Vastu Shastra: स्वयंपाकघरात केलेले 'हे' १० बदल तुमच्या किचनला देतील फ्रेश आणि न्यू लूक!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2023 10:55 AM2023-11-07T10:55:10+5:302023-11-07T10:55:28+5:30

Vastu Shastra: किचन हा घरातला कोपरा बायकांसाठी अपरिहार्य असतो, तिथला वावर कंटाळवाणा न होता आनंददायी करायचा असेल तर या टिप्स जरूर वापरून बघा!

Vastu Shastra: These 10 Kitchen Tips Changes Will Give Your Kitchen A Fresh And New Look! | Vastu Shastra: स्वयंपाकघरात केलेले 'हे' १० बदल तुमच्या किचनला देतील फ्रेश आणि न्यू लूक!

Vastu Shastra: स्वयंपाकघरात केलेले 'हे' १० बदल तुमच्या किचनला देतील फ्रेश आणि न्यू लूक!

>> कांचन दीक्षित 

१. किचनची रचना बदलून पहा.स्वयंपाक करताना रोज तेच दृश्य दिसलं की कंटाळा येणारच. वस्तू, भांडी, डबे यांची स्वच्छता आणि आवराआवर  करताना जागा बदलून पहा. एखादं लहानसं रोप लावा,उत्साह देणारे सुविचार लिहा. फॅमिली फोटो दिसेल असा ठेवा. सर्वात महत्वाचं म्हणजे नको असलेल्या जास्तीच्या वस्तू समोर ठेऊ नका, समोर जितक्या वस्तू जास्त दिसतात तेवढा थकवा येतो. लेबल लावा, एकसारख्या वस्तू शेजारी ठेवा, सगळं कॅटेगरी प्रमाणे लावा,उदा. मसाले सगळे एका ठिकाणी,डाळी एका कप्प्यात शेजारी, इ... 

२. आपण कपडे जुने झाले की बदलतो नविन आणतो पण ब-याचदा भांडी तीच तीच वापरतो पोचे पडलेली,काळी झालेली थोडक्यात एक्सपायरी डेटसुध्दा निघून गेलेली भांडी चालताहेत तोवर चालवत असतो,त्यामुळे किचनमधे कंटाळा येतो. अधूनमधून नविन खरेदी केली की स्वयंपाकाला उत्साह येतो. तवा,पोळपाट लाटणं,कढई,चाकूसुरी सोलाणं बदलून पहा.लहानपणी शाळेचं नविन दप्तर सॅक आणलं की शाळेत जायला उत्साह वाटायचा तसंच आहे हे!

३. उत्साहाच्या वेळा निवडा.स्वयंपाक करण्यासाठी साधारण उत्साह कधी असतो ते पहा. उदा. सकाळी दहाच्या आत स्वयंपाक करायला उत्साह वाटत असेल तर सकाळचा पूर्ण आणि संध्याकाळचा ८०% स्वयंपाक तेव्हाच करुन ठेवा. थोडं फ्रिजमधे नियोजन करा. संध्याकाळी उत्साह वाटत असेल तर हाच नियम सकाळसाठी करा आधीच तयारी करुन ठेवा.

४.  स्वयंपाकात दोन कामं असतात एक प्रत्यक्ष स्वयंपाक आणि दुसरं आवराआवर स्वच्छता. सगळा स्वयंपाक झाल्यावर स्वच्छतेचा कंटाळा येतो, यावर उपाय म्हणजे एक काम कुकिंग आणि एक काम क्लिनिंग असं करा.  उदा.भाजी केली, थोडी भांडी धुतली,पोळ्या केल्या ओटा आवरला,असं आलटून पालटून काम केल्यानं कंटाळा कमी होईल शिवाय पसारा पाहून दडपण येणार नाही.

५. स्वयंपाक करताना सोशल मिडियापासून लांब रहा,सलग तास दोन तास काम आटोपून मगच फोन हातात घ्या. यानं कामं पसरणार नाहीत,एखादं काम रटाळ झालं की ते काम करायचा उत्साह संपतो.

६. लहान मुलं असतील तर ती बिझी असताना किंवा दुसरं कुणी त्यांना सांभाळत असेल तेव्हा स्वयंपाक करुन फ्री व्हा,मुलांना सांभाळत थांबत थांबत स्वयंपाक करायचा कंटाळा येतो.दोन कामं एकत्र केल्याचा हा थकवा असतो.

७. स्वयंपाक करताना छान पोशाख करा. वाटल्यास आवडीचं परफ्युम लावून हे काम सुरु करा,कंटाळा पळून जाईल. छान वाद्य संगीत लावा,यु ट्युबवर स्वयंपाक करताना लावण्याचे खास म्युझिक व्हिडिओसुध्दा आहेत.

८. स्वयंपाकाच्या तयारीसाठी आणि स्वच्छतेसाठी मदत घ्या. प्रत्यक्ष स्वयंपाकापेक्षा बाकीची मदत महत्वाची असते,कामाचा ताण आणि थकवा यानं निम्मा होतो.

९.साध्या सोप्या नविन रेसिपी अधूनमधून  करून पहा यानं नाविन्य वाटेल. आळस आणि थकव्यानं आलेला कंटाळा यातला फरक समजून मेनू ठरवा,साध्या सोप्या वन डिश मील रेसिपीज जास्त कंटाळा आला की करण्यासाठी राखून ठेवा,हुकुमाचे एक्के आधीच वापरुन संपवू नका.

१०. स्वयंपाकघर आणि स्वयंपाक याविषयी कृतज्ञतेचे विचार ठेवा,त्याचे सकारात्मक फायदे आठवा. आठवड्यातून /महिन्यातून हक्कानं सुट्टी घ्या. इतरांनाही तिथे प्रयोग करु द्या. या सुट्टीनं फ्रेश होऊन पुन्हा कामाला लागण्याचा उत्साह मिळेल. प्रयत्न केले तर स्वयंपाकातही मेडिटेशन सापडेल.

Web Title: Vastu Shastra: These 10 Kitchen Tips Changes Will Give Your Kitchen A Fresh And New Look!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.