मोत्याची अंगठी वापरताय? मग तुम्हीदेखील निश्चितच अनुभवले असतील 'हे' फायदे!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2021 02:28 PM2021-05-26T14:28:31+5:302021-05-26T14:28:56+5:30
मोती या रत्नात आपली इच्छापूर्ती करण्याची क्षमता असते, म्हणून मोत्याच्या अंगठीला मोठ्या प्रमाणात मागणी असते.
प्रत्येकाला सोने-चांदी-हिऱ्याचेच दागिने भुरळ घालतात असे नाही. तर काही जणांना राजेशाही थाट दर्शवणारे मोत्याचे दागिने जास्त प्रिय असतात. त्यातही मोत्याच्या अंगठीला तर सर्वात जास्त मान असतो. कारण, आयुष्यातील अनेक समस्या दूर करण्याचे सामर्थ्य मोत्याच्या अंगठीत असते. मोती असे एक रत्न आहे, जे चिंतामणी प्रमाणे कार्य करते. अर्थात आयष्यातील चिंता दूर करते. संकटाच्या अनेक प्रसंगांना शांतपणे सामोरे जाण्यासाठी मोत्याची अंगठी वापरा असा ज्योतिषाकडून सल्ला दिला जातो. मोत्याची शीतलता आपल्या स्वभावात उतरावी, ही त्यामागील भावना असते. शिवाय या रत्नात आपली इच्छापूर्ती करण्याची क्षमता असते, म्हणून मोत्याच्या अंगठीला मोठ्या प्रमाणात मागणी असते. या अंगठीच्या वापरामुळे कोणकोणते लाभ होतात, जाणून घेऊया.
जर कौटुंबिक कलह तुमच्या आयुष्यात पाठलाग सोडत नसेल आणि पती-पत्नीमध्ये मतभेद असतील तर ही समस्या दूर करण्यासाठी पती- पत्नी यांच्यापैकी एकाने मोत्याची अंगठी वापरावी. त्याचा नक्की लाभ होईल आणि घरात शांती व समृद्धी राहील.
आपल्या मुलांचे आरोग्य ठीक नसल्यास, मुलांचे चित्त स्थिर नसल्यास मोती हे रत्न मानसिक आरोग्यावर रामबाण उपाय ठरते. परंतु मुलांकडून अंगठी गहाळ होण्याची भीती असल्याने त्यांना गळ्यातल्या दोऱ्यात मोती घालून द्यावा.
योग्य वेळी योग्य निर्णय न घेतल्याने आयुष्यात अनेक चुका घडतात. परंतु तुम्हाला जर निर्णय क्षमतेत अभाव आहे असे वाटत असेल, तर गणपती बाप्पाला मोत्याची कंठी घालावी आणि दररोज मंगळवारी गणपती स्तोत्राचे पठण करावे. त्याचा खूप फायदा होईल आणि संभ्रमाची परिस्थिती संपेल.
आयुष्यात रोजगार असूनही, पैशाची कमतरता असते आणि त्यामुळे व्यक्ती नेहमीच त्रस्त असते, अशा परिस्थितीत त्या व्यक्तीने देवघरात कोणत्याही धान्याची रास मांडून त्यावर पिवळ्या कापडात २ मणी बांधून ठेवावे. लक्ष्मीप्राप्तीसाठी हा उपाय सुचवला जातो आणि अनेकांना त्याचा लाभदेखील होतो.
अनेक जण स्वभावाने चांगले पण शीघ्रकोपी असतात. आपल्या रागामुळे ते स्वतःचेच नुकसान करून घेतात. अशा लोकांसाठी मोत्याची अंगठी खूप फायदेशीर ठरते. शिवाय त्यांनी आपल्या देवघरात धान्याची राशी मांडून पांढऱ्या कापडात शुभ्र मणी गुंडाळून ठेवावा. त्या उपायाने मन शांत होईल व रागावर नियंत्रण मिळवता येईल.
जेव्हा अथक प्रयत्नांनंतरही एखादी व्यक्ती व्यावसायिक कारकीर्दीत प्रगती करू शकत नाही, अशा व्यक्तीने मोत्याची चांदीचे कोंदण असलेली अंगठी घालावी. त्यामुळे व्यवसायातील अडथळे दूर होतील आणि प्रगतीची दारे खुली होतील.
काही घरांमध्ये सतत आजारपण असते. विशेषतः जेव्हा त्या घरातल्या स्त्रिया, वृद्ध किंवा मुले आजारी पडतात तेव्हा ही समस्या आणखीनच वाढत जाते. अशा स्थितीत पौर्णिमेच्या दिवशी तांदळाच्या राशीवर मोती ठेवून तो पूजा झाल्यावर दान करावा. त्यामुळे घरातून आजार दूर होतात, असे ज्योतिषशास्त्र सांगते.