Vastu Tips: वास्तुबदल केल्यामुळे ग्रहदोषातून मुक्ती होते, हे खरे आहे का? सविस्तर जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2022 04:43 PM2022-11-04T16:43:59+5:302022-11-04T16:44:34+5:30

Vastu Tips: प्रश्नांपासून दूर पाळल्यामुळे प्रश्न सुटत नाहीत, ते सोडवण्यासाठी त्यांच्या मुळापर्यंत जावे लागते. कसे ते वाचा!

Vastu Tips: Is it true that changing Vastu gets rid of planetary defects? Learn more! | Vastu Tips: वास्तुबदल केल्यामुळे ग्रहदोषातून मुक्ती होते, हे खरे आहे का? सविस्तर जाणून घ्या!

Vastu Tips: वास्तुबदल केल्यामुळे ग्रहदोषातून मुक्ती होते, हे खरे आहे का? सविस्तर जाणून घ्या!

googlenewsNext

>> अस्मिता दीक्षित, ज्योतिष अभ्यासक 

महिन्यापूर्वी मला एका स्त्रीचा फोन आला होता . त्यांनी नवीन वास्तू मध्ये गृहप्रवेश केला होता . त्यांचे अनेकविध प्रश्न होते जसे मुलाची नोकरी आणि त्याला वाईट संगतीमुळे लागलेले व्यसन . त्या म्हणाल्या आम्हाला एकाने सांगितले कि तुम्ही वास्तू बदललीत तर हे सर्व प्रश्न सुटतील पण तसे झाले नाही म्हणून त्या जरा चिंतीत होत्या . खरतर त्यांच्या ह्या वक्तव्यामुळे मला आजचा हा लेख लिहावासा वाटला. 

मी त्यांना विचारले की वास्तू कुणाच्या नावावर घेतली आहे तर म्हणाल्या यजमानांच्या नावावर. म्हंटले ठीक आहे . गणपतीपूजन, वास्तुशांत सर्व व्यवस्थित केले असाही उल्लेख त्यांनी केला. आत्ताची वास्तू चांगली मोठी आहे हवेशीर आहे पण आयुष्यातील प्रश्न जैसे थेच आहेत . असो.

तर आपण आता मूळ मुद्द्याकडे येऊया. वास्तू बदल झाला तर पत्रिकेतील ग्रह सुद्धा बदलून अचानक चांगली फळे देतील का? तर त्याचे उत्तर नाही असेच आहे. मुळात वास्तूबद्दल होण्यासाठी तशीच ग्रहस्थिती कारणीभूत असते म्हणून वास्तू मध्ये बदल झाला. येतंय का लक्ष्यात ? ग्रहांच्या दशा आणि अंतर्दशेत ग्रहांनी फळ दिले ते म्हणजे वास्तूबद्दल .इतकच . पण वास्तू बदलली म्हणून आता इतरही समस्या सुटतील असे मात्र नाही .

आता त्यांचा सलग्न प्रश्न असा आहे कि मुलाची नोकरी टिकत नाही आणि त्याची व्यसने सुटत नाहीत . आता ह्या मुलाच्या नावावर ही वास्तू खरेदी केलेली नाही तर त्याच्या वडिलांच्या नावावर खरेदीखत आहे . वडिलांच्या पत्रिकेत वास्तू विकत घेण्याचे आणि वास्तू बदल होण्याचे योग होते म्हणून तशा घटना घडल्या पण हे योग मुलाला व्यसनमुक्त करू शकणार नाहीत . मुलाची व्यसने आणि  नोकरी ह्या गोष्टींसाठी त्याच्या वयक्तिक पत्रिकेतील ग्रहयोग काय सांगतात ते बघणे आवश्यक आहे. 

आपल्या पत्रिकेतील ग्रह आणि महादशा घटना घडवीत असतात . मुलाला व्यसन जन्मापासून आहे का? तर नाही . म्हणजेच आयुष्याच्या एका टप्प्यावर त्याला व्यसन लागले आहे . पत्रिकेतील 12 भाव आणि सगळे ग्रह सतत 24 तास फळ देतात का तर नाही . महादशा ज्या ग्रहाची असते तो ग्रह ज्या भावात ,नक्षत्रात आहे त्याच्या कार्येशत्वानुसार फळ देण्यास सक्षम असतो . त्यामुळे वास्तूमध्ये बदल झाला तर आयुष्य संपूर्ण 360 अंशाने बदलेल आणि सगळच सुफळ संपन्न होईल असे नाही . 

आयुष्यातील अनेकविध घटनांचे मूळ महादशेत आहे . वास्तूबद्दल , नोकरीत बदल , परदेशगमन , संततीचे आगमन , प्रेमसंबंध जुळणे , विवाह , घटस्फोट , अविवाहित राहणे , व्यवसाय सुरु होणे , अचानक नोकरी जाणे , व्यसन लागणे , आयुष्यभर एकत्र राहिलेल्या भावंडाच्या संबंधात कायमचा दुरावा किंवा वितुष्ट येणे , दीर्घ मुदतीची आजारपणे , दवाखान्याच्या फेऱ्या ह्या सर्व घटना त्या त्या ग्रह योगांतून घडत असतात . त्यामुळे आता वास्तू बदलली की आमचे सर्व प्रश्न काहीतरी जादू झाल्यासारखे सुटतील असे म्हणणे उचित होणार नाही .

वास्तूत बदल होणे ही घटना नक्कीच प्रत्येकासाठी आनंददायी असतेच असते. आपल्या स्वप्नात असलेल्या घराची कल्पना सत्यात उतरते तेव्हा मन आनंदाने बहरून जाते . नवीन जागेत वास्तुशांत आणि पाहुण्यांची ये जा अश्या अनेक सकारात्मक गोष्टी घडल्यामुळे मनाला उभारी येते नवचैतन्य वाटणे ह्या गोष्टी काही प्रमाणात जीवनाला कलाटणी देतात पण म्हणून इतर सगळ्याच गोष्टी समुळ नष्ट करतील असे विधान करणे चुकीचे ठरले . 

बरेच वेळा वास्तू बदल झाल्यामुळे सद्य स्थितीत असणारे प्रश्न अधिक भीषण स्वरूप धरू शकतात . ह्याचे कारण आपण घेतलेली वास्तू हि दुषित , पिडीत असते . एखाद्या वास्तूत एखाद्या स्त्रीचा हुंड्यासाठी किंवा तत्सम जाळून छळ करून मृत्यू झाला असेल किंवा तत्सम दुर्घटना घडलेली असेल किंवा कुणी त्या वास्तूत आत्महत्या केली असेल, भाऊबंदकि तील वास्तू असेल  तर त्या वास्तूची स्पंदने बिघडतात आणि त्या वास्तूत दोष निर्माण होतो . मग अश्या जागेत रात्री झोप न लागणे , दडपण जाणवणे , मनावर ताण निर्माण होणे , घरात कुठलेही धार्मिक कार्य संपन्न न होणे , घरात अन्न किंवा धान्य भाजीपाला फुकट जाणे , घरात कलह , मतभेद , घरात भास आभास होणे ह्या गोष्टींची प्रचीती येते . आपली दशा सुद्धा योग्य नसेल तरीही अशा घटना घडू शकतात. 

अनेकदा आपण ऐकतो की वास्तू बदलली आणि आमचे सगळे छान झाले तर अश्यावेळी उत्तम वास्तू मिळण्याचे आणि ती लाभण्याचे उत्तम ग्रह योग फलित झाले म्हणून सुखमय घटना घडत आहेत असे समजावे. पण वास्तूबदल झाला म्हणून घरातील व्यक्तीचे व्यसन सुटेलच असे नाही, नोकरी मिळेलच असे नाही . हे प्रश्न व्यक्तीसापेक्ष आहेत ते त्यांच्या व्यक्तिगत पत्रीकेवरून पाहणे उचित ठरेल.

आयुष्यातील घटना घडवण्याचा सर्वासर्वे अधिकार हा महादशा स्वामीने राखून ठेवला आहे . त्यामुळे वास्तू परिवर्तन सगळ्याच गोष्टीत परिवर्तन करेल असे नाही.  नवीन वास्तू खरेदी करताना ती आवडली तर लगेच टोकन देऊ नये . घरी यावे कुलस्वामिनीची प्रार्थना करावी आणि प्रश्नकुंडली मांडावी ( ज्यांना ज्योतिष येते आहे त्यांनी ) आणि चतुर्थ स्थान पाहावे . जर त्यात राहू असेल किंवा ते दुषित असेल तर ती वास्तू घेण्याचा  विचार सोडून द्यावा . 

अनेक जण कुठलाही मुहूर्त न बघता नवीन वास्तूत गृहप्रवेश करतात तसेच उदकशांत , वास्तुशांत सुद्धा करत नाहीत .पण हे योग्य नाही . वास्तुशांत हि दर 10 वर्षांनी आणि उदकशांत हि दर 5 वर्षांनी करावी पण आजकाल ह्या गोष्टी मागे पडत आहेत किंवा ह्या गोष्टीना प्राधान्य दिले जात नाही पण कितीही काहीही झाले तरी आपली आधुनिक so called मते बाजूला ठेवावीत आणि यथासांग वास्तू शांत करून घ्यावी . वास्तू शास्त्र हे प्राचीन शास्त्र आहे .वास्तू शास्त्र , ज्योतिष ह्या सर्वाची एकमेकात गुंफण आहे . वास्तूत दिशाना अन्य साधारण महत्व आहे मान्य आहे . प्रत्येक शास्त्र आपापल्या जागी श्रेष्ठ आहे . 

ह्यासर्वांचा मेरुमणी म्हणजे आपली कर्म , मनातील शुद्ध विचार आणि उपासना . आपली उपासना आपल्याला मार्ग दाखवत असते , आपले आयुष्य घडवत असते . अनेक आश्चर्य कारक घटना आयुष्यात घडतात ज्याची आपण अपेक्षा ही केलेली नसते त्यालाच आपण गुरुकृपा म्हणतो. 

प्रत्येकावर गुरुकृपा होऊन इच्छित वास्तूचा लाभ होउदे हीच सदिच्छा.

संपर्क : 8104639230

Web Title: Vastu Tips: Is it true that changing Vastu gets rid of planetary defects? Learn more!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.