मूर्तीला शेंदूर लावणे व काढणे हे पहिल्यांदाच झाले का? नाही; वाचा त्यामागील विज्ञान!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2022 11:12 AM2022-09-13T11:12:51+5:302022-09-13T11:13:54+5:30
अलीकडेच वणीच्या देवीचे नवे रूप पाहून इतर देवदेवतांच्या मूर्तीचा शेंदूर काढणार का असा अनेकांनी प्रश्न उपस्थित केला आहे, त्यावर हे सविस्तर उत्तर!
>> मकरंद करंदीकर
वणीच्या देवीच्या मूर्तीवरील शेंदुराचे प्रचंड कवच नुकतेच काढण्यात आले. सुमारे १००० वर्षांपासून मूर्तीवर जमा झालेले सुमारे २२०० किलो वजनाच्या शेंदुराचे कवच दूर झाल्यावर एका नव्याच रूपात देवीने दर्शन दिले. आता याबद्दल अनेक मुद्द्यांवर चर्चा, माहिती, छायाचित्रे वावरत होत आहेत. याबद्दलची कांही जुन्या शास्त्रानुसार आणि नव्या विज्ञानाच्या संदर्भाने ही थोडी वेगळी माहिती.
हजारो वर्षांपासून आपल्याकडे दगडांमधून अत्यंत सुंदर मूर्ती कोरण्याचे तंत्र सहजतेने सर्वत्र उपलब्ध होते. आपल्या देवांच्या मूर्ती या प्रामुख्याने काळ्या किंवा पांढऱ्या दगडामध्ये कोरल्या जात असत. हे दगड २ / ३ नद्यांच्या संगमाच्या ठिकाणाहून आणले जात असत. याचे अलिखित संकेत असे की अशा दगडांवरून शेकडो वर्षे नदीचे पाणी एकाच दिशेने वाहण्यामुळे अशा दगडांमध्ये कांही चुंबकीय धारण शक्ती निर्माण होत असावी.( ढोबळमानाने जसे विद्युत मोटारमध्ये विद्युत प्रवाहाद्वारे चुंबकीय क्षेत्र तयार केले जाते ) हिंदू धर्मामध्ये मूर्तिपूजा आणि त्याच बरोबर भजन, कीर्तन, मंत्रजप, यज्ञ आहुती मंत्र , सूक्त - ऋचा पठण, घंटा - घुंगुर- चिपळ्या- झांजा इ. वादन, शंख फुंकणे, सवाद्य गायन अशा विविध प्रकारे शास्त्रशुद्ध प्रकारच्या ध्वनिलहरींची निर्मिती केली जाते. ( आताचे बेफाम डीजे, कर्णे यांचा संबंध नाही ). या ध्वनीलहरी, शोषक दगडांच्या मूर्तीमध्ये शोषल्या जात असाव्यात.
तर शेंदूर हा पदार्थ पूर्वापार पूजाद्रव्य म्हणून वापरला जातो. नैसर्गिकरित्या शेंदुराच्या झाडावर येणाऱ्या फळांच्या बियांपासून तो मिळविला जातो. आयुर्वेदात अनेक रोगांवर, त्रासांवर औषध म्हणून शेंदूर वापरला जातो. त्या मध्ये शिसे हा धातू असतो. या शेंदुराच्या विविध रासायनिक संयुगांचा अगदी आजसुद्धा गंजरोधक, गळतीरोधक, झीजरोधक रंगामध्ये उपयोग केला जातो. देवांच्या मूर्तींना तो लावतांना विविध तेलांमध्ये खलून लावला जातो. शेंदुरातील धातूमुळे मूर्तीची ध्वनिलहरी पकडण्याची आणि धारण करण्याची शक्ती वाढते. गणपती, देवी, मारुती आणि विविध ग्रामदैवते यांच्यासाठी शेंदुराचे लेपन / रोगण स्वस्त पडते. कांही ठिकाणी तर आपल्याला मूर्तीवर चांदीचा वर्खसुद्धा लावलेला आढळतो. शेंदूर हा सौम्य विषारी आहे. ( हा पोटात गेला तर आवाजच जातो असे मानतात. ' कट्यार काळजात घुसली ' या नाटकात पंडितजींना गाण्यात हरविणे अशक्य असल्याने खांसाहेब त्यांना शेंदूर खाऊ घालतात असा प्रसंग सांगितला जातो.) त्यामुळे तो तेलात खलून लावला तरीही उंदीर किंवा अन्य कीटक तो खात नाहीत. पण वातावरणाच्या परिणामामुळे अशा लेपनाचा रंग काळपट होतो. या कारणामुळे आणि विविध वार्षिक उत्सवांच्या निमित्ताने, आधी लावलेल्या शेंदुरावरच वारंवार नवीन शेंदूर लेपन केले जाते. यामुळे मूळ मूर्तीवर पुटे चढू लागतात.मूर्तीतील मूळचे बारकावे, अवयवांचा तपशील, दागिन्यांचे आणि अन्य सौंदर्य दडून जाते. मूर्तीत बोजडपणा येतो. नवीन लेपन करतांना मूळ मूर्तीचे डोळे तसेच ठेऊन त्यावर सुद्धा लेपन केले जाते. नंतर पूर्णपणे नवीन डोळे बसविले जातात. देवासाठी चांदीचे डोळे दान करायला भाविक उत्सुकच असतात.
पण जेव्हा मूळची मूर्ती खूपच बोजड,बटबटीत दिसू लागते तेव्हा मूर्तीवरील आवरण काढावे लागते. पण हे शेंदूर आवरण काढायचे कसे ? शेंदुराच्या
वरणाखाली मूळ मूर्तीचे अवयव नक्की कुठे दडलेले असतील ? त्यासाठी मूर्तीवर कांही रासायनिक क्रिया करावी किंवा शस्त्राने ते कोरून काढावे तर मूर्तीला इजा होऊन देवाचा मोठाच कोप होण्याची भीती भक्तांना वाटत असते. अनेक ठिकाणी त्यासाठी या देवाचाच कौल घेतला जातो. कोकणातील एका प्रसिद्ध गणपतीच्या मूर्तीवरील असे आवरण काढणे अत्यावश्यक झाले होते. पण शस्त्र वापराने मूर्तीला इजा होईल म्हणून कुणीच तयार होई ना. शेवटी गावातील एका प्रमुख भटजींनी सगळ्या गावकऱ्यांच्या उपस्थितीत नारळ ठेऊन देवाला जाहीर प्रार्थना केली की देवा, या सेवेत जर तुला त्रास झाला तर त्याची शिक्षा तू मला दे, गावकऱ्यांना कांहीही त्रास देऊ नकोस. देवाने हे गाऱ्हाणे ऐकले. सगळे सुरळीत पार पडले.आता प्रभादेवीच्या श्री सिद्धिविनायक, पंढरपूरचा विठुराया, कोल्हापूरची महालक्ष्मी यांच्या मूर्तींच्या डागडुजीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरले जाते.
भिंतीमध्ये, शिळेमध्ये कोरलेल्या मूर्तींचे आवरण काढण्यापेक्षा पूर्ण मूर्तीचे चहूबाजूंनी असलेले आवरण काढणे कठीण असते. मूर्तीवरील अगदी आधी घातलेली आवरणे ही सुकून त्यावरील नंतरच्या आवरणांच्यापेक्षा कडक होतात. मूर्ती आणि आवरणांमध्ये पोकळी तयार होते. संपूर्ण कवचाला अनेक सूक्ष्म भेगा पडत जातात. कधीतरी अचानक अशा भेगांमधून बाहेरची हवा, मूर्ती नजीकच्या पोकळीत वेगाने घुसते आणि हे पूर्ण कवच मोठा आवाज होऊन गळून पडते. याला खोळ पडणे, चोला छोडना असे म्हटले जाते. खूप पूर्वी हा अपशकुन,अरिष्ट सूचक मनाला जायचा. पण आता अनेक ठिकाणी हा २ / ३ पिढ्यांमध्ये एकदा तरी होत असल्याने त्याची थोडी तरी माहिती पुढे जात राहते.
नवरात्रीच्या तयारीमध्ये वणीच्या देवीचे कवच काढल्यामुळे या देवीचे खूप वेगळे रूप सर्वांना पाहायला मिळत आहे. आत्तापर्यंत या देवीने तिचे नेत्र डाव्या खांद्याकडे झुकविले आहे असे वाटत होते. पण मूळ मूर्ती ही सरळ समोर पहाते आहे असे दिसते. मूर्तीत अधिक सुबकपणा असल्याचे दिसते.सप्तशतीमध्ये देवी रोज नव्या नव्या रूपात अवतरल्याची वर्णने आहेत. या नवरात्रीत महाराष्ट्रातील ही प्रमुख जागृत देवी खरोखरच नव्या रूपात अवतरली आहे.
।। या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता, नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम: ।।