Vastu Tips: तुळशीचे अनेक प्रकार आहेत; पण आपल्या वास्तुसाठी योग्य तुळस कोणती ते जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2024 02:45 PM2024-04-25T14:45:27+5:302024-04-25T14:45:48+5:30
Vastu Shastra: घरात तुळस असणे हे सौभाग्यकारक आहेच पण त्यातही वास्तूच्या दृष्टीने तुळशीची केलेली निवड जास्त लाभदायी ठरते!
घरामध्ये तुळशीचे रोप लावल्याने सुख-समृद्धी येते. शास्त्रात तुळशीचे रोप अतिशय शुभ मानले गेले आहे. तुळशीचेही अनेक प्रकार आहेत. पैकी रामा आणि श्यामा तुळशी मोठ्या प्रमाणात बघायला मिळते. मात्र वास्तूसाठी कोणती तुळशी योग्य, ती कशी ओळखायची, त्यामुळे होणारे लाभ कोणते ते जाणून घेऊ.
हिंदू धर्मात तुळशीला सर्वात पवित्र मानले जाते. असं म्हणतात की ज्या घरात तुळशीचं रोप असतं त्या घरात सुख, समृद्धी आणि संपत्तीची कमतरता नसते. घराच्या उत्तर दिशेला तुळशीचे रोप लावणे अत्यंत शुभ मानले जाते. पण, ती कोणत्या प्रकारची तुळस लावावी ते जाणून घेणे महत्त्वाचे आहे. रामा तुळशी, श्यामा तुळशी, वन तुळशी ज्याला लिंबू तुळशी आणि पांढरी तुळशी असेही म्हणतात. बहुतेक घरांमध्ये रामा आणि श्यामा तुळशी दिसतात. त्यातला फरक समजून घेऊ.
घरामध्ये कोणती तुळशी लावावी, रामा की श्यामा?
ज्योतिष शास्त्रानुसार तुम्ही घरात कोणतीही तुळशी लावू शकता. तुळशीची लागवड करून तुम्ही राम किंवा श्यामा यांची पूजा करू शकता. तुम्हाला हवे असल्यास तुळशीचे दोन्ही प्रकार लावू शकता. पण, पूजेच्या दृष्टिकोनातून रामा तुळशीचे महत्त्व अधिक असल्याचे सांगितले जाते.
तुळशीचे रोप कोणत्या दिशेला लावावे?
तुळशीच्या रोपामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो. घराच्या उत्तर दिशेला तुळशीचे रोप लावणे सर्वात शुभ असते असे मानले जाते. तुळशीचे रोप लावल्याने घरात सुख-समृद्धी वाढते.
रामा आणि श्यामा तुळशीतला मुख्य फरक
श्यामा तुळशीचा रंग किंचित जांभळा आहे. त्याची पाने काळ्या रंगाची असतात. श्यामा तुळशीमध्ये अनेक आयुर्वेदिक गुणधर्म आहेत. त्यामुळे पूजेपेक्षा आयुर्वेदात त्याचा उपयोग जास्त प्रमाणात केला जातो. याउलट रामा तुळस ही हिरवीगार असते. ती देखील औषधी असते, पण तिचा वापर पूजेत जास्त केला जातो.
तुळशीचे चमत्कारिक उपाय
तुळशीची पाने सुकल्यावर फेकून देऊ नका, त्याऐवजी ती लाल रंगाच्या कापडात बांधून ठेवा आणि तिची छोटीशी पुरचुंडी बांधून आपल्या तिजोरीत किंवा आपल्या पाकिटात ठेवा. यात रामा तसेच श्यामा तुळशीची पाने चालू शकतात. हा उपाय केला असता लक्ष्मी कृपा प्राप्त होते असे ज्योतिष शास्त्रात म्हटले आहे.
वैवाहिक अडचणीवर उपाय
जर कोणाच्या लग्नात काही अडथळे येत असतील तर तुळशीमंजरी दुधात मिसळून शिवलिंगावर अर्पण करा. असे केल्याने वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतात असे मानले जाते. तसेच विवाह लवकर ठरतो.
आर्थिक अडचणीतून मार्ग काढण्यासाठी
शुक्रवारी देवी लक्ष्मीच्या पूजेदरम्यान तुळशीमंजीरी अर्पण करणे खूप शुभ मानले जाते. असे म्हणतात की हा उपाय केल्याने तुमची आर्थिक स्थिती सुधारते तसेच आर्थिक अडचणी दूर करण्याचा मार्ग सापडतो.
व्यावसायीक अडचणींवर मात
व्यवसायात प्रगती आणि प्रगती साधायची असेल तर ११ तुळशीच्या पानांवर 'श्री' लिहून गुरुवारी भगवान विष्णूला अर्पण करा. असे केल्याने तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी यश मिळेल. व्यावसायिक प्रगती होईल. नोकरीचा मार्ग सुकर होईल.