Vastu Shastra: तुळशी पूजनाचा काय उपयोग? त्यामुळे लक्ष्मी आणि विष्णुकृपा कशी होते, जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2023 06:44 PM2023-01-19T18:44:24+5:302023-01-19T18:44:52+5:30

Vastu Tips: तुळशीचे अस्तित्त्व आपल्या वास्तूसाठी खूप लाभदायक असते, त्याचे अध्यात्मिक फायदे आहेत तसेच आयुर्वेदिक फायदेही आहेत, वाचा!

Vastu Shastra: What is the use of Tulsi Pujan? So know how Lakshmi and Vishnu grace! | Vastu Shastra: तुळशी पूजनाचा काय उपयोग? त्यामुळे लक्ष्मी आणि विष्णुकृपा कशी होते, जाणून घ्या!

Vastu Shastra: तुळशी पूजनाचा काय उपयोग? त्यामुळे लक्ष्मी आणि विष्णुकृपा कशी होते, जाणून घ्या!

googlenewsNext

बहुगुणी व्यक्तिमत्त्व सर्वांनाच आवडते. त्याप्रमाणे 'तुळस' देखील बहुगुणी आहे, म्हणूनच ती भगवान महाविष्णूंना, विठोबाला, जगन्नाथाला, श्रीकृष्णाला अतिशय प्रिय आहे. तुळस हे लक्ष्मीचेच रूप. तुळशीची पूजा केली, की लक्ष्मी प्रसन्न होणार आणि लक्ष्मी प्रसन्न झाली, की लक्ष्मीपतींची कृपादृष्टी नक्कीच होणार. 

तुळशीपूजनाचा उपयोग काय?
निरामय आरोग्यासाठी नित्यसेवन करावी अशी वनस्पती. तिचे महात्म्य एका श्लोकात दिले आहे,

तुलसीकाननं चैव गृहे यस्यावतिष्ठति।
तद्गृहं तीर्थभूतं हि नायांति यमकिंकरा।।

म्हणजे, ज्या घरात, दारात तुळशीचे रोप फोफावले असते, बहरले असते, असे घर म्हणजे प्रत्यक्ष तीर्थच आहे. अशा घरात यमाचे दूत म्हणजे रोग, रोगजंतू येत नाहीत. तुळशीचा गंध वाऱ्याने जिथपर्यंत जोतो, तिथपर्यंतच्या दाही दिशातील प्रदेश शुद्ध होतो. रोगजंतुरहित होतो. तुळशीच्या आसपासची दोन मैलांची जागा गंगाजलाइतकी शुद्ध व पावन होते. हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाले आहे. 

पुण्यातील तुळशीचे जंगल 

डेक्कन जिमखाना कॉलनी वसवली, त्यावेळी भांडारकर संशोधन मंदिराच्या जवळच्या कॅनॉलच्या बाजूला मलेरियाची मोठ्या प्रमाणात साथ होती. त्यावर काय उपाय करावा, हा नगरपालिकेपुढे मोठा प्रश्न होता. त्यावेळी सुप्रसिद्ध वैद्य कै. गणेशशास्त्री नानल यांनी त्या बाजूला तुळशी लावल्यास मलेरिया नष्ट होईल, अशी सूचना केली व पुणे नगरपालिकेने तुळशीचे रानच्या रान लावले. काही काळातच मलेरिया त्वरेने नष्ट झाला, असा किस्सा श्रीम. सुधा धामणकर लिखित 'का, कशासाठी?' या पुस्तकात आढळतो.

तुळशीचे तीर्थ म्हणजे संजीवनीच!

तुळशी दुसरी संजीवनीच आहे. तिचे नित्य सेवन व्हावे, म्हणून आपल्या पूर्वजांनी तीर्थात तुळशीची पाने टाकून तुळशीउदक प्राशन करण्याची सवय लावून दिली. कारण, तुळशीची पाने टाकलेले तीर्थ नियमित प्राशन करणाऱ्याला ताप व मलेरिया होणार नाही. तुळशीच्या काढ्यामुळे लगेच घाम येऊन ताप उतरतो. घराजवळ तुळशीचे जंगल असेल, तर तिथे वीज पडू शकत नाही, असंही मानतात. आजही ग्रामीण भागात घराबाहेर तुळशी वृंदावन आढळते.

शहरातील फ्लॅट सिस्टीममध्ये किंवा छोट्या घरांमध्ये तुळशी वृंदावन शक्य नसले, तरी खिडकीत शोभेच्या रोपांबरोबर तुळशीचे रोप आवर्जून लावले पाहिजे. कारण ते `नॅचरल फिल्टर' आहे.

तुळशी माहात्म्य सांगावे, तेवढे थोडेच. त्याचे वैज्ञानिक आणि आध्यात्मिक फायदे आहेतच. परंतु, हेतू, स्वार्थ बाजूला ठेवून एखाद्या सायंकाळी तुळशीजवळ दिव्याची मंद ज्योत तेवताना बघा, अंतरीचा दिवा प्रज्वलित झाल्यावाचून राहाणार नाही. म्हणूनच तर, तिन्ही सांजेला दिवा लागला, की आपण 'शुभंकरोति कल्याणम्' ही प्रार्थना करतो. त्यात तुळशीचे महत्त्व अधोरेखित करताना म्हटले आहे, 

दिवा लावला देवापाशी, उजेड पडला 'तुळशीपाशी' (काही जण विष्णूपाशी असेही म्हणतात, मात्र आशय तोच!)
माझा नमस्कार, सर्व देवा तुमच्या पायापाशी।

Web Title: Vastu Shastra: What is the use of Tulsi Pujan? So know how Lakshmi and Vishnu grace!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.