आपण कधी लंघन म्हणून तर कधी पथ्य म्हणून एकवेळ जेवतो, पण साने गुरुजींचे कारण काही वेगळेच होते!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2021 01:30 PM2021-12-02T13:30:00+5:302021-12-02T13:31:10+5:30
दुसऱ्यांच्या दुःखाने आपण दुःखी होणारी सहृदय माणसं आताच्या काळात बघायला मिळणे दुर्मिळच!
साने गुरुजी जेव्हा अमळनेरच्या शाळेत मुलांना शिकवत होते तेव्हा गरीब मुलांना ते नेहमी मदत करीत. कुणाची फी भरत, कुणाला पुस्तके घेऊन देत. कुणाला कपडे घेऊन देत. तुटपुंजा पगार, गावी पैसे पाठवून जेवढे शिल्लक राहात त्या पैशात ते वसतिगृहात जेवत. एकदा त्यांच्या शाळेचे मुख्याध्यापक गोखले सर यांनी वसतीगृहाचे रजिस्टार तपासले. तेव्हा त्यांना असे आढळून आले की, साने गुरुजी महिनाभरात फक्त एकवेळच जेवत. आपण रोज दोन वेळा जेवतो. म्हणजे तीस दिवसात साठी वेळा जेवण घेतो. परंतु रजिस्टरमधील नोंदीनुसार गुरुजींनी एका महिन्यात फक्त ३० वेळा जेवण घेतले. एक वेळच्या जेवणाचे पैसे वाचवून ते गरीब मुलांना मदत करीत असत.
गोखले सरांना हे कळताच खूप वाईट वाटले. त्यांनी साने गुरुजींना निरोप पाठवून घरी बोलावून घेतले. गोखले सर म्हणाले, `साने, आजपासून तुम्ही रोज आमच्या घरी जेवायचे.' असे म्हणून त्यांनी आपल्या पत्नीला ताबडतोब ताटं वाढायला सांगितली. वरण, भात, पोळी, दोन भाज्या, लोणचं, पापड असा सारा जेवणाचा उत्तम बेत होता. गरम गरम वरण भातावर साजूक तुपाची धार ओतून गोखले काकूंनी गुरुजींना जेवण सुरू करा, अशी विनंती केली.
त्यादिवशी रात्री गुरुजी जेवून खोलीवर परतले. दसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता गोखले काकूंनी पुन्हा जेवाची तयारी केली. सर आणि काकू गुरुजींची वाट पाहत बसले. तेवढ्यात एक विद्यार्थी गुरुजींचे पत्र घेऊन गोखले सरांकडे आला. ते पत्र वाचता वाचता सरांच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. काकू म्हणाल्या, `काय झालं, कुणाचे पत्र आहे?'
काही न बोलता सरांनी ते पत्र काकूंना दिले. `गोखले सर, तुमच्याकडचा पंचपक्वांनाच्या जेवणाचा बेत फार उत्तम होता. काकूंच्या हातच्या स्वयंपाकाची चव तर अवर्णनीयच आहे. पण मला क्षमा करा. यापुढे मी आपल्याकडे जेवायला येऊ शकत नाही. आपल्या देशात लाखो देशबांधव असे आहेत, ज्यांना पंचपक्वान्नाचे जेवणच काय, तर एकवेळचे जेवणही मिळत नाही. अशावेळी मी आपल्याकडे दोन वेळचे जेवण घेणे, हे पाप समजतो.'
डोळ्यातील अश्रू पुसत गोखले सर म्हणाले, `माझ्या पन्नास वर्षांच्या आयुष्यात मला जीवनाचा पहिल्यांदा खरा अर्थ कळला. स्वत:साठी सगळेच जगतात, परंतु दुसऱ्यांसाठी जे जगतात, त्यांना जीवनाचा खरा अर्थ समजला असे म्हटले पाहिजे.'
गोखले सरांनी त्या दिवसापासून आपला साहेबी थाट सोडला. मऊ गादीवर झोपणे सोडले. स्वत: चरख्यावर सूत कातून खादी वस्त्र वापरू लागले. जीवनात साधेपणाआणा. सेवेचा वाटा उचलला. अशा रितीने त्यांचे अंतर्बाह्य परिवर्तन झाले.