शंभर वर्षं निरोगी आयुष्य जगायचे आहे? मग 'ही' शास्त्रशुद्ध आहारपद्धत आजपासूनच सुरू करा!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 12:59 PM2024-05-30T12:59:28+5:302024-05-30T13:00:39+5:30
food habit: आपण जसा आहार घेतो तशी आपली प्रकृती बनते; म्हणून संतुलित आहार कसा असावा याची शास्त्रशुद्ध पद्धत जाणून घ्या.
आपण काय खावे आणि काय खाऊ नये, याबद्दल आपल्यापेक्षा लोकांनाच आपल्या स्वाथ्याची काळजी दिसून येते. जो उठतो, तो वेगवेगळे सल्ले देतो. इंटरनेटवर तर सगळाच भुलभुलैया आहे. कोणी दोन वेळेस जेवणाचा सल्ला देतो, तर कोणी दर दोन तासांनी! कोणी म्हणतो पोळी खाऊ नका, कोणी म्हणतो भात खाऊ नका! सकाळी उठल्यावर अंश पोटी खाण्याच्या पदार्थांची यादी काढली, तर ती एवढी मोठी निघेल, की ते खाल्यानंतर दिवसभर जेवायची वेळच येणार नाही.
अशीच सगळी माहिती वाचून गोंधळलेल्या एक मावशी डॉक्टरांकडे गेल्या. 'काही केल्या माझे वजन कमी होत नाही, त्यावर काहीतरी उपाय सांगा डॉक्टर', असे म्हणाल्या.
डॉक्टरांनी त्यांना दहा बारा प्रकारच्या रंगीबेरंगी गोळ्या दिल्या. गोळ्यांची पुडी मावशींच्या हाती दिली.
मावशींचा पुढचा प्रश्न तयार होता. त्या म्हणाल्या, 'डॉक्टर या गोळ्या जेवणाआधी घ्यायच्या, की जेवणानंतर?'
डॉक्टर म्हणाले, `मावशी, या गोळ्या जेवणाआधी घ्यायच्या नाहीत, किंवा जेवणानंतरही घ्यायच्या नाहीत...'
`मऽऽऽग?' मावशींनी आ वासला.
'या गोळ्या जेवणा`ऐवजी' घ्या...!'
या प्रसंगातला गमतीचा भाग सोडा, परंतु खरोखरच, आहाराचे व्यवस्थापन उचित वेळी झाले नाही, तर अन्नापेक्षा जास्त गोळ्यांचा भडीमार शरीरावर होऊ लागतो. म्हणून शरीराची गरज ओळखून त्याला उचित वेळी अन्नपुरवठा केला पाहिजे. ज्यामुळे अन्नाचे रुपांतर आळसात किंवा मेदात न होता ऊर्जेत होईल. याबद्दल आयुर्वेद सांगते,
आयुष्यं भोजनं जीर्णे वेगानां चाविधारण्
ब्रह्मचर्यमहिंसान च साहसानां च वर्जनम्
सुश्रुतसंहितेतीतल या श्लोकानुसार, आधी जेवलेले अन्न पूर्ण जिरल्यावरच पुन्हा जेवावे. केवळ जेवणाची वेळ झाली म्हणून किंवा वेळ जात नाही म्हणून खात राहणे योग्य नाही. शरीराची चयापचय प्रक्रीया पूर्ण होण्यासाठी त्याला पुरेसा अवधी दिला पाहिजे. तरच, शरीराचे यंत्र सुरळीत चालेल. शिवाय, अन्नाचे पचन नीट होण्यासाठी वाघ मागे लावल्यागत न जेवता सावकाश जेवावे. जेवणात रुची घ्यावी. जेवणाचा आनंद आणि समाधान पंचेंद्रियांपर्यंत पोहोचले पाहिजे.
याचबरोबर मलमूत्र विसर्जनात दिरंगाई करता कामा नये. ब्रह्मचर्याचे पालन केले पाहिजे. म्हणजेच कामवासनांवर नियंत्रण ठेवले पाहिजे. हिंसा आणि नको तिथे साहस टाळले पाहिजे. या सर्व गोष्टींमुळे शरीराचे चक्र नियंत्रित राहते. आपल्या षडविकारांवर नियंत्रण राहते आणि सुदृढ देह व प्रसन्न जीनवशैलीमुळे आयुष्य वृद्धिंगत होते.