Vastu Shastra: कृष्णाची सुरेल बासरी तुमच्या बिघडलेल्या वैवाहिक नात्यावर घालेल हळुवार फुंकर; वापरा 'या' वास्तू टिप्स!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2022 04:49 PM2022-11-02T16:49:06+5:302022-11-02T16:49:37+5:30
Vastu Shastra: वैवाहिक नात्यात अडचणी येत असतील तर अनेक वास्तू तज्ञ बासरीचा वापर करा असे सुचवतात, तो कसा करायचा जाणून घ्या!
मन कितीही अशांत असो, जेव्हा बासरीवादन कानावर पडते, तेव्हा फार मनाला अपार शांतता मिळते. म्हणून तर भगवान श्रीकृष्ण जेव्हा जेव्हा बासरी वादन करत, तेव्हा समस्त सृष्टीची समाधी लागत असे. बासरीला भगवान श्रीकृष्णांनी ओठी लावले, तेव्हापासून या वाद्याला अतिशय महत्त्व आले. बासरीचे अस्तित्त्व हे श्रीकृष्णाच्या अस्तित्त्वाची खूण मानली जाते. म्हणून वास्तुशास्त्राने घरात बासरी लावावी तसेच बासरीवादन ऐकावे असे सुचवले आहे. त्यामागील आणखी कोणती कारणे आहेत, ते पाहूया.
>> बासरीला अतिशय पवित्र आणि पूजनीय मानले जाते.
>> बासरीचे सूर सकारात्मक वातावरणनिर्मिती करतात आणि वातावरणात विशिष्ट प्रकारची प्रसन्नता व्यापून राहते.
>> बासरीचे सूर मानवी स्वरांशी तसेच पशू पक्ष्यांच्या आवाजाशी हुबेहूब मेळ खातात, म्हणूनही अनेक संगीत प्रकारांमध्ये बासरीची धून समाविष्ट केलेली असते.
>> बांबूचे झाड जितके महत्त्वाचे आहे, तितकेच महत्त्व बांबूपासून बनलेल्या बासरीलादेखील आहे.
>> ज्यांना नोकरीच्या किंवा वैयक्तिक जीवनात अनेक अडचणी असतील, त्यांनी घरात बासरी लावावी असे म्हणतात.
>> ज्यांना अपार कष्ट करूनही नोकरी, व्यवसायात यश मिळत नसेल, अशा लोकांनी आपल्या कार्यस्थळी धातूमिश्रित बासरी लावावी. त्याने फायदे होतात.
>> नवीन व्यवसाय सुरू करताना तिथल्या वास्तूच्या कोणत्याही एका भिंतीवर बासरीची एक जोडी लावावी. त्यामुळे कार्यात अडचणी येत नाहीत.
>> ज्या घरात बासरी असते, तिथे प्रेमाला कमतरता नसते. म्हणून वैवाहिक जीवनातील अडचणींवर उपाय म्हणूनदेखील घरात बासरीचा समावेश करा, असे सांगितले जाते.