वेदांत हा रोजच्या आचरणात आणला पाहिजे- ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 05:46 PM2020-12-22T17:46:07+5:302020-12-22T17:46:25+5:30
घराच्या छपराखाली ज्याप्रमाणे सर्व लहानलहान खोल्या येतात, त्याप्रमाणे वेदांतात इतर शास्त्रे येतात. वेदांताच्या गोष्टी किंवा ज्ञान हे पक्वान्नांच्या ज्ञानाप्रमाणे आहे. जो मनुष्य वेदांताचा नुसताच अभ्यास करतो त्याला त्यापासून फारसा फायदा होत नाही. वेदांत हा रोजच्या आचरणात आणला पाहिजे.
भगवंताची उपासना करणारे जे ऋषी असतात त्यांचे मन अशा एका अवस्थेमध्ये राहते की, त्या ठिकाणी परमात्माच सर्व काही करतो ही भावना स्पष्टपणे प्रकट होते. भगवंताशी एकरूप होऊन जाण्याचीच ती अवस्था आहे. ऋषींचा मीपणा नष्ट झालेला असल्याने, 'मी करतो, मी बोलतो, मी काव्य करतो,' ही भावनाच त्यांना नसून, 'परमात्मा करतो, परमात्मा बोलतो, परमात्मा मंत्र रचतो' असा स्पष्ट आणि खरा अनुभव त्यांना येतो. या थोर अवस्थेमध्ये ऋषींच्या तोंडून वेदमंत्र बाहेर पडलेले असल्यामुळे ते मानवाची कृती नव्हेत. वेद हे खरे अपौरुषेयच आहेत.
घराच्या छपराखाली ज्याप्रमाणे सर्व लहानलहान खोल्या येतात, त्याप्रमाणे वेदांतात इतर शास्त्रे येतात. वेदांताच्या गोष्टी किंवा ज्ञान हे पक्वान्नांच्या ज्ञानाप्रमाणे आहे. जो मनुष्य वेदांताचा नुसताच अभ्यास करतो त्याला त्यापासून फारसा फायदा होत नाही. वेदांत हा रोजच्या आचरणात आणला पाहिजे.
हेही वाचा : खरा गुरु कसा ओळखावा- ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज
खरे म्हणजे विद्वान लोक हा वेदांत अत्यंत कठीण करून जगाला उगीच फसवितात. मग सामान्य माणसाला वाटते की, 'अरे, हा वेदांत आपल्यासाठी नाही!' वास्तविक, वेदांत हा सर्वांसाठी आहे. मनुष्यमात्रासाठी आहे. वेदांताशिवाय मनुष्याला जगताच येत नाही. आपले आकुंचित मन विशाल करणे, आपण स्वार्थी आहोत ते निःस्वार्थी बनणे, हेच खऱ्या वेदांताचे मर्म आहे.
भगवंताच्या प्राप्तीचे नियम आणि व्यवहारातील वस्तू प्राप्त करून घेण्याचे नियम यांमध्ये फरक आहे. मनामध्ये वासना उत्पन्न झाली असतां ती तृप्त करून घेण्यासाठी देहाची आणि वस्तूंची हालचाल करणे, हा व्यवहार होय.
सूक्ष्म वासना देहाच्या सहाय्याने जड बनणे हे व्यवहाराचे स्वरूप आहे. याच्या उलट, भगवंत अत्यंत सूक्ष्म असल्यामुळे, त्याची प्राप्ती करून घेणे म्हणजे जडामधून सूक्ष्माकडे जाणे आहे. तेव्हां भगवंताचे साधन हेही जडापासून सूक्ष्माकडे पोचविणारे असले पाहिजे. जड देहाशी संबंधित आणि सूक्ष्माशी निकट चिकटलेले असे साधन असेल तर ते एक नामच होय.
जो नामात राहिला त्याचा वासनाक्षय झाला. पुष्कळ वेळा, चांगले अधिकारी जीव एखाद्या लहानशा वासनेमुळे अडकून पडतात. मग ते अध्यात्मदृष्ट्या चांगल्या कुळामध्ये जन्म घेतात. तिथे त्यांची वासना तृप्त व्हायला वेळ लागत नाही; म्हणून ते लहानपणीच जग सोडून जातात. त्यांच्या मृत्यूचे दुःख करणे बरोबर नाही.
वासना ही दुसऱ्या कोणत्याही उपायांनी तृप्त होण्यासारखी नसून, आपण जर भगवंताजवळ 'वास' ठेवला तरच ती नष्ट होते. वासना नष्ट झाली की बुद्धी भगवतस्वरूपच होईल. जेथे वासना संपली तेथेच भगवंताची कृपा झाली.
हेही वाचा : मनाचा कोपरा दररोज आवरा.