Vat Purnima 2021: घरच्या घरी ‘असे’ करा वटपौर्णिमा व्रतपूजन; पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व व वटसावित्रीची आरती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2021 01:55 PM2021-06-23T13:55:40+5:302021-06-23T13:58:28+5:30

Vat Purnima 2021: ज्यांना तीन दिवसीय व्रत करणे शक्य नाही, त्यांनी वटपौर्णिमेच्या दिवशी हे व्रत विधिपूर्वक आचरावे. व्रतपूजन, वटसावित्री आरती जाणून घेऊया...

vat purnima 2021 know about date shubh muhurat vrat puja vidhi and vat savitri aarti in marathi | Vat Purnima 2021: घरच्या घरी ‘असे’ करा वटपौर्णिमा व्रतपूजन; पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व व वटसावित्रीची आरती

Vat Purnima 2021: घरच्या घरी ‘असे’ करा वटपौर्णिमा व्रतपूजन; पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व व वटसावित्रीची आरती

googlenewsNext

ज्येष्ठ पौर्णिमा ही वटपौर्णिमा नावाचे ओळखली जाते. सावित्रीने यमदेवांकडून आपल्या पतीचे प्राण परत आणले होते. ही घटना ज्येष्ठ पौर्णिमेला घडली. तेव्हापासून पतीच्या प्राणांचे रक्षण व्हावे आणि आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावे, यासाठी सुवासिनी महिला पौर्णिमेच्या दिवशी सावित्रीसारखे व्रत आचरतात. सावित्रीने आपल्या पतीची सेवा वडाच्या झाडाखाली केली. तेथेच यमदेवांनी सत्यवानाला त्याचे आयुष्य परत दिले. त्यामुळे वडाच्या झाडाचे पूजन केले जाते. यंदाच्या वर्षी गुरुवार, २४ जून रोजी वटपौर्णिमा आहे. वास्तविक पाहता वटसावित्रीचे व्रत तीन दिवसांचे असते. मात्र, ज्यांना तीन दिवसीय व्रत करणे शक्य नाही, त्यांनी वटपौर्णिमेच्या दिवशी हे व्रत विधिपूर्वक आचरावे, असे सांगितले जाते. जाणून घेऊया...

वटपौर्णिमा: २४ जून २०२१ (Vat Purnima 2021 Date)

पौर्णिमा प्रारंभ: २३ जून २०२१ रोजी उत्तररात्रौ ०३ वाजून ३२ मिनिटे.

पौर्णिमा समाप्ती: २४ जून २०२१ रोजी उत्तररात्रौ १२ वाजून ९ मिनिटे. (Vat Purnima 2021 Shubh Muhurat in Maharashtra)

भारतीय पंचांगानुसार, सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असल्यामुळे वटपौर्णिमेचे व्रतपूजन २४ जून रोजी करावे. तसेच संपूर्ण दिवस पौर्णिमा असल्यामुळे आपापले कुळाचार, कुळधर्म पाळून वटसावित्री व्रताचा संकल्प करून वडपूजन करावे, असे सांगितले जात आहे. यंदाच्या वर्षीही कोरोनाचे संकट कायम असल्यामुळे घरच्या घरी हे व्रताचरण करावे, असे आवाहन केले जात आहे. 

वटपौर्णिमा व्रतपूजन कसे करावे? (Vat Purnima Puja Vidhi in Marathi)

ज्येष्ठ पौर्णिमेला वटसावित्रीचे व्रत सुवासिनी महिलांकडून केले जाते. पर्यावरणशास्त्राच्या दृष्टीनेही वडाचे महत्त्व विशेष असल्याने त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे हाही पूजेचा एक हेतू आहे. प्रत्यक्ष वडाच्या झाडाची पूजा करणे शक्य नसल्यास वडाच्या झाडाची प्रतिमा घ्यावी. एका चौरंगावर तिची स्थापना करावी. व्रताचरणाचा संकल्प करावा. त्यानंतर देवतांचे आवाहन करावे. तुप, दूध, मध, दही आणि साखर यांचे मिश्रण असलेले पंचामृत अर्पण करावे. त्यानंतर शुद्ध पाणी अर्पण करावे. हळद-कुंकू, फुले, फळे अर्पण करावीत. धूप, दीप, नैवेद्य अर्पण करावा. आरती करावी. मनापासून नमस्कार करून सर्वांना प्रसाद वाटावा. पूजन झाल्यावर,

सावित्रि ब्रह्मसावित्रि सर्वदा प्रियभाषिणी|
तेन सत्येन मां पाहि दुःख-संसार-सागरात्|
अवियोगो यथा देव सावित्र्या सहितस्य ते |
अवियोगो तथास्माकं भूयात् जन्मनि जन्मनि ||

अशी सावित्रीची प्रार्थना करावी. यानंतर,

वटमूले स्थितो ब्रह्मा वटमध्ये जनार्दन:। वटाग्रे तु शिवो देव: सावित्री वटसंश्रिता ।।

असे म्हणून नामस्मरण करावे. दिवसभर उपास करावा, असे सांगितले जाते. 

वटसावित्री आरती (Vat Purnima Vat Savitri Aarti in Marathi)

अश्वपती पुसता झाला।। नारद सागंताती तयाला।।
अल्पायुषी सत्यवंत।। सावित्री ने कां प्रणीला।।
आणखी वर वरी बाळे।। मनी निश्चय जो केला।।
आरती वडराजा।।१।।

दयावंत यमदूजा। सत्यवंत ही सावित्री।
भावे करीन मी पूजा। आरती वडराजा ।।धृ।।
ज्येष्ठमास त्रयोदशी। करिती पूजन वडाशी ।।
त्रिरात व्रत करूनीया। जिंकी तू सत्यवंताशी।।
आरती वडराजा ।।२।।

स्वर्गावारी जाऊनिया। अग्निखांब कचळीला।।
धर्मराजा उचकला। हत्या घालिल जीवाला।
येश्र गे पतिव्रते। पती नेई गे आपुला।।
आरती वडराजा ।।३।।

जाऊनिया यमापाशी। मागतसे आपुला पती।। 
चारी वर देऊनिया। दयावंता द्यावा पती।।
आरती वडराजा ।।४।।

पतिव्रते तुझी कीर्ती। ऐकुनि ज्या नारी।।
तुझे व्रत आचरती। तुझी भुवने पावती।।
आरती वडराजा ।।५।।

पतिव्रते तुझी स्तुती। त्रिभुवनी ज्या करिती।। 
स्वर्गी पुष्पवृष्टी करूनिया। आणिलासी आपुला पती।। 
अभय देऊनिया। पतिव्रते तारी त्यासी।।
आरती वडराजा ।।६।।
 

Web Title: vat purnima 2021 know about date shubh muhurat vrat puja vidhi and vat savitri aarti in marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.