‘वारीकरी’ ते वारकरी... देव, देश, धर्माचं करणारी परंपरा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2020 08:26 AM2020-07-01T08:26:12+5:302020-07-01T10:03:15+5:30
समग्र विश्वाला कोरोना महामारीने भयभीत केले आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातील ही पहिली घटना आहे, ज्यामुळे पंढरपूरच्या वारीच्या आनंदापासून भक्त वंचित आहेत.
- -जगद््गुरू द्वाराचार्य डॉ. रामकृष्ण महाराज, लहवितकर, नाशिक
महाराष्ट्रात भीमा नदीच्या तीरावर असणाऱ्या पवित्र तीर्थक्षेत्र पंढरपूर येथील अधिष्ठाता दैवत जे पांडुरंग किंवा श्री विठ्ठल नावाने ओळखले जाते, त्यांच्या दर्शनासाठी नित्यनेमाने येणाºया भाविकाला ‘वारकरी’ असे म्हणतात. वारकरी हा शब्द ‘वारीकरी’ या शब्दाचा अपभ्रंश असून, संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या अभंगात याचा उल्लेख येतो.
आज भारत वर्षात या संप्रदायाचे कोट्यवधी भाविक आहेत. या संप्रदायाला अद्वैत तत्त्वज्ञानाचा व वेदायुक्त संतवाणी व अभंग याचा पाया आहे. या संप्रदायाचे अधिष्ठान दैवत विठ्ठल हे सरळ सर्वांना आश्रय देणारे असून, संप्रदायाचे तत्त्वज्ञानही सर्वसमावेशक आहे. सर्वांना भक्ती, ज्ञान, कर्म व उपासनेचा समान अधिकार आहे, असे सांगणारे आहे.
पंढरी वारीचा अपूर्व असा इतिहास आहे. महाराष्ट्राची लोकसंस्कृती व परंपराही पंढरीच्या वारीमध्ये सामावली आहे. वारकरी संप्रदायामध्ये पंढरपूरच्या वारीला विशेष महत्त्व आहे. या परंपरेनुसार आषाढी, कार्तिकी, माघी, चैत्री या महिन्यातील चार वाºया महत्त्वाच्या आहेत. आषाढी एकादशीला पंढरपुरात मोठी यात्रा भरते. त्यातूनच एकात्मतेला चालना मिळते. समग्र महाराष्ट्र संस्कृतीचे विराट दर्शन घडते. पंढरपूरची वारी हा वारकरी संप्रदायाचा प्रमुख आचारधर्म आहे. वारीची प्रथा परंपरा संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज यांच्या पूर्व काळापासून चालत आलेली आहे, वारीमुळे या संप्रदायाला वारकरी असे नाव पडले.
वारकरी संप्रदायाच्या प्रेमभक्तीचा प्रवाह अखंडित ठेवण्याचे महान कार्य पालखी सोहळ्यातून होत असते. सध्या होत आहे. समग्र विश्वाला कोरोना महामारीने भयभीत केले आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातील ही पहिली घटना आहे, ज्यामुळे पंढरपूरच्या वारीच्या आनंदापासून भक्त वंचित आहेत. वारकरी संप्रदाय हा राष्ट्रभक्त असल्याने केंद्र, राज्य शासनाच्या निर्देशानुसार आपली परम व्याकूळता सहन करून आपल्या स्वस्थानी थांबला आहे. अतिशय जबाबदारीने कर्तव्याची भूमिका या संप्रदायाचे अनुवर्ती बजावत आहेत. देव, देश, धर्म यांचे रक्षण करणे ही आमच्या वारकऱ्यांची परंपरा आहे. वारकरी भाविकांना यानिमित्ताने आपल्या घराजवळ व मठ, आश्रमाजवळ दहा पवित्र वृक्षांचे आरोपण करून राष्ट्रीय कार्यात सहभागी करावे.