Vastu Tips : मनी प्लांटचे नियम पाळले नाहीत, तर पैसा मिळण्याऐवजी पाण्यासारखा वाहत जाईल!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2022 01:13 PM2022-05-05T13:13:46+5:302022-05-05T13:14:12+5:30
Vastu Tips : तुम्ही निसर्गाची काळजी घ्या, निसर्ग तुमची काळजी घेईल.
वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये झाडे लावणे खूप चांगले मानले जाते. घरामध्ये हिरवी रोपे ठेवल्याने सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह मोठ्या प्रमाणात वाढतो, ज्यामुळे सुख-समृद्धी वाढते. अशा अनेक वनस्पती सांगितल्या आहेत, ज्या लावल्याने सौभाग्य वाढते आणि आनंद मिळतो. यापैकी एक म्हणजे मनी प्लांट! मनी प्लांटचा वापर बहुतेक घरांमध्ये दिसतो. पण मनी प्लांट लावताना वास्तुशास्त्राच्या नियमांचे पालन होणेही गरजेचे आहे. कारण या रोपट्याचा संबंध थेट आर्थिक बाबीशी आहे.त्याची नीट निगा राखली गेली नाही तर मनी प्लांट पैसा कमाईचे साधन बनण्याऐवजी पैसा गमवण्याचे साधन बनेल. यासाठी पुढे दिलेले नियम कायम लक्षात ठेवा.
मनी प्लांट ठेवण्यासाठी उत्तम जागा :
मनी प्लांट हे इन डूअर प्लांट अर्थात घराच्या आत लावण्याचे झाड आहे. पण ते कुठेही ठेवून चालणार नाही तर आग्नेय कोनात (पूर्व-दक्षिण) ठेवावे. यामुळे सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो. यासोबतच आर्थिक स्थिती भक्कम होते.
वास्तूनुसार आग्नेय कोनात मनी प्लांट ठेवल्याने ग्रहस्थितीही सुधारते. मुख्यतः शुक्र ग्रह बलवान होतो. कारण या दिशेचा स्वामी श्रीगणेश आहे. जो सर्व प्रकारच्या संकटांचा नाश करतो. शुक्र ग्रह आपल्या जीवनात रसिकता आणून जीवन आनंदमयी बनवतो.
मनी प्लांट कोणत्या दिशेने ठेवू नये?
मनी प्लांट कधीही उत्तर-पूर्व (ईशान्य) दिशेला लावू नये. या दोन्ही दिशा वृक्षारोपणासाठी निषिद्ध पूर्वेला प्रकाशाचा थेट स्रोत असल्याने वृक्ष, झाडं, रोपटी यांच्यामुळे ऊर्जेचा प्रवाह थांबू नये, हा त्यामागचा उद्देश असतो. अशा स्थितीत मनी प्लांट या दिशेला लावल्यास अशुभ फळ मिळेल. पैशांचा ऱ्हास होईल.
याच दिवशी मनी प्लांट लावा :
वास्तुशास्त्रात रोप लावण्यासाठीही विशेष तिथी सांगण्यात आली आहे. यानुसार शुक्ल पक्षातील अष्टमीपासून कृष्ण पक्षातील सप्तमी तिथीपर्यंत मनी प्लांट लावल्यास शुभ फळ मिळते.
याची काळजी घ्या :
मनी प्लांटचे रोप वेलीसारखे वाढते. त्यामुळे त्याची वेल नेहमी वरच्या दिशेने वाढली पाहिजे हे नेहमी लक्षात ठेवा. जमिनीला स्पर्श करत असल्यास, ते वरच्या दिशेने आधार देऊन वाढवा किंवा कापून टाका. मनी प्लांटची वर वाढणारी वेल समृद्धी वाढवणारी मानली जाते.
मनी प्लांटचे कोणतेही पान सुकले किंवा पिवळे पडले असेल तर ते ताबडतोब काढून टाकावे. असे मानले जाते की अशी पाने सुख आणि समृद्धीमध्ये अडथळा बनतात.
एवढी काळजी घेतली तरच मनी प्लांट लावण्यामागचा हेतू सफल होईल. तुम्ही निसर्गाची काळजी घ्या, निसर्ग तुमची काळजी घेईल.