इच्छाशक्ती प्रबळ करायची आहे? त्यावर आहे 'हा' एकमेव प्रभावी उपाय!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 08:00 AM2021-03-25T08:00:00+5:302021-03-25T02:30:07+5:30
इच्छाशक्ती वाढवणे म्हणजे मनाची ताकद वाढवणे. मन हे देखील एक इंद्रिय आहे आणि त्यावर संयम मिळवणे अतिशय कठीण! परंतु अशक्य अजिबात नाही.
'ज्याची इच्छाशक्ती प्रबळ त्याच्या कामाला येई बळ' असे म्हटले जाते. इच्छाशक्ती ज्याला आपण विल पॉवर म्हणून ओळखतो. अनेकांच्या बोलण्यात हा शब्द वरचेवर येतो. परंतु इच्छाशक्ती वाढवायची कशी, याबद्दल कोणीच बोलत नाही. चला तर जाणून घेऊया इच्छाशक्ती प्रबळ करण्याचा उपाय!
इच्छाशक्ती वाढवणे म्हणजे मनाची ताकद वाढवणे. मन हे देखील एक इंद्रिय आहे आणि त्यावर संयम मिळवणे अतिशय कठीण! परंतु अशक्य अजिबात नाही. प्रयत्नाने प्रत्येक गोष्ट साध्य होते. ज्याने मनावर नियंत्रण मिळवले, तो कोणत्याही बाबतीत यशस्वी होऊ शकतो. आणि मन नियंत्रित करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ध्यानधारणा!
पहाटेच्या वेळी उठून ध्यानधारणा सुरू करा. ते एका वेळेत, एका दिवसात, एका महिन्यात साध्य होणार नाही. परंतु रोजच्या सरावाने मनाची वाढणारी ताकद तुम्ही निश्चितच अनुभवू शकाल. ध्यानधारणा करताना शेकडो विचार येतील. येऊ देत. त्यांना परतवून लावा. एक वेळ अशी येईल जेव्हा 'मला कोणताही विचार करायचा नाही' हा विचार देखील येईल. तोही येऊ द्या. विचारांवर बंधन घालू नका. ते येत जात राहतील. परंतु रोजच्या सरावाने तुम्ही एक न एक दिवस विचारांची रिकामी पोकळी निश्चित अनुभवू शकाल. तो आनंद या व्यावहारिक जगात शोधूनही सापडणार नाही.
ही साधना करताना मन शांत ठेवा. यासाठीच पहाटेची वेळ ध्यान धारणेसाठी योग्य मानली जाते. दिवसभराचे व्याप-ताप मन शांत होऊ देत नाही. एकदा का ध्यानधारणेची सवय लागली, की कितीही कोलाहल का असेना, तुम्हाला हवी असलेली शांतता निश्चित गवसेल आणि तीच तुमची इच्छाशक्ती प्रबळ बनवेल.