Vastu Tips: घरात ‘या’ दिशेला ठेवा विशेष वस्तू; धनदेवता कुबेर, लक्ष्मी देवीची होईल कृपा, पैसे कमी पडत नाही!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2022 11:07 AM2022-03-02T11:07:51+5:302022-03-02T11:08:55+5:30
Vastu Tips: घरात काही वस्तू किंवा गोष्टी ठराविक दिशेला ठेवणे शुभलाभदायक आणि फायदेशीर मानले जाते. जाणून घ्या...
जगण्यासाठी पैसा ही अतिशय आवश्यक, महत्त्वाची आणि गरजेची बाब आहे. दोन वेळेचे अन्न आणि अंगावर पुरेसे कपडे एवढ्याशा गोष्टींसाठीही काही प्रमाणात पैसा हाताशी असणे आवश्यक ठरते. माणूस पैसे कमविण्यासाठी नाना प्रकारची कामे, उद्योग करत असतो. मात्र, पैसा हातात टिकतोच असे नाही. कितीही कमावला तरी पैसा कमीच पडतो, अशी अनेकांची अनुभूती असते. ज्योतिषशास्त्रात पैसा टिकून राहावा, तो वृद्धिंगत व्हावा, यासाठी काही उपाय सांगितले जातात. ज्योतिषशास्त्राचीच एक शाखा मानल्या गेलेल्या वास्तुशास्त्रातही याबाबत काही उल्लेख आढळून येत असल्याचे सांगितले जाते. (Vastu Tips)
वास्तुशास्त्रात घराची रचना, दिशा यांना अनन्य साधारण महत्त्व असल्याचे म्हटले जाते. घरातील संरचनेमुळे वास्तुदोष निर्माण होत असेल, तर त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर होऊ शकतो, अशी मान्यता आहे. त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार घरातील गोष्टी ठेवणे शुभ आणि लाभदायक मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार घराच्या उत्तर आणि उत्तर-पूर्व दिशेला विशेष महत्त्व आहे. या दोन्ही दिशा थेट आर्थिक समृद्धीशी संबंधित आहेत. तसेच या दोन्ही दिशांना वास्तुदोष असेल, तर धन आणि धनाशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते. याशिवाय घराच्या या दिशांचा चुकीचा वापर केल्यास आर्थिक आघाडीत बिघाडी येऊ शकते, असे म्हटले जाते. अशा परिस्थितीत घराच्या दिशांचा योग्य वापर कसा करायचा, याची माहिती असणे आवश्यक आहे.
उत्तर दिशेचा स्वामी कुबेर आहे
उत्तर दिशेचा स्वामी कुबेर आहे, जो धन आणि समृद्धीचा देवता आहे. अशा वेळी घराची तिजोरी या दिशेला ठेवावी, कारण असे केल्याने घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही. वास्तुशास्त्रानुसार घराच्या उत्तर दिशेला निळ्या रंगाचा पिरॅमिड ठेवा. या दिशेला निळ्या रंगाचा पिरॅमिड ठेवल्याने संपत्तीचे भांडार कधीच रिकामे होत नाही. शक्य असल्यास, या दिशेने भिंतींचा रंग देखील निळा करा, असे सांगितले जाते.
काचेच्या मोठ्या भांड्यात चांदीची नाणी
काचेचे मोठे भांडे नेहमी उत्तर दिशेला ठेवावे. तसेच त्यात चांदीची नाणी टाकून ठेवावीत. असे केल्याने लक्ष्मी देवीची कृपा कायम राहते, अशी मान्यता आहे. याशिवाय, घराच्या पूर्व-उत्तर दिशेला गणपती बाप्पा आणि देवी लक्ष्मीच्या मूर्ती ठेवाव्यात. तसेच दिवसातून एकदा येथे दिवा लावावा. याशिवाय या ठिकाणच्या स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी. असे केल्याने घरात पैशाची कमतरता भासणार नाही, असे सांगितले जाते.
तुळशीचे रोप आणि लक्ष्मीची कृपा
तुळस हा तर हिंदू संस्कृतीचा जीव की प्राण. तुळशीचे धार्मिक, अध्यात्मिक, वैज्ञानिक, आयुर्वेदिकदृष्ट्या अतिशय महत्त्व आहे. घराच्या उत्तर दिशेला तुळशीचे रोप लावणे फायदेशीर ठरते. त्यामुळे घरात आर्थिक सुबत्ता राहते, अशी मान्यता आहे. मात्र, तुळशीचे रोप लावताना त्यासंदर्भातील नियम पाळणे गरजेचे असते. तसेच याशिवाय घराच्या उत्तर दिशेला पाण्याची व्यवस्था ठेवावी, असे म्हटले जाते. दरम्यान, सदर माहिती मान्यतांवर आधारित असून, वास्तुशी निगडीत गोष्टींसंदर्भात योग्य तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.