संतान प्राप्तीसाठी केले जाते अचला सप्तमीचे व्रत; जाणून घ्या मुहूर्त, व्रत आणि कथा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2021 04:36 PM2021-02-17T16:36:59+5:302021-02-17T16:37:33+5:30
ज्यांना संतानप्राप्तीची इच्छा असते, त्यांनी हे व्रत केले असता त्यांनाही तेजस्वी व गुणी बालकाचे वरदान मिळते, असे म्हटले जाते.
माघ मासातील शुक्ल सप्तमीला अचला सप्तमी म्हणतात. हीच तिथी आपण रथसप्तमी या नावाने साजरी करतो. याशिवाय अचला सप्तमीला सूर्य सप्तमी तसेच आरोग्य सप्तमी असेही म्हणतात. यावर्षी १९ फेब्रुवारी रोजी शुक्रवारी अचला सप्तमी आहे. या दिवशी सूर्याची पूजा केली जाते. हे व्रत केल्यामुळे धन, संपदा आणि संतान प्राप्ती होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
पौराणिक कथेनुसार या दिवशी कश्यप ऋषी व त्यांची पत्नी अदिती यांच्या उदरी सूर्याचा जन्म झाला. हे बालक प्रखर तेजस्वी होते. त्याच्या जन्मामुळे सर्वत्र प्रकाशाचे साम्राज्य पसरले. म्हणून हा दिवस सूर्याची जयंती म्हणूनही साजरा केला जातो. ज्यांना संतानप्राप्तीची इच्छा असते, त्यांनी हे व्रत केले असता त्यांनाही तेजस्वी व गुणी बालकाचे वरदान मिळते, असे म्हटले जाते.
अचला सप्तमीचा व्रत : व्रतकर्त्याने आदल्या दिवशी म्हणजे षष्ठीला एकभुक्त अर्थात एक वेळ जेवून राहावे. सप्तमीला पहाटेच शुचिर्भूत व्हावे. नंतर शक्य असेल त्या धातूचा दिवा लावावा. सूर्याचे ध्यान करून तो दिवा वाहत्या पाण्यात सोडावा. या विधीनंतर स्वत:च्या घराच्या अंगणात रक्तचंदनाचे गंध उगाळून त्या गंधाने सारथी अरुणासह सात घोड्यांच्या रथात बसलेल्या सूर्याचे चित्र काढावे. त्या चित्राचे 'ध्येय: सदा सवितृमंडल मध्यवर्ती' या मंत्राने ध्यान करावे. नंतर त्या चित्राची श्रद्धापूर्वक पूजा करावी. शेणीच्या विस्तवावर मातीच्या पात्रात केलेल्या खिरीचा नैवेद्य सूर्यप्रतिमेला दाखवावा. शेवटी सात रुईची पाने, सात प्रकारचे धान्य, सात बोरे वाहून अष्टांग अर्घ्य द्यावे. ब्राह्मणभोजन घालावे. स्त्रिायांनी संध्याकाळी हळदीकुंकू समारंभ करावा. दुर्धर व्याधींपासून मुक्ती मिळावी म्हणून हे व्रत रूढ झाले.
अचला सप्तमीचा शुभ मुहूर्त: १८ फेब्रुवारी रोजी गुरुवारी ८ वाजून १७ मीनिटांनी सप्तमी तिथी सुरू होईल. १९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजून ५८ मीनिटांपर्यंत ही तिथी असेल.
अचला सप्तमीची प्रचलित कथा : इंदुमती नावाची एक गणिका होती. ती स्वत:चा उद्धार करून घेण्यासाठी वशिष्ठ नावाच्या ऋषिंकडे आली. त्यांनी तिला अचला सप्तमीचे व्रत करण्याचा सल्ला दिला. तिने त्या व्रताचे आचरण केले. त्यामुळे तिचा उद्धार झाला. तसेच आणखी एका कथेनुसार कृष्णपूत्र शाम्ब अतिशय बलवान होता. त्याला त्याच्या शक्तीचा अभिमान होता. अशाच भावनेतून त्याने एकदा दुर्वास ऋषींचा अपमान केला. दुर्वास ऋषींनी त्याला शाप दिला. शाम्बचे गर्वहरण झाले, परंतु ऋषींच्या शापामुळे त्याला कुष्ठरोग झाला. या रोगातून बरे होण्यासाठी त्याने दुर्वास ऋषींकडे उ:शाप मागितला. ऋषिंनी त्याला क्षमा दिली आणि सूर्याची उपासना करायला सांगितली. तसेच अचला सप्तमीचे व्रत करायला सांगितले. या व्रताचरणामुळे शाम्ब कुष्ठरोगातून मुक्त झाला. म्हणून या सप्तमीला आरोग्य सप्तमी म्हणूनही ओळखतात.