Vat Purnima 2022: महाभारतातील वनपर्वात दिलेला सावित्री आणि यमाचा संवाद वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2022 01:22 PM2022-06-14T13:22:47+5:302022-06-14T13:23:01+5:30

Vat Purnima 2022: सर्वप्रथम प्रातःस्मरणीय सावित्रीला शतशः प्रणाम! वटपौर्णिमेनिमित्त करूया सावित्रीच्या तेजस्वी चरित्राचे चिंतन... 

Vat Purnima 2022: Read the dialogue between Savitri and Yama given in the Vanparva of Mahabharata! | Vat Purnima 2022: महाभारतातील वनपर्वात दिलेला सावित्री आणि यमाचा संवाद वाचा!

Vat Purnima 2022: महाभारतातील वनपर्वात दिलेला सावित्री आणि यमाचा संवाद वाचा!

googlenewsNext

>> शैलजा भा. शेवडे

का सावित्रीने अल्पायु सत्यवानाशी विवाह केला असेल? इतकी ती त्याच्या प्रेमात वेडी झाली होती का?  सावित्री प्रसिद्ध तत्त्‍‌वज्ञानी राजर्षि अश्वपती यांची कन्या.ज्ञानी सूर्यकन्या..लग्न तर केलं..पण नंतर प्रत्येक क्षणी तिला जाणीव होती, आपल्या पतीचं आयुष्य अजुन केवळ  एक वर्षाचं आहे. मृत्यू जवळ जवळ  येतोयं पतीला गाठायला. बरं..तिच्या मनातले भाव ती कुणाला सांगूही शकत नव्हती. कुणाला सांगणार? अंध अशा सासू सासऱ्यांना, का पतीला? मनात घालमेल होत असेल का? नाही..ती सामान्य स्त्री नव्हतीच. तिने सासूसासऱ्यांची सेवा केली, पत्नीधर्म तर निभावलाच , त्याबरोबर शारीरिक बळ मिळवले, आत्मबल मिळवले. आत्मबल सहज कसे मिळणार? साधना करावी लागली. तिचे ध्येय निश्चित होते. मनावर संयम, दृढनिश्चय प्राप्त केला. 

वर्ष संपायच्या आधी ३ दिवस तिने कडक व्रत केले.  सत्यवानाच्या मृत्यूचा दिवस होता, तेव्हा तीही त्याच्याबरोबर वनात समिधा आणायला गेली. हट्टाने... कशी स्थिती असेल तिच्या मनाची...? शेवटी तो क्षण आला. सत्यवान खाली कोसळला. चक्कर येत होती. डोक्यात वेदना होत होत्या...पतीचे मस्तक मांडीवर घेऊन वडाच्या  झाडाखाली सावित्री बसली. तिला यमाची चाहूल लागली. पीत वस्त्र धारण केल्लेला लाल डोळ्याचा यम तिला दिसला...हो सत्यवानाचे प्राण न्यायला यम स्वतः आला होता, कारण सत्यवान पुण्यवान होता. सावित्री तपस्विनी होती,  म्हणून यम तिला दिसला. सावित्री जी अत्यंत सदाचरणी होती, चेष्टेत, किंवा क्रोधातही जी कधी असत्य बोलली नव्हती. 

यम तिच्या नवऱ्याचा अंगुष्ठीमात्र जीव अर्थात त्याच्या शरीरातील चेतना  घेऊन जायला लागला. सावित्री त्याच्या मागोमाग जाऊ लागली...खरंच, असं कुणाला यमाच्या मागे जाता येईल? हो..सावित्रीला ते जमलं. ती तपस्विनी होती. ती सूक्ष्म शरीराने यमाच्या मागे जाऊ लागली.तिने यमाशी तत्वज्ञानावर चर्चा झाली.तिच्या बोलण्यावर प्रसन्न होऊन यमाने तिला वर दिला, तिच्या वृद्ध सासुसास-यांची दृष्टी, राज्य परत दिले. तिच्या वडिलांना पुत्रप्राप्ती होईल, असे सांगितले. आणि शेवटी तिच्या नवऱ्याला जीवदान दिले. काय नेमके बोलली होती ती यमाशी? महाभारतातील वनपर्वात ही कथा आहे. 
यम सावित्रीचा संवाद, शैलजा शेवडे यांनी कवितेतून लिहिला आहे... 

सावित्री यमास म्हणते,

हे देवेश्वर, यमधर्मा,  मम  पतीला नेता जिथे,
येते  मी ही तुमच्या संगे, निक्षून  हे  सांगते |
स्वामीसंगे   सुख ही माझे,  गतीही त्यांच्या सवे,
पतिव्रतेचा धर्म असे हा, आनंदे पाळते |

जरी असे हा मार्गही दुष्कर, कंटक असती,जरी निरंतर,
प्राणनाथ मम जेथे माझे,  तिथेच मी  असते |
व्रतपालन अन कृपा आपली, संगती माझे  पती  
कोण  रोखू,शकतील सांगा, तर मग माझी गती?

सात पावले, एकत्रच ती,  चाललो  दोघे आपण
नाते झाले, मित्रत्वाचे, काही गोष्टी  बोलते |
समर्थ असती, पुरुष जितेंद्रिय, विवेकी ते असती,
धर्मप्राप्तीही, तेच सांगती, श्रेष्ठ तया मानिती |

सत्पुरुषांची ओळख व्हावी, भाग्य असे हे किती,
मैत्री त्यांच्यासवे जुळावी भाग्याला नच मिती ,
निष्फळ ना मुळीच कधीही त्यांची ही संगती, 
समीपच त्यांच्या सदा रहावे, असेच जन बोलती |

हे देवेश्वर, वैवस्वत तुम्ही   धर्मराज आचरणी
प्रेम असे  आधार  जीवाचा, भाव असे हा जनी |  
स्वतःहुनही संतांवर अधिक   विश्वास असे लोकांना ,
अथांग करुणा त्यांच्यामधली, खेचून घे सर्वांना |

नियमन करुनी संयमे जनां विभिन्न लोकी नेती, 
म्हणुनी यम हो तुम्हांस म्हणती, मोठी असे ख्याती |
मन वाणी  कृतीनेही कधी कुणास ना  दुखवती,
दया असते सत्पुरुषांची, दुर्बल मनुष्यांप्रती |
दुर्बल आणि अल्पायु जन पृथ्वीवर वसती, 
शत्रुवरही  दया बरसती, शरणार्थीना दूर कसे करती?

सत्पुरुषांची  धर्मातच ती वृती सदा असते,
दुःख व्यथा ती  त्यांना मुळी कधीच ना शिवते |
सत्पुरुष ते आश्रय सर्वा, सर्वकाळी असती |
संगतीने ते सर्व जनांना निःस्वार्थी करती |
सत्याच्या तेजाने ते   सूर्यासम झळकती,
परोपकारे सर्व जगाचे   रक्षक ते  बनती |

सावित्रीने यमाकडून पतीचे प्राण आणले, त्यात तिची तपश्चर्या होती..तिचा निश्चय होता..तिचे आत्मबल होते...

महर्षी अरविंद यांना या कथेत महाकाव्याचे बीज दिसले. त्यातून सावित्री हे महाकाव्य निर्माण झाले. त्यांनीच या पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हणलं आहे, 'सत्यवान-सावित्री ही मृत्यूवर विजय मिळविल्याची कथा महाभारतात आहे. तथापि त्यात संकेत असा दिलेला आहे, की दैवी सत्य जाणणारा आत्मरूपी सत्यवान हा अज्ञान आणि मृत्यूच्या तडाख्यात सापडलेला आहे. सावित्री ही ज्ञानी सूर्यकन्या त्या दुष्टचक्रातून मानवाला मुक्त करण्यासाठी आली आहे. तिचा पिता अश्वपती हा आध्यात्मिक वाटचालीत उपयुक्त ठरणाऱ्या तपस्येचे प्रतीक आहे. सत्यवानाचे वडील द्युमत्सेन हे अंध झालेले पवित्र मन आहे. अशा मानवी व्यक्तिरेखांद्वारे मर्त्य जीवनापासून दिव्य चैतन्यापर्यंत कसे जाऊन पोहोचायचे, याचे मार्गदर्शन आपल्याला मिळते. 

या महाकाव्यातून श्री. अरविंद यांनी संपूर्ण विश्वाचे  त्यांच्या झालेल्या प्रदीर्घ उत्क्रांतीचे अन्तर्बाह्य स्वरूप वर्णन करून मांडले आहे. सावित्री हे एक प्रतीक-काव्य आहे. त्यांनी प्रतीकांना आध्यात्मिक अर्थ देऊन सावित्रीचा प्रवास हा आध्यात्मिक जाणिवेतला आहे, असे प्रतिपादन केले आहे.

Web Title: Vat Purnima 2022: Read the dialogue between Savitri and Yama given in the Vanparva of Mahabharata!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.