Waman Jayanti 2023: वामन जयंती निमित्त माहिती घेऊया वाकाटक कालीन नागपूरस्थित वामन मंदिराची!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2023 02:47 PM2023-09-26T14:47:56+5:302023-09-26T14:48:41+5:30
Waman Jayanti 2023: श्री विष्णूंचे दशावतार आपल्याला माहीत आहेच पण त्या अवतरांचे दर्शन घडवणारी मंदिरं क्वचितच आढळतात, रामटेक हे त्यापैकी एक!
>> सर्वेश फडणवीस
रामटेक येथे भगवान श्री विष्णूच्या दशावताराचे मंदिर आहे. तेथे श्रीराम, नृसिंह, वराह तसेच विष्णूंचा एक अवतार वामन अवतार आहे. वामन अवतारात श्रीविष्णूंनी बटु वामनाचे रूप घेतले व उन्मत्त बळीराजास याचक म्हणून यज्ञाच्या वेळी तीन पावलं भूमी मागितली. राजा उदार व दानी होता. तो वामनास म्हणाला, "अरे बटु, तुझी पावलं ती किती छोटी ? दिली तीन पावलं जमीन! चल घे." बटुने एका पावलात संपूर्ण पृथ्वी, दुसऱ्या पावलात अंतराळ व्यापले आणि विचारले, तिसरे पाऊल कुठे ठेवू? राजा म्हणाला, 'माझ्या मस्तकावर ठेवा बटुराज!' बळीच्या मस्तकावर तिसरे पाऊल ठेवून बळी व त्याच्या अर्धांगिनीस पाताळात ढकलले. त्याच्या मस्तकावर आपले पाऊल ठेवले. ते मंदिर बटुरूप धारण करणाऱ्या वामनाचे अर्थात श्रीविष्णूंचे त्रिविक्रम रूपाचे मंदिर आहे. कथा आपण सर्वच जाणतो. यातील प्रतिमा ही वामनाची - त्रिविक्रमांची अर्थात श्रीविष्णूंची आहे. वाकटक कालीन त्रिविक्रम मंदिर बहुतांशी नष्ट झाले असले तरी त्रिविक्रमाची मूर्ती सौष्ठवयुक्त असून लक्ष वेधून घेणारी आहे.
मंदिर लाल दगडाचे असून मंडप चारही बाजूंनी उघडा आहे. या मंडपास सहा दगडी खांब असून त्यापैकी चार खांबावर पद्मबंधाचे कोरीव काम आहे. पण इतर दोन खांब मात्र साधे आहेत. मंडपाचा वरचा भाग इतर ठिकाणाच्या गुप्त-वाकाटक कालीन मंदिराप्रमाणे सपाट असून या देवालयात मुळात ही त्रिविक्रमाची प्रतिमा आहे. इतर अवताराप्रमाणे येथे त्रिविक्रमच अपेक्षित आहे. त्रिविक्रमची दगडी प्रतिमा चतुर्भुज असून शिरावर किरीट आहे. त्याच्या शिरावर मागे तेजोवलय दाखवले असून कानात कुंडल आणि गळ्यात पदकासहित मुक्तहार आहे. वैजयंतीमाला दोन्ही पायांवर लोंबती दर्शविली आहे. कमरेवर उदरबंध असून अधोवस्त्र बांधले आहे. त्रिविक्रमांचे सर्व हात आता भग्न झालेले असून, त्यांचे रत्नजडीत अंगद अद्यापही दिसत आहे. त्रिविक्रमांचा डावा पाय मजबुतपणे रोवला असून उजवा पाय आकाश व्यापण्याकरिता उचललेला दिसतो. पण आता ते भग्न आहे. मंदिर छोटेसेच आहे. पण विदर्भातील प्राचीन मंदिरांपैकी एक आहे. आता आपण रामटेकला गेल्यावर गड मंदिरासोबत त्रिविक्रमाचे मंदिर ही बघायला हवे खरंतर हे आडवाटेवर आहे पण हा वैभवशाली आणि समृद्ध करणारा इतिहास येथे बघायला मिळत आहे. संस्कृतीच्या पाऊलखुणा तिथे आजही डौलाने उभ्या आहेत.