आपण जगासाठी कोणी नसलो, तरी कोणासाठी आपण त्यांचे जग असतो; त्या प्रेमळ स्पर्शापासून दूर तर जात नाहीये ना?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 08:00 AM2021-06-10T08:00:00+5:302021-06-10T08:00:02+5:30

आवडत्या बाप्पानेही विश्व प्रदक्षिणा मारण्याच्या स्पर्धेत आपल्या आई बाबांना प्रदक्षिणा घालून तेच आपले विश्व आहे, हा आदर्श घालून दिला होता.

We are no one for the world, but for whom we are their world; Isn't that a loving touch? | आपण जगासाठी कोणी नसलो, तरी कोणासाठी आपण त्यांचे जग असतो; त्या प्रेमळ स्पर्शापासून दूर तर जात नाहीये ना?

आपण जगासाठी कोणी नसलो, तरी कोणासाठी आपण त्यांचे जग असतो; त्या प्रेमळ स्पर्शापासून दूर तर जात नाहीये ना?

Next

दमलेल्या बाबांची कहाणी तर घरोघरी ऐकायला मिळते. पण या दमलेल्या बाबांच्या मुलांची कहाणी सुद्धा दिवसेंदिवस दयनीय होत चालली आहे. एकूणच घरातले नातेसंबंध दुरावत चालले आहे. ज्या सुखसोयी मिळवण्यासाठी आपण जीवाचे रान करत आहोत, त्या सुखसोयी मिळूनही उपभोगण्यासाठी आपली माणसे मनाने जवळ नसली, तर त्या सुखाचा उपयोग तरी काय? 

असाच एक दमलेला बाबा कामावरून संध्याकाळी घरी येतो. ट्रेनची गर्दी, भांडणं, मारामारी, ऑफिसमध्ये वरिष्ठांची बॉसगिरी, सहकाऱ्याच्या कुरबुरी अशा सगळ्या परिस्थितीतून दमून भागून घरी पोहोचतो. मुलगा दार उघडतो आणि बाबांना पाहताच घट्ट मिठी मारतो. वैतागलेला बाबा त्याला दूर करतो आणि हात पाय धुवून पलंगावर पाठ टेकवतो. 

जेवून झाल्यावर मुलगा पुन्हा जवळ येतो आणि बाबांना म्हणतो, 'बाबा तुम्ही रोज किती पैसे कमवता?'
वडिलांचा शांत झालेला राग पुन्हा उफाळतो. ते त्याच्या अंगावर ओरडून म्हणतात, 'तुला काय करायचे आहे मी किती कमवतो आणि किती नाही ते? तुला काही कमी तर पडू देत नाही ना, मग झालं. मुकाट्याने जाऊन झोप.'
मुलगा म्हणतो, 'बाबा मला फक्त एवढं जाणून घ्यायचं होतं, की माझ्या पिगी बँक मध्ये किती पैसे जमा झाले की तुम्हाला नोकरी सोडून घरी आराम करता येईल.'

मुलाच्या शब्दांनी वडिलांच्या काळजात घर केलं. त्यांनी मुलाला हृदयाशी घट्ट धरलं. त्याचवेळेस त्याची आई आणि आजी दारात उभे राहून त्या दोघांकडे भरल्या डोळ्यांनी पाहत होत्या. त्याक्षणी दमलेल्या बाबाला जाणीव झाली, की मुलाला मिठी मारून, बायकोशी प्रेम संवाद साधून, आपल्या आईचा सुरकुतलेला हात हातात घेऊन कितीतरी दिवस लोटले. आपण आपल्या काळजीत अडकलेलो असतो, परंतु माझी काळजी करणारे लोक माझ्यापासून दुरावून चालणार नाही. 

आपण या जगासाठी विशेष कोणी नसलो, तरी कोणासाठी आपण त्यांचे जग असतो, ही जाणीव ठेवून त्या प्रेमळ स्पर्शांना पारखे होऊ नका. तेच आपले जग आहे. म्हणून तर आपल्या आवडत्या बाप्पानेही विश्व प्रदक्षिणा मारण्याच्या स्पर्धेत आपल्या आई बाबांना प्रदक्षिणा घालून तेच आपले विश्व आहे, हा आदर्श घालून दिला होता...!

Web Title: We are no one for the world, but for whom we are their world; Isn't that a loving touch?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.