Vastu Shastra: वाहत्या पाण्याची चित्र घरात लावणे म्हणजे आर्थिक संकट ओढावून घेणे; सविस्तर वाचा!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2024 01:46 PM2024-05-29T13:46:11+5:302024-05-29T13:46:30+5:30
Vastu Shastra: घरात कोणती चित्र, तसबिर लावावी, त्याचा वास्तूवर काय परिणाम होतो, याचा वास्तू शास्त्रात बारकाईने अभ्यास झाला आहे; तुम्हीही जाणून घ्या!
घर सजवण्यासाठी आपण सुंदर, सुबक, मनोवेधक चित्रांची निवड करतो. भिन्न रंगसंगतींनी घराची शोभा वाढवतो. परंतु घर सजवण्याच्या नादात आपण अनेकदा अशी चित्रे लावतो, ज्या डोळ्यांना छान दिसतात, परंतु वास्तुशास्त्राच्या दृष्टीने त्या घरासाठी बाधक असतात. म्हणून घरात सकारात्मक चित्रांबरोबरच वास्तुशास्त्राला अनुकूल ठरतील, अशा चित्रांची निवड करावी.
वास्तुशास्त्र आपल्या परिचयाचे, अभ्यासाचे नसेलही, परंतु चित्र निवड करताना त्याच्या पडसादाचा सामान्य विचार, तर्क आपल्याला नक्कीच करता येईल. म्हणून युद्धाचे, प्रसंग, वाळवंट, गरिबी, काटेरी झुडपं, जंगली श्वापदे यांची चित्र ठेवू नयेत. तसेच निसर्ग चित्रांचीही तार्किक बाजू लक्षात घेऊन निवड करावी. जसे की झरा, धबधबा, समुद्र, नदी हे देखावे निसर्गात जाऊन पाहणे जितके सुखावह ठरतात, तेवढे घरातल्या चार भिंतींच्या तसबिरीत आकर्षक वाटत नाहीत. त्यातही वास्तुशास्त्राच्या दृष्टीने पाहिले, तर त्याचे वाईट परिणाम लक्षात येतात.
१) कारंजे किंवा धबधब्याचे चित्र दिसायला सुंदर असते, परंतु असे मानले जाते की जसे पाणी वाहते तसेच आपले पैसे व्यर्थ कामांमध्ये खर्च होऊ शकतात. पैसा पाण्यासारखा वाहत जातो.
२. जलप्रपात किंवा कारंजेचे चित्र वास्तु शास्त्रज्ञांना विचारल्यानंतरच लावावे. ईशान्येकडील कोन निश्चित करण्यासाठी असे चित्र बर्याचदा वापरले जाते, परंतु अन्य कोठे हे चित्र लावताना सल्ला जरूर घ्यावा.
3. काही लोक मत्स्यालय ठेवतात किंवा त्या जागी माशाचे चित्र लावतात. परंतु तेही उचित जागेवर नसेल तर त्याचे अपाय आपल्या वास्तूवर पडतात. म्हणून कोणतीही गोष्ट घेताना ती केवळ शोभेची म्हणून वापरू नका, तर त्याचे घरावर, आरोग्यावर काय पडसाद पडतील, याची माहिती करून घ्या आणि मगच लावा.