Vivah Muhurta 2024: जुलैमध्ये आहेत फक्त ६ लग्नमुहूर्त, मग चार महिने बघावी लागेल शुभ मुहूर्ताची वाट!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2024 10:13 AM2024-06-26T10:13:48+5:302024-06-26T10:14:07+5:30
Vivah Muhurta 2024: यंदा लग्न मुहूर्त कमी असल्याने लोकांची फारच धांदल झाली, आता तर केवळ ६ मुहूर्त बाकी आणि नंतर चातुर्मास; सविस्तर वाचा.
लग्न ठरलं रे ठरलं की पहिली शोधाशोध करावी लागते हॉल मिळण्याची! अशातच लग्नमुहूर्त कमी असले की लोक ऍडव्हान्स बुकिंग करून हॉल रिझर्व्ह करतात. पण कितीही झालं, तरी लग्न ठरणं या योगाच्या गोष्टी आहेत. सगळ्यांनाच ठरवून करता येत नाहीत. काही जणांचं अलीकडेच लग्न ठरलं असेल तर त्यांना जुलै मध्ये लग्न उरकून घ्यावी लागेल, अन्यथा चार महिने थांबावं लागेल.
२०२४ मध्ये सूर्य शुक्रात गेल्याने एप्रिलनंतर मे आणि जूनमध्ये लग्नासाठी शुभ मुहूर्त नव्हता. त्यामुळे लग्नासारख्या शुभ कार्यक्रमांवर मर्यादा आली. जुलै मध्ये मुहूर्त निघाले, तेही मोजून सहा! जुलै १५ पर्यंत मुहूर्त आहेत. यानंतर १६ जुलै ते ११ नोव्हेंबरपर्यंत लग्नाचा शुभ मुहूर्त नाही.
गुरु आणि शुक्र अस्तामुळे गेल्या ६३ दिवसांपासून बंद असलेली शुभ कार्ये २८ जूनपासून पुन्हा सुरू होणार आहेत. हा मुहूर्तकाळ १५ जुलै पर्यंत मर्यादित असणार आहे. त्यानंतर १७ जुलै रोजी आषाढी एकादशी आहे आणि त्या दिवसापासून चातुर्मास सुरु होत आहे. तो कार्तिकी एकादशीला संपेल. या कालावधीत शुभ कार्य केली जात नाहीत. त्यामुळे लग्न मुहूर्तही निघत नाहीत. तुळशी विवाहानंतर लग्न कार्याला सुरुवात होते. यंदा १७ नोव्हेंबरपासून परत लग्न सराई सुरु होईल. चला तर जाणून घेऊया आगामी शुभ मुहूर्त!
आगामी लग्न मुहूर्त
जून : २९, ३०
जुलै : ९, ११, १२, १३, १४, १५
नोव्हेंबर : २२, २३, २५, २६, २७
डिसेंबर : ३, ४, ५, ६, ७, ११, १२, १४, १५, २०, २२, २३, २४, २६