Vastu Tips: घरात शिवमूर्ती किंवा शिवप्रतिमा असेल तरी हरकत नाही; फक्त 'हे'पाच नियम अवश्य पाळा!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2022 05:37 PM2022-08-04T17:37:17+5:302022-08-04T17:38:00+5:30
Vastu Shastra: घरात आपण हौसेने अनेक गोष्टी आणतो. पण त्यात देवतांच्या फोटो किंवा मूर्तीचा समावेश असेल तर योग्य काळजी घेतली पाहिजे!
जीवनात सुख, समृद्धी आणि प्रगतीसाठी वास्तुशास्त्रातील उपाय अत्यंत उपयुक्त मानले जातात. वास्तूमध्ये असे अनेक उपाय सांगितले आहेत, ज्याचा अवलंब करून तुम्ही आनंदी जीवन जगू शकता. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये देवतेचे चित्र किंवा मूर्ती स्थापित केल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते. असे म्हणतात की ज्या घरात देवी-देवतांचे चित्र किंवा मूर्ती असते, त्या घरात नेहमी सुख-समृद्धी राहते.
हिंदू धर्मात शिवाला सर्व देवतांमध्ये सर्वोच्च स्थान आहे, म्हणून त्याला देवाधिदेव महादेव म्हणतात. त्याला महाकाल असेही म्हणतात. शिवाच्या कृपेने मोठा त्रासही टळतो. त्यामुळे घरामध्ये भगवान शिवशंकराचे चित्र किंवा मूर्ती ठेवणे फायदेशीर मानले जाते. पण वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये शिवाचे चित्र किंवा मूर्ती स्थापित करताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. त्या कोणत्या ते पाहू.
शिवाची मूर्ती किंवा चित्र ठेवण्याची दिशा : शिवाचे निवासस्थान कैलास पर्वत उत्तरेला आहे. अशा वेळी घरात शिवाची मूर्ती किंवा चित्र उत्तर दिशेला ठेवावे. वास्तुशास्त्रानुसार, शिवाची क्रोधीत प्रतिमा न ठेवता ध्यानस्थ मुद्रा असलेली प्रतिमा ठेवावी.
शिव कुटुंब : भगवान शिवशंकर कुटुंब वत्सल आहेत. त्याच्यासकट त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचे चित्र लावणे शुभ मानले जाते. अशी प्रतिमा लावली असता घरात कलह होत नाही. त्याचबरोबर मुलेही आज्ञाधारक बनतात.
योग्य ठिकाण : वास्तुशास्त्रानुसार, घरामध्ये अशा ठिकाणी भगवान शंकराची प्रतिमा किंवा मूर्ती स्थापित करावी, जिथे कुटुंबातील प्रत्येकाला तिचे दर्शन घडेल.
शिवमुद्रा : वर म्हटल्याप्रमाणे क्रोधीत शिवमुद्रा घरात लावू नये. प्रसन्न, हसतमुख किंवा ध्यानस्थ मुद्रा असलेली प्रतिमा लावावी. त्यामुळे घरात सुख-समृद्धी कायम राहते.
स्वच्छतेची काळजी घ्या : घरामध्ये ज्या ठिकाणी भगवान शिवशंकराचे चित्र किंवा मूर्ती स्थापित केली जाते ती जागा नेहमी स्वच्छ असावी. मूर्तीचे पावित्र्य जपावे. ती मूर्ती शोभेची म्हणून ठेवलेली असली तरी मूर्ती देवाची असल्याने शुचिता जपावी.