मनुष्य सोडून इतर प्राण्यांमध्ये वाद न होण्याचे कारण जाणून घ्यायचे आहे? वाचा इयत्ता चौथीतली कविता!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2023 11:22 AM2023-07-11T11:22:17+5:302023-07-11T11:43:51+5:30
इतर प्राण्यांपेक्षा सगळ्या बाबतीत प्रगत असूनही मनुष्य प्राणी दुःखी, असमाधानी, नैराश्यमय आयुष्य का जगतोय? याचं उत्तर या कवितेत दडले आहे.
'बालपणीचा काळ सुखाचा' असे आपण म्हणतो. त्या वयात आपल्यावर कोणत्या जबाबदाऱ्या नाहीत म्हणून आपण आनंदी असतो का? तर नाही! मुलं जेवढं मिळालं त्यात आनंद मानतात. रागवतात, चिडतात पण पुढच्या क्षणी विसरून जातात आणि खेळायला सुरुवात करतात. त्यांच्या मनात कोणाबद्दलही भेदभाव, द्वेष, मत्सर या गोष्टी नसतात. त्यामुळे स्पर्धा नसते, ना स्वतःशी ना दुसऱ्यांशी. प्रत्येक दिवस ते आनंदाने जगतात. गृहपाठ करून मोकळे होतात. नसेल केला तर मार खाण्याची तयारी ठेवतात. या पारदर्शक स्वभावामुळे ते आनंदात असतात. यावरून बालपणीची एक कविता आठवते, प्रश्न! प्रभा मुळे यांची ही कविता आहे. यात त्यांनी बालमनातून मांडलेली कविता मोठ्यांच्या जगण्याचे मर्म सांगणारी आहे. ती वाचताना तुम्ही तालासुरात वाचाल आणि त्यावर विचार करून आपले जीवन जास्तीत जास्त निर्मळ, आनंदी आणि टेन्शन फ्री बनवण्याचा प्रयत्न कराल अशी अपेक्षा आहे.
प्रश्न
पशु पक्ष्यांना असते अवगत
जगण्याची ही कला
माणसाला का जमत नाही,
प्रश्न पडतो मला
चिमणी कधी म्हणत नाही
हवा मोरासारखा पिसारा
गाय काळजी करत नाही
मिळेल का चारा मला
कोकीळ कधी म्हणत नाही
काळा का माझा रंग
तो तर आनंदाने
गाण्यात असतो दंग
बैल कधी म्हणत नाही
मीच का राबू
कावळा कधी विचारत नाही
वापरू कोणता साबू?
ससा कधीच म्हणत नाही
मीच का भित्रा
वाघोबाचा शूरपणा
मागत नाही कुत्रा
जो तो जगतो आनंदाने
नाही कसली चिंता
माणसाच्या मनात असतो
विचारांचा गुंता!