त्यासाठीचा वापरतात.

■ कावळे, चिमण्या, कबुतरे, कुत्री, मांजरे, गायी व इतर मुक्या प्राण्यांना खाऊ घातल्यास आपल्या कमाईला ऊर्जितावस्था येते. ज्यावेळी संकेत येतात त्यावेळी कुणाच्या तरी रूपाने देव आपले रक्षण करीत असतो. अपघात होत नाहीत व झालाच तरी त्यातून सहीसलामत सुटका होते. 

■ अन्नदान केल्याने अनेक दोष नष्ट होतात, राहती वास्तूही शांत राहते. स्वतःची अध्यात्मिक शक्तीही वाढते.

Web Title: Vastu Shastra: If Annapurna is insulted by you, then the house will destroy soon!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :foodअन्न