विजया स्मार्त एकादशी: ‘असे’ करा व्रतपूजन, श्रीविष्णू कृपा करतील; पाहा, शुभ मुहूर्त, मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2024 12:05 PM2024-03-05T12:05:17+5:302024-03-05T12:06:57+5:30

Vijaya Ekadashi 2024: विजया एकादशीचे महत्त्व अनन्य साधारण असल्याचे सांगितले जाते. जाणून घ्या...

vijaya ekadashi 2024 know about shubh muhurat vrat puja vidhi and significance | विजया स्मार्त एकादशी: ‘असे’ करा व्रतपूजन, श्रीविष्णू कृपा करतील; पाहा, शुभ मुहूर्त, मान्यता

विजया स्मार्त एकादशी: ‘असे’ करा व्रतपूजन, श्रीविष्णू कृपा करतील; पाहा, शुभ मुहूर्त, मान्यता

Vijaya Ekadashi 2024: माघ महिन्यातील वद्य पक्षात गजानन महाराज प्रकटदिन, दासनवमी यानंतर एकादशी व्रताचरण करण्यात येत आहे. प्रत्येक मराठी महिन्याच्या शुद्ध पक्षात आणि वद्य पक्षात एकादशी येते. या प्रत्येक एकादशीचे महत्त्व आणि मान्यता अगदी वेगवेगळ्या आहेत. तसेच या प्रत्येक एकादशीची नावेही अगदी वैशिष्ट्यपूर्ण आहेत. या एकादशींच्या नावावरून त्याचे वेगळेपण आणि महत्त्व विषद होत असते. माघ वद्य एकादशीला विजया एकादशी म्हटले जाते. विजया एकादशीचा शुभ मुहूर्त, महत्त्व, मान्यता आणि व्रताचरणाची सोपी पद्धत जाणून घेऊया...

मराठी वर्षात येणाऱ्या सर्व एकादशी दिनी भगवान श्रीविष्णूंचे पूजन केले जाते. पद्म पुराणानुसार, भगवान शंकरांनी स्वतः नारदजींना उपदेश करताना सांगितले होते की, एकादशी तिथी शुभ असून विजया एकादशीचे व्रत करतो, त्याला पुण्यफलप्राप्ती होते. तसेच हे व्रत पाळल्याने माणसाला प्रत्येक कामात यश मिळण्याची संधी वाढते, अशी श्रद्धा आहे. काही मान्यतांनुसार, रामायणात सीता मातेच्या अपहरणानंतर लंकेवर विजय मिळवण्यासाठी प्रभू श्रीरामांनी विजया एकादशीचे व्रत केले होते. ब्रह्माजींनी नारदजींना सांगितले होते की, जो साधक या व्रताचे माहात्म्य ऐकतो किंवा वाचतो त्याला वाजपेय यज्ञाचे फळ मिळते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.

विजया स्मार्त एकादशी: ०६ मार्च २०२४

माघ वद्य एकादशी प्रारंभ: ०६ मार्च २०२४ रोजी पहाटे ०६ वाजून ३० मिनिटे.

माघ वद्य एकादशी समाप्ती: ०७ मार्च २०२४ रोजी पहाटे ०४ वाजून १३ मिनिटे.

‘असे’ करा व्रतपूजन, श्रीविष्णू कृपा करतील

विजया एकादशी व्रत आणि श्रीविष्णू पूजनाचा संकल्प करावा. श्रीविष्णूंची चौरंगावर स्थापना करावी. श्रीविष्णूंचे आवाहन करावे. यानंतर पंचामृत अभिषेक अर्पण करून त्याचाच नैवेद्य दाखवावा. मुख्य अभिषेक करावा. अभिषेक झाल्यानंतर वस्त्र, गंध, अक्षता, तुळशीची पाने, ऋतुकालोद्भव फुले, फळे श्रीविष्णूंना अर्पण करावीत. धूप, दीप आणि नैवेद्य दाखवून श्रीविष्णूंची आरती करावी. यानंतर मनापासून नमस्कार करून सर्वांना प्रसादाचे वाटप करावे. शक्य असल्यास विष्णू सहस्रनामाचे पठण करावे. यथाशक्ती दान करावे.

एकादशी व्रतपूजनाची सांगता

विजया एकादशीचे व्रत आचरणाऱ्यांना मनात कोणत्याही प्रकारचा संशय ठेऊ नये. व्रतदिनी केवळ फलाहार घ्यावा. ज्यांना केवळ फलाहार करणे शक्य नाही, त्यांनी सात्विक आहार घ्यावा. शक्यतो कांदा, लसूणयुक्त उग्र पदार्थ खाणे टाळावे. एकादशी दिनी केलेल्या व्रतानंतर दुसऱ्या दिवशी उठून स्नानदिक कार्ये आटोपल्यानंतर की, एकादशी व्रत सांगतेचा संकल्प करून तो पूर्ण करावा. यावेळी श्रीविष्णूंची मनोभावे पूजा करावी. व्रताच्या यशस्वीतेसाठी श्रीविष्णूंचे आभार मानावेत. व्रत आचरण काळात कोणाबाबतही अपशब्द बोलू नयेत. पूजा करताना कोणाच्याही बाबतीत मनात ईर्ष्या उत्पन्न करू नये. तसेच व्रताचरण करताना अनावधानाने झालेल्या चुकांबाबत श्रीविष्णूंकडे क्षमायाचना करावी.
 

Web Title: vijaya ekadashi 2024 know about shubh muhurat vrat puja vidhi and significance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.