Vat Purnima 2023: वटपौर्णिमेचे व्रत एकदिवसीय नसून 'त्रिरात्री वटसावित्री व्रत' असते; सविस्तर वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2023 04:59 PM2023-05-29T16:59:08+5:302023-05-29T16:59:57+5:30

Vat Purnima 2023: यंदा ३ जून रोजी वटपौर्णिमा आहे, मात्र १ जून पासून त्याचा व्रतारंभ होणार आहे; त्यासंबंधी अधिक जाणून घ्या!

Vat Purnima 2023: The Vrat of Vat Purnima is not a one-day fast but it is a three day fast, read in detail! | Vat Purnima 2023: वटपौर्णिमेचे व्रत एकदिवसीय नसून 'त्रिरात्री वटसावित्री व्रत' असते; सविस्तर वाचा!

Vat Purnima 2023: वटपौर्णिमेचे व्रत एकदिवसीय नसून 'त्रिरात्री वटसावित्री व्रत' असते; सविस्तर वाचा!

googlenewsNext

वटपौर्णिमा हे व्रत तीन दिवसांचे असे. त्याला वटसावित्री व्रत असे म्हणतात. यात दोन पक्ष आहेत. एक अमावस्या पक्ष आणि दुसरा पौर्णिमा पक्ष. अमावस्या पक्षाप्रमाणे आचरणारे लोक अमावस्या धरून आधीचे तीन दिवस हे व्रत करतात. तर पौर्णिमा पक्ष मानणाने बहुसंख्य लोक आजकाल एकाच दिवसाचे व्रत करतात. आजच्या काळात हे व्रत पौर्णिमेच्या दिवशी केले जाते. परंतु, या व्रताच्या निमित्ताने निदान माहिती म्हणून या व्रताची मूळ परंपरा काय आहे, ते जाणून घेऊ.

हे व्रत मुळात तीन दिवसांचे आहे. या व्रताची पुरातन कथा प्रसिद्ध आहे. ती अशी-

अश्वपती नावाच्या राजाला संतान नव्हते. त्याने तपश्चर्या करून देवी सावित्रीला प्रसन्न करून घेतले. पुढे देवीच्या वराप्रमाणे त्याला कन्यारत्न झाले. ही कन्या सावित्रीच्या वरदानामुळे झाली, म्हणून त्याने तिचे नाव `सावित्री'च ठेवले. 

यथावकाश ती वयात आली. तिच्या तेजस्वी व्यक्तिमत्त्वामुळे कोणी राजपुत्र तिच्याशी विवाह करण्यास धजेना. तेव्हा ती स्वत: वडिलांच्या सांगण्यावरून आपल्या पुरोहिताबरोबर वरसंशोधनासाठी निघाली. 

यथाकाळ शाल्व देशाचा राजा द्युमत्सेन याच्या सत्यवान नावाच्या पुत्राला तिने वरले. शत्रूकडून पराभूत झाल्याने राजा आपल्या पत्नी आणि मुलासह अरण्यात राहत होता. सत्यवानाला पसंत करून ती परत आपल्या राजवाड्यात आली. तिचा निर्णय कळल्यावर नारदमुनींना अपार दु:ख झाले. कारण सत्यवान हा लग्नानंतर वर्षभरातच मृत्युमुखी पडणार आहे, हे ते जाणून होते. हे विधीलिखित त्यांनी राजाला सांगितले. त्याचबरोबर सावित्रीसाठी दुसरा वर शोधण्याचा सल्लाही दिला. 

मात्र सावित्री आपल्या निश्चयावर ठाम राहिली. त्यामुळे राजाने योग्य मुहूर्त पाहून सावित्रीचा विवाह सत्यवानाशी लावून दिला. विवाहानंतर सावित्रीने सर्व श्रीमंतीचा त्याग करून साधी राहणी अंगिकारली. सासू-सासरे तसेच पतीची सेवा करू लागली. त्यात एक वर्ष पूर्ण होत आले. वर्षाअखेरीस चार दिवस उरले असताना तिने संकल्पासह दृढ निश्चयाने `त्रिरात्र सावित्री व्रत' केले. शेवटच्या चौथ्या दिवशी पूजेसाठी दर्भ आणि इंधनासाठी लाकडे आणावयास सत्यवान सावित्रीसह रानात गेला. लाकडे गोळा करीत असतानाच तो अचानक आजारी पडला. डोके दुखू लागल्यावर तो सावित्रीच्या मांडीवर डोके ठेवून एका वडाच्या सावलीत निजला. 

नेमक्या त्याचवेळी यमदूत त्याच प्राण हरण करण्यास तेथे पोहोचले. मात्र सावित्रीच्या पातिव्रत्याच्या तेजामुळे ते सत्यवानाजवळ जाऊ शकले नाहीत. सावित्रीने त्यांच्याशी वाद घातला. दूतांच्या सांगण्यावरून यमही तिथे पोहोचला. सावित्री यमाशीही वादविवाद करू लागली. शेवटी यमाला निरुत्तर करून तिने यमाकडून वरदान मिळवले. त्या वरानुसार सत्यवानाला दीर्घायुष्य तर द्यमत्सेनाला दृष्टी आणि राज्य परत मिळाले. 

मुळात हे व्रत द्वादशीपासून करण्याची प्रथा आहे. परंतु आजच्या वेगवान जीवनात सर्वांनाच ते पाळणे शक्य नाही. 

Web Title: Vat Purnima 2023: The Vrat of Vat Purnima is not a one-day fast but it is a three day fast, read in detail!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.