Vastu Shastra: स्वयंपाकघरातील 'या' तीन गोष्टी कधीही संपू देऊ नका, अन्यथा वास्तूवर होईल दुष्परिणाम!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2024 04:10 PM2024-01-03T16:10:50+5:302024-01-03T16:11:24+5:30
Vastu Shastra: 'घर भरलेले असावे' असा आशीर्वाद थोरा मोठ्यांकडून दिला जातो, घरात सुबत्ता नांदावी म्हणून या वास्तू टिप्स देखील फॉलो करा!
घरात काय आहे, काय नाही याकडे गृहिणींचे बारीक लक्ष असते. मात्र नोकरी-व्यवसायाच्या गडबडीत किंवा इतर काही कामांच्या नादात स्वयंपाक घराकडे दुर्लक्ष होऊ शकते. परंतु वास्तू शास्त्रानुसार काही गोष्टींनी तळ गाठणे हे वास्तूच्या दृष्टीने हितावह ठरत नाही. त्यामुळे घराची आर्थिक स्थिती डळमळीत होऊ शकते. कारण या वस्तू केवळ अन्न धान्य नाही तर सुबत्तेचेही लक्षण मानले जाते.
गृहिणींचा सगळ्यात जास्त वावर असतो तो स्वयंपाकघरात. त्यामुळे वास्तुशास्त्र सांगते, की स्वयंपाक घरातील वस्तूंची नियमावली यथायोग्यपणे सांभाळली असेल तर वास्तू दोष निर्माण होत नाहीत. याउलट स्वयंपाकघरातील गोष्टींमुळे वास्तू दोष निर्माण झाला तर त्याचा परिणाम संपूर्ण कुटुंबाला भोगावा लागतो. म्हणून अत्यंत सावधतेने घराचा डोलारा सांभाळावा लागतो. यात कोणत्या चुका करायच्या नाहीत ते जाणून घेऊया.
तांदूळ :
तांदूळ हा भारतीय आहाराचा अत्यंत महत्त्वाचा घटक मानला जातो. त्यामुळे मुख्यतः भारतीय घरांमध्ये तांदूळ असतोच. तांदळाला धार्मिक आणि वास्तू शास्त्राच्या दृष्टीनेही अतिशय महत्त्व आहे. लग्नात अक्षता म्हणून, नववधूला माप ओलांडताना तसेच आशीर्वादाच्या अक्षता म्हणूनही तांदुळच दिला जातो. वास्तुशास्त्रानुसार तांदूळ व्यक्तीच्या शुक्र ग्रहाशी अर्थात सुबत्तेशी संबंधित असतो. अशा स्थितीत जर तुमच्या स्वयंपाकघरातील तांदूळ संपला तर त्यामुळे शुक्रदोष होतो ज्यामुळे तुमच्या भौतिक सुख आणि ऐश्वर्यामध्ये घट होते.
हळद :
हळद हा भारतीय स्वयंपाकघरातील मुख्य मसाला आहे. आयुर्वेद, धर्मशास्त्र, वास्तुशास्त्र अशा अनेक दृष्टीने हळदीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. वास्तूनुसार, जर तुमच्या स्वयंपाकघरात हळद पूर्णपणे संपुष्टात आली असेल, तर तुमच्या गुरु दोष निर्माण होऊन वास्तू दोष निर्माण होऊ शकतो. ज्यामुळे तुमच्या आर्थिक स्थितीत अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे डब्यातली हळद पूर्णपणे संपण्याआधी ती नव्याने भरून ठेवा. तसेच हळद कधीही शेजाऱ्यांकडे मागू नका किंवा कोणाला देऊ पण नका. त्यामुळे कर्जबाजारी होण्याची शक्यता असते.
मीठ :
वास्तुशास्त्रात मिठाला फार महत्त्व आहे. मीठ हे समुद्रातून निघालेले असल्यामुळे लक्ष्मीचा भाऊ म्हणूनही ते संबोधले जाते. म्हणून आपण मीठ सांडू देत नाही. तसेच मिठाशिवाय स्वयंपाक अळणी होतो आणि जास्त पडले तर खारट होतो. त्यामुळे मीठ प्रमाणात असलेच पाहिजे. लादी पुसण्याचा पानात मीठ टाकले असता समृद्धी येते असे वास्तू शास्त्र सांगते. म्हणूनच की काय, लक्ष्मी पूजेत केरसुणी बरोबर मिठाचीही पूजा केली जाते. म्हणून घरात मीठ संपू देऊ नका, त्याआधीच नवी पुडी विकत आणा आणि सायंकाळी कधीही मिठाची देवाण घेवाण करू नका, अन्यथा आर्थिक स्थिती खालावते, असे वास्तू शास्त्र सांगते.