वास्तुशास्त्र सांगते, घरात चुकूनही 'ही' रोपटी लावू नका, अन्यथा कार्यात येतील अनेक अडथळे!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2021 02:48 PM2021-06-03T14:48:26+5:302021-06-03T14:48:47+5:30
घराच्या आत आणि टेरेस आणि बाल्कनीमध्ये रोपटी लावताना काही गोष्टी जाणून घेणे फार महत्वाचे आहे.
आपल्याला निसर्गात रमायला आवडते, परंतु वेळेअभावी निसर्गात रमणे शक्य नाही म्हणून आपण निसर्गच घरात आणतो. तो म्हणजे बाग बगीच्यांच्या स्वरूपात! हौसेने आपण अनेक प्रकारची रोपे लावतो, त्यांची उत्तम मशागत करतो, देखभाल करतो. त्यापैकी काहींची छान वाढ होते, तर काहींची खुंटून जाते. परंतु हौसेपायी लावलेल्या झाडांमध्ये चुकून आपण अशी काही झाडं तर लावत नाही ना, जी आपल्याच मार्गात काटे पेरण्याचे काम करतील?
म्हणून वास्तुशास्त्रानुसार घरात कोणती रोपटी लावावीत आणि कोणती लावू नयेत, याची माहिती घेऊया.
वास्तुशास्त्रामध्ये घर आणि ऑफिसमधील प्रत्येक गोष्टीसंदर्भात योग्य दिशानिर्देश आणि निवड करण्याचे मार्गदर्शन केले गेले आहे. यात घरात ठेवलेल्या वनस्पतींचादेखील समावेश आहे. काही झाडे घराच्या वातावरणास शुद्ध करतात आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात, तर काही झाडे बर्याच समस्या निर्माण करतात. अशा परिस्थितीत घराच्या आत आणि टेरेस आणि बाल्कनीमध्ये रोपटी लावताना काही गोष्टी जाणून घेणे फार महत्वाचे आहे.
चुकूनही काटेरी रोपं लावू नका: अलीकडे फेंगशुईच्या नावावर निवडुंगाचे अनेक प्रकार विकले जातात. विविध आकाराचे निवडुंग काटेरी असूनही आकर्षक दिसतात, परंतु वास्तुशास्त्र अशी रोपटी घरात ठेवण्यास परवानगी देत नाही. अशी रोपटी अकारण वादाला आणि ताण तणावाला कारणीभूत ठरतात. अशा रोपट्यांचा वापर घर सजावटीचा भाग म्हणून करू नये. अशाने घर चांगले दिसेलही, परंतु घरातील शांततेला सुरुंग लागण्याची शक्यता आहे. म्हणून आपल्या हातांनी आपल्या घरात काटे पेरू नका.
चिकाची झाडे : अशी अनेक रोपटी आहेत, ज्यांची पाने मध्यातून तोडली असता चीक अथवा दुधासारखा द्रव पदार्थ स्रवतो. अशी रोपटी, झाडं राना वनात उगवतात व ती तिथेच शोभून दिसतात. कारण त्यातील रस विषारीदेखील असू शकतो. चुकून या पानांचा कोणी वापर केल्यास त्याच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून घराच्या परिसरात अशा झाडांची लागवडच नको! अशी झाडे राना वनातील पशु पक्ष्याचे खाद्य असते. त्यामुळे अशी रोपटी घरात लावून घराला अरण्य बनवू नका.
वृक्षांचे बियाणे घरात रुजवू नका: वृक्षाचे बियाणे गॅलरीच्या कुंडीत रोवणे उचित नाही. आंबा, जांभूळ, आवळा, वड हे वृक्ष हिंदू संस्कृतीत पूजनीय असले, तरी वास्तू शास्त्रानुसार आपल्या घरच्या बगिच्यात त्याची लागवड करणे योग्य नाही. असे बियाणे जमिनीत रुजले तर त्याची पाळे मुळे खोलवर रुजतात. घराच्या कुंड्यांमध्ये शोभेसाठी लावलेली ही झाडं जमिनीत रुजवताना मुळांना धक्का लागून त्यांची वाढ खुंटण्याची शक्यता असते. यासाठीच ही रोपटी थेट जमिनीत लावावीत आणि त्यांची निगा राखावी, पण घरात लावू नयेत. अगदीच हौस म्हणून लावायचे असेल तर बोन्साय झाडांचा वापर करता येईल.
सकारात्मकता देणारी रोपटी : डोळ्यांना आल्हाददायक वाटेल, ज्यांची वेगाने वाढ होईल, फुलांनी मोहरून जाईल, असे रोपटे आपल्या बगिच्यात लावावे. ते पाहून मन प्रसन्न होईल. यात तुळशीच्या रोपाचा आवर्जून समावेश करावा. कारण जेवढी सकारात्मकता एकट्या तुळशीच्या रोपात आहे, ती अन्य कशात नाही!