Vinayak Chaturthi 2024: शनिदेवाची अवकृपा टाळायची असेल तर बाप्पाची उपासना करा, कारण...!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2024 07:00 AM2024-05-11T07:00:00+5:302024-05-11T07:00:00+5:30
Vinayak Chaturthi 2024: विनायकी चतुर्थीनिमित्त जाणून घ्या की मनोभावे केलेली गणेश उपासना शनी प्रकोपासून आपले रक्षण का व कसे करते...!
शनी देवाला सगळेच जण घाबरतात. पण त्यांची कृपा ज्यांच्यावर होते त्यांना प्रगतीपासून कोणीच थांबवू शकत नाही. बाप्पा आपल्या सर्वांचा लाडका आहेच, पण त्याने खुद्द शनी देवाचाही आशीर्वाद मिळवून त्यांना आपलेसे कसे करून घेतले त्यामागची कथा जाणून घ्या.
बाप्पाला विविध नावांनी संबोधले जाते. त्यातच एक नाव आहे वक्रतुंड! लोकांना वाटते वक्रतुंड म्हणजे ज्याचे तोंड वाकडे आहे तो, पण असा त्याचा अर्थ नसून ज्याच्याकडे वाईट वळणावर चालणाऱ्या लोकांचे तोंड वाकडे करण्याची क्षमता आहे तो, असा अर्थ आहे. याशिवाय या नावाशी एक कथा जोडलेली आहे. कोणती, ते जाणून घेऊ.
गणपती बाप्पाच्या निर्मितीची कथा आपल्या सगळ्यांच्याच परिचयाची आहे. माता पार्वतीने मातीची मूर्ती बनवून त्यात प्राण फुंकले. त्याला मुलासमान मानून द्वारपाल म्हणून उभे केले. त्याने शंकरांना गृहप्रवेश नाकारला. शंकरांनी त्याच्याशी युद्ध केले आणि त्याचा शिरच्छेद केला. माता पार्वतीला वाईट वाटले. ते मूल परत मिळावे म्हणून हट्ट केला. ब्रह्मदेवाच्या सूचनेनुसार उत्तर दिशेला मरणासन्न अवस्थेत असलेल्या प्राण्याचे शीर कापून बालकाला जोडण्यास सांगितले. उत्तर दिशेला छोट्याशा हत्तीचे मरणासन्न कलेवर पडले होते. महादेवाच्या गणांनी त्याचे शीर कापून आणले आणि महादेवांनी ते बालकाच्या शरीराला जोडले. गजाचे आनन म्हणजेच शीर जोडले गेल्याने त्या बालकाला गजानन ओळख मिळाली.
या गजाननाला आशीर्वाद देण्यासाठी सर्व देवी देवता आले. त्यांनी गणरायाचे कौतुक केले आणि भेट म्हणून आपल्याकडची शक्ती, आयुधं देऊन त्याला बलशाली केले. भेटायला आलेल्यांमध्ये शनी देवाचाही समावेश होता. परंतु शनी देव प्रत्यक्ष भेटीसाठी घाबरत होते. कारण शनी देवाची दृष्टी ज्याच्यावर पडते, त्याचा सर्वनाश होतो. परंतु गजाननाच्या भेटीची ओढ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. शेवटी माता पार्वतीने त्यांना सांगितले, शनी देवा तुम्ही प्रेमदृष्टीने गणरायाची भेट घेतली असता त्याला काहीच त्रास होणार नाही याची मला खात्री आहे. मातेने मनातील संभ्रम दूर केल्याने शनीदेवाने गणरायाची भेट घेतली. आणि आपल्याकडून गणरायाला भेट म्हणून वक्रदृष्टीची शक्ती दिली. ज्यायोगे वाईट किंवा वाम मार्गाला जो जातो त्याच्यावर बाप्पाची वक्र दृष्टी पडून त्याचा धडा मिळतो.
अशी ही भेट मिळाल्याबद्दल गणरायाने शनी देवाचे आभार मानले आणि बाप्पाने शनी देवाचे काम सोपे केले. तेव्हापासून बाप्पा चांगल्या लोकांशी चांगलं आणि वाईट लोकांशी हटकून वागतो. म्हणूनच त्याला विघ्नहर्ता अशी उपाधी मिळाली.