Waman Jayanti 2023: वामन अवतारात विष्णूंनी ज्या बलीराजाचा उद्धार केला तो आपल्या शेतकऱ्यांचा बळी राजा नाही!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2023 03:36 PM2023-09-26T15:36:02+5:302023-09-26T15:37:31+5:30
Waman Jayanti 2023: बटू वामनाने दैत्यराज बळी याचा पराभव केला असा गैरसमज करून अनेक जण अज्ञानापोटी वामन अवतारावर आक्षेप घेतात; त्यासाठी ही माहिती!
>> रोहन उपळेकर
आज भाद्रपद शुद्ध द्वादशी, भगवान श्रीमहाविष्णूंच्या पाचव्या श्रीवामन अवताराची जयंती आणि श्रीज्ञानेश्वरकन्या प्रज्ञाचक्षू श्रीसंत गुलाबराव महाराज यांची पुण्यतिथी! श्रीभगवंत अत्यंत भक्तवत्सल आहेत, त्यांचे आपल्या भक्तांवर स्वत:पेक्षाही जास्त प्रेम असते आणि विविध प्रसंगांनी आपले ते निखळ प्रेम श्रीभगवंत व्यक्त करतातच. अशीच एक निरतिशय प्रेमाची सुखद लीला म्हणजेच श्रीभगवंतांचा श्रीवामन अवतार होय!
प्रात:स्मरणीय भक्तराज श्री बलिराजा यांच्या उद्धारासाठी आणि देवतांचे राज्य त्यांना पुन्हा प्रदान करण्यासाठी हा अवतार झाला. पण भक्तिशास्त्रात सांगितलेले भक्तांचे माहात्म्यच खरेतर या लीलेतून अधिक उजळून निघताना दिसते. भक्त कोणत्याही परिस्थितीत आणि कोणत्याही थराला जाऊनही आपल्या लाडक्या श्रीभगवंतांना धरूनच ठेवतात, त्यांची प्राप्ती करूनच घेतात, हेच या सुमधुर लीलेतून दृग्गोचर होते.
येथे एका मुद्द्याचे स्पष्टीकरण करावेसे वाटते. सध्याच्या काळात अनेक धर्मविरोधी शक्ती आपापल्या अकलेचे तारे तोडून काहीही वाटेल ते, बिनबुडाचे मेसेज सोशलमिडियावर पाठवीत असतात. त्यांपैकीच एक म्हणजे, श्रीवामनावताराचा उगीचच निषेध करणे होय. आपल्याकडे शेतकऱ्याला 'बळीराजा' म्हणतात, त्यात या दैत्यराज बळीचा काहीही संबंध नाही. काही लोक लिहितात की, या श्रीवामनांनी भारताच्या मूळनिवासी बळीराजाचा व त्याच्या प्रजेचा नाश केला, बलीचे राज्य हरण केले वगैरे...
मुळात शेतकऱ्यांचा राजा बळी म्हणजे हा दैत्यराज बळी नव्हे. भगवान श्रीकृष्णांचे ज्येष्ठ बंधू भगवान श्रीबलिभद्र, श्रीबलराम हे शेतकऱ्यांचे राजे मानले जातात. म्हणूनच तर त्यांचे आयुध हल किंवा नांगर आहे, जे सर्व शेतकऱ्यांचे अत्यंत आवश्यक असे हत्यार आहे. 'हलधर' हे त्यामुळेच श्रीबलरामांचे एक नाव आहे. काही लोक नीट अभ्यास न करता श्रीवामनावताराचा फुकटच निषेध करीत बसतात. त्यांच्या समाजविरोधी, धर्मविरोधी बाष्कळ बडबडीकडे लक्ष देऊ नये ही विनंती. भगवान श्रीवामन हे प्रत्यक्ष भगवान श्रीमहाविष्णू आहेत. श्रीभगवंत कधीच कोणाचेही अकल्याण करीत नाहीत, हे आपण नेहमीच पक्के लक्षात ठेवले पाहिजे !