षोडशोपचार पूजा हा शब्द आपण वापरतो, पण त्यातले सोळा उपचार कोणते ते माहीत आहे का? वाचा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2022 02:44 PM2022-01-03T14:44:04+5:302022-01-03T14:44:20+5:30
पुढच्या वेळेस हा शब्द वापरताना आपल्या डोळ्यासमोर हे सर्व सोळा उपचार येतील हे नक्की!
देवाची पूजा करताना गंध, अक्षता, फुले यांचा आपण नेहमीच करतो. प्रासंगिक पूजेच्या वेळी मात्र ताम्हन, पळी पंचपात्र, नैवद्य इत्यादी गोष्टींची भर पडते शिवाय आणखीही उपचारांची जोड दिली जाते, त्याला आपण षोडशोपचारे पूजा केली असे म्हणतो. यातील षोडशोपचार नेमके कोणते, ते जाणून घेऊया.
या पूजेमध्ये पुढील सोळा उपचार देवास देतात.
१. आसन : देवाचे आसन हे आपल्यापेक्षा उंच असते.
२. पाद्य : म्हणजे पाय धुण्याकरिता दिलेले पाणी. ते शंखाने किंवा स्वतंत्र देतात.
३. अर्ध्य : पाय धुतल्यानंतर सत्कार करण्यासाठी अर्ध्य दिले जाते. अर्ध्य म्हणजे गंध, अक्षता घालून जलसमर्पण करणे.
४. आचमन : म्हणजे पिण्याकरिता किंवा चूळ भरण्याकरिता देवाला पाणी देणे.
५. स्नान : दूध, दही, तूप, मध आणि साखर या पाच घटकांनी क्रमाने देवतेला स्नान घालणे. त्यालाच पंचामृत स्नान म्हणतात.
६. वस्त्र : देवा वस्त्र अर्पण करतात.
७. गंधलेपन : देवाला गंध, हळद कुंकू, अक्षता लावून लेपन करतात.
८. पुष्प : पत्र म्हणजे फुले आणि पत्री म्हणजे पाने, देवाला आवडणारी फुले, पाने अर्पण करतात.
९. धूप : देवासमोर धूप जाळणे किंवा उदबत्ती लावणे.
१०. दीप : सर्व पूजा झाल्यावर देवाला आरती ओवाळणे आणि आरती म्हणणे.
११. नैवेद्य : पूजा पूर्ण झाल्यावर देवाला फळ, मिठाई किंवा गूळ खोबरे अशा स्वरूपाचा नैवेद्य दाखवणे.
१२. तांबूल : जेवण झाल्यावर आपण जसा विडा खातो, तसा देवालाही नैवेद्य झाल्यावर विडा किंवा तांबूल देणे.
१३. दक्षिणा : रोजच्या पूजेत दक्षिणा आवश्यक नसते परंतु प्रासंगिक पूजेत दक्षिणा बाजूला काढून ती दान करतात.
१४. प्रदक्षिणा : सर्व उपचार पूर्ण झाल्यावर स्वतः भोवती प्रदक्षिणा मारून भगवंताच्या अस्तित्वाची आपल्या सभोवताली अनुभूती घेणे.
१५. नमस्कार : आपल्या हातून झालेली पूजा देवाने स्वीकारावी यासाठी चूक भुलीची माफी मागून देवाला नमस्कार करणे. मंत्रपुष्पांजली म्हणणे.
१६. प्रार्थना : वरील सर्व उपचार देवाने मोठ्या मनाने स्वीकारावेत आणि आशीर्वाद द्यावा म्हणून प्रार्थना करणे.
असे हे सोळा उपचार. पुरुषसूक्तातील एक एक ऋचा म्हणून एक एक उपचार देवाला अर्पण करण्याची पद्धत प्रचलित आहे. पुरुषसुक्तात सोळा ऋचा आहेत. शिवाय पुराणोक्त मंत्र म्हणण्याची पद्धत आहे. मात्र आजच्या काळात ही स्तोत्र पाठ नसल्याने भाविक पाठ असलेले श्लोक म्हणून षोडशोपचारे देवाची पूजा करतात.