Waman Jayanti 2023: २६ सप्टेंबर रोजी वामन जयंती; आधुनिक काळाच्या दृष्टीने या दिवसाचे महत्त्व जाणून घेऊ!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2023 02:06 PM2023-09-25T14:06:44+5:302023-09-25T14:07:51+5:30

Waman Jayanti 2023: लहान मुलांनी बालवयातच शक्ती, भक्ती आणि युक्ती कुठे आणि कधी वापरायची याचा आदर्श वामन अवताराकडून घेतला पाहिजे.

Waman Jayanti 2023: Waman Jayanti on September 26; Let's know the importance of this day in terms of modern times! | Waman Jayanti 2023: २६ सप्टेंबर रोजी वामन जयंती; आधुनिक काळाच्या दृष्टीने या दिवसाचे महत्त्व जाणून घेऊ!

Waman Jayanti 2023: २६ सप्टेंबर रोजी वामन जयंती; आधुनिक काळाच्या दृष्टीने या दिवसाचे महत्त्व जाणून घेऊ!

googlenewsNext

देवांचे इंद्रपद बळीराजापासून पुन्हा मिळवून देण्यासाठी भगवान विष्णूंनी वामनावतार घेतला. वामनाचा जन्म भाद्रपद शुक्ल द्वादशीला श्रवण नक्षत्रावर झाला, असे भागवत पुराणात नमूद केले आहे. यंदा २६ सप्टेंबर रोजी वामन जयंती (Waman Jayanti 2023)आहे. त्यानिमित्त जाणून घेऊ या दिवसाचे पौराणिक आणि आधुनिक दृष्टीने महत्त्व!

पूर्वीच्या काळी वामन जयंतीचे व्रत लोक करत असत. मात्र अलिकडे या व्रताबद्दल फार कमी जणांना माहिती असते. हे व्रत आजच्या काळात महत्त्वाचे कसे? किंवा आजच्या काळात लहान मुलांना या व्रताचे महत्त्व समजवायचे असेल तर त्यांना 'मूर्ती लहान पण कीर्ती महान' या दृष्टिकोनातून ही कथा सांगितली पाहिजे. जी गोष्ट मोठमोठ्या पराक्रमी देवांना शक्य झाली नाही ती या बाल मूर्तीने आपल्या हुशारीवर साध्य करून दाखवली. सगळीकडे शक्ती प्रदर्शन करून भागत नाही तर काहीठिकाणी बुद्धी प्रदर्शनही करायला हवे, जसे बटू वामनाने केले आणि तीन पावले जमिनीचे दान मागून बळी राजासकट त्याने पूर्ण पृथ्वीच नव्हे तर आकाश, पाताळही बळी राजाच्या साम्राज्यातून मुक्त करून घेतले. त्याप्रमाणे लहान मुलांनी बालवयातच शक्ती, भक्ती आणि युक्ती कुठे आणि कधी वापरायची याचा आदर्श वामन अवताराकडून घेतला पाहिजे.

पूर्वीचे वामन व्रत :
वामनाचा जन्म माध्यान्ही झाला. म्हणून वामनाच्या पूजेचा संकल्प माध्यान्ह उलटून गेल्यानंतर केला जातो. नद्यांच्या संगमावर स्नान करून नंतर एक घट पाणी भरून घरी आणाावा. सुयोग्य जागी त्या घटाची स्थापना करावी. घटामध्ये पंचरत्ने घालावी. घटावर आपल्या शक्तीनुसार जे पूर्णपात्र उपलब्ध असेल त्यामध्ये तीळ, गहू, जव यापैकी एक धान्य भरून त्यावर कोऱ्या वस्त्राच्या घडीवर वामनाची प्रतिमा स्थापन करावी. प्रतिमेच्या पुढे वामनप्रित्यर्थ म्हणून दंड, कमंडलू, छत्र, पादुका आणि अक्षमाला ठेवावी. नंतर विधिवत षोडशोपचारी पूजा करावी. वामनाचे ध्यान करावे. रात्री जागरण करावे. सकाळी उत्तरपूजा करून देवाचे विसर्जन करावे. त्यामधील वामनाची प्रतिमा, वस्त्र, दक्षिणेसह पुरोहितांना दान द्यावे. तसेच अतिथीला भोजन, वस्त्र, उपयुक्त वस्तुचे दान करावे.

सद्यस्थितीत करता येईल असे व्रताचरण :
वामनाच्या तीन पावलांचे प्रतीक म्हणून तीन पुरोहितांना दहीभाताचे भोजन देण्याची परंपरा असावी. हे दान म्हणजे भगवान विष्णूंना केलेले दान आहे असे समजले जाते. बारा वर्षे हे व्रत आचरले जाते. परंतु, अलिकडच्या काळात या व्रताचे आचरण करणे सर्वांना जमेलच असे नाही. त्यामुळे ज्यांना विधीवत हे व्रत करणे शक्य नाही, त्यांनी या दिवशी वामन अवताराची कथा वाचून विष्णूंच्या कार्याची महती जाणून घ्यावी. खोबरे, खडीसाखर, साखरफुटाणे यांचा नैवेद्य दाखवून लहान मुलांना हा खाऊ वाटावा. मुलांमध्ये वामनाची बटू मूर्ती पाहावी, त्यांना संतुष्ट करावे, त्यांनाही वामनाची गोष्ट सांगून आपल्या संस्कृतीचा परिचय करून द्यावा आणि यथाशक्ती दानधर्म करावा. तसे करणे धर्मशास्त्राला अभिप्रेत आहे.

Web Title: Waman Jayanti 2023: Waman Jayanti on September 26; Let's know the importance of this day in terms of modern times!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.