आपण जगाला फसवू शकतो पण स्वतःला नाही; म्हणून...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2021 08:00 AM2021-09-04T08:00:00+5:302021-09-04T08:00:06+5:30
मुळात चूक घडली की केली, हे कळणे महत्त्वाचे आहे. चुका प्रत्येकाकडून होतात. चुकत चुकत आपण शिकत जातो. हातून चुका होणारच नाहीत, अशी व्यक्ती या जगात नाहीच.
चुकतो तो माणूस, चुका सुधारतो तो हुशार माणूस आणि घडलेल्या चुका पुन्हा घडूच देत नाही तो देव माणूस! अशी एक व्याख्या आपल्याकडे सांगितली जाते. हा साधा विचार आपल्याला कळूनही, पटूनही आपण बऱ्याचदा घडलेल्या चुकांच्या अपराधी भावनेत आयुष्य वाया घालवतो. मग या अपराधी भावनेतून स्वतःची सुटका कशी करावी, हा जर तुमचा प्रश्न असेल, तर शेवट्पर्यंत वाचा.
मुळात चूक घडली की केली, हे कळणे महत्त्वाचे आहे. चुका प्रत्येकाकडून होतात. चुकत चुकत आपण शिकत जातो. हातून चुका होणारच नाहीत, अशी व्यक्ती या जगात नाहीच. त्यामुळे चुका घडत असतील तर ते प्रगतीचे लक्षण आहे. परंतु वारंवार एकच चूक घडत असेल, तर तो आपल्या आकलन क्षमतेचा दोष ठरू शकतो. तर मूळ मुद्दा हा आहे, की चुका अजाणतेपणी घडल्या आहेत की जाणून बुजून केल्या आहेत. हे लक्षात घेतले पाहिजे.
उदा. रस्त्यावरून वाहन चालवताना सगळे नियम पाळूनही चुकून अपघात घडतात, ही नकळत किंवा परिस्थिती मुळे झालेली चूक आहे, तर नियमांचे उल्लंघन करत भरधाव वेगाने गाडी चालवत वाटेत येईल त्याला तुडवत जाणे ही जाणून बुजून केलेली चूकच नाही, तर अक्षम्य अपराध आहे. या दोहोंतला फरक लक्षात घेतला, तर आपल्या हातून घडलेल्या चुकांचे वर्गीकरण आपल्याला करता येईल.
काही गोष्टी स्थळ, काळ, परिस्थिती, व्यक्तिनुरूप घडून जातात. त्याक्षणी योग्य वाटलेला निर्णय आयुष्यभरासाठी अपराधी भाव निर्माण करणारा ठरू शकतो. अशा वेळी, सर्वात आधी घडून गेलेली गोष्ट का घडली, ती टाळता आली असती का, भविष्यात त्याचे काय पडसाद उमटणार आहेत, चूक मान्य केल्याने अपराधी भावातून मुक्तता होणार आहे का, या गोष्टींचा सर्वांगीण विचार करा. घडून गेलेल्या घडनेत कोणीच बदल घडवू शकत नाही, परंतु चूक मान्य केल्याने मनावरचा भार हलका होतो. त्या चुकीची जाणीव होऊन तीच चूक हातून पुन्हा घडत नाही. पुढच्या वेळेस निर्णय घेताना आपण सावध पवित्रा घेतो. शक्य तेवढ्या चुका टाळण्याचा प्रयत्न करतो.
यासाठी चूक झाली, हे मान्य करण्यासाठी मनाचा प्रामाणिकपणा व मोठेपणा हवा. झालेली चूक पुन्हा घडू नये यासाठी मनाचा जागरुकपणा हवा. या गोष्टींचा नीट विचार केला असता, अपराधीपणाचे ओझे आयुष्यभर मनावर वाहावे लागणार नाही. चुका होणे ही सामान्य बाब आहे, परंतू आपल्या चुकीची शिक्षा दुसऱ्याला भोगावी लागत असेल, तर ती चूक नाही अपराध आहे. या अपराधी भावनेतून मुक्त होण्यासाठी निदान क्षमा मागणे ही पहिली पायरी आहे आणि अशा चुका हातून घडू न देणे ही अंतिम पायरी आहे.
आयुष्य छोटं आहे. ते कुढत जगू नका. आनंदात जगा आणि दुसऱ्यांनाही आनंदात जगू द्या. आपण जगाला फसवू शकतो, पण स्वतःला नाही. स्वतःशी कायम प्रामाणिक राहा आणि आपल्या मनाचा कौल घेत राहा.