Vastu Shastra: कुटुंबातले कलह दूर करायचे आहेत? दारातले पायपुसणे आणि त्यासंबंधी टिप्स फॉलो करा!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2023 12:16 PM2023-12-14T12:16:21+5:302023-12-14T12:18:58+5:30
Vastu Shastra: पायपुसणे ही अतिशय सामान्य बाब, पण वास्तुशास्त्राने त्याचाही संबंध कौटुंबिक सुखाशी कसा जोडलेला आहे ते जाणून घ्या!
घराच्या प्रवेश द्वाराजवळ पायपुसणे ठेवलेले असते. घरात प्रवेश करण्याआधी चपला घराबाहेर काढून पाय पुसून घरात प्रवेश करणे अपेक्षित असते. या पायपुसणीमुळे घरात केवळ धुळीला, घाणीला प्रतिबंध होतो असे नाही तर त्यामुळे घराबाहेरची नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करण्यासही प्रतिबंध होतो.
पूर्वीच्या काळी बाहेरून येणाऱ्यांसाठी अंगणात पाय धुण्याची व्यवस्था असे. आजही मंदिरात जाताना पाय धुवून आत प्रवेश करा अशी सूचना आढळते. या सूचनेचा संबंध केवळ स्वच्छतेशी नाही तर मानसिक आरोग्याशीदेखील आहे. घराबाहेर आपण नानाविध अनुभव घेतो, त्यात राग, लोभ, क्रोध, त्वेषाची भावना अधिक असते. या भावनेसह घरात प्रवेश केला असता घरचे वातावरण गढूळ होऊ शकते. म्हणून प्रवेश करताना पायावर पाणी घेतल्याने थेट मेंदूपर्यंत संवेदना पोहोचतात आणि मनातील भावभावनांवर नियंत्रण मिळवून घरात प्रवेश केला जात असे. त्यामुळे घराची आणि मनाची स्वच्छता अबाधित राहत असे.
मात्र आताच्या वसाहतीत अंगण आणि अशी व्यवस्था ठेवणे कठीण म्हणून त्याला पर्याय असतो पायपुसणीचा! दिसायला केवळ कापडाचा तुकडा असलेले हे फडके आपले भाग्य कसे पालटते ते पाहू! यासाठी वास्तुशास्त्राने केलेल्या सूचना पुढीलप्रमाणे-
>> घराच्या मुख्य दरवाजाशी अंथरलेले पायपुसणे हलक्या हिरव्या रंगाचे असावे मात्र काळ्या किंवा गडद रंगाचे असू नये. रंग पाहून घरात प्रवेश करताना मन प्रफुल्लित झाले पाहिजे. यासाठी फिकट रंगाचा वापर करावा. पायपुसणी वरचेवर बदलावी. तसे करणे आरोग्याच्या आणि वास्तूच्या दृष्टीने हिताचे असते. तसेच त्यामुळे नकारात्मक ऊर्जा टिकून राहत नाही आणि घरात येणाऱ्या लक्ष्मीला अडथळा निर्माण होत नाही.
>> घरातील नकारात्मक शक्तींचा नाश करण्यासाठी पायपुसण्याखाली तुरटी ठेवावी. तुरटी पाण्यात फिरवली असता जसे पाणी शुद्ध होते तसे पायपुरण्याखाली तुरटी ठेवली असता घरातले वातावरण स्वच्छ, शांत आणि सकारात्मक राहते. त्यामुळेदेखील घरात येणाऱ्या मिळकतीचा अर्थात पैशांचा योग्य विनिमय होतो आणि घरात पैसा टिकतो.
>> कुटुंबातील कलह दूर करण्यासाठी कापराच्या वड्या कापडात बांधून पायपुसणीच्या खाली ठेवा. कापरामुळे वातावरण शुद्धी होते. नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरातील कलह मिटतात. ज्या घरात कलह कमी होतात तिथे लक्ष्मी दीर्घकाळ मुक्काम करते!
>> घराचा उंबरठा तुटला असेल तर तो ताबडतोब दुरुस्त करावा. त्याला भेग पडलेली असणे अशुभ मानले जाते. उंबरठा सुयोग्य स्थितीत असावा आणि त्याला लागूनच आयताकृती पायपुसणे टाकावे, असे वास्तू शास्त्र सांगते.
या छोट्याशा पण उपयुक्त टिप्स फॉलो केल्या असता आर्थिक गणिते सुधारतील आणि वास्तू आनंदी होईल हे नक्की!