आपणच काय, तर संतदेखील करत असत देवाशी भांडण!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: December 9, 2020 07:20 AM2020-12-09T07:20:00+5:302020-12-09T07:20:01+5:30

विठ्ठलमय झालेले तुकाराम महाराज सांगतात, भगवंताशी इतके समरस व्हा, की अन्य दुय्यम गोष्टींना आयुष्यात थाराच उरणार नाही. सखा, सोबती भगवंत झाला, की प्रत्येक संवाद त्याच्याशीच होईल. मग ते लाडिक भांडण का असेना...!

What about you, even the saints used to quarrel with God! | आपणच काय, तर संतदेखील करत असत देवाशी भांडण!

आपणच काय, तर संतदेखील करत असत देवाशी भांडण!

googlenewsNext

ज्योत्स्ना गाडगीळ 

देवाने सगळे काही देऊनही आपण त्याने काय नाही दिले हे शोधून त्याच्याशी भांडत असतो, त्याला बोल लावत असतो, दोष देत असतो. आपल्यासारखाच संतांचाही देवाशी वाद होत असे. मात्र, आपली भांडणे व्यावहारिक पातळीची, तर संतांची भांडणे अध्यात्मिक पातळीवरची असत. असाच एक भांडणाचा प्रसंग तुकोबारायांनी आपल्या अभंगातून सविस्तर मांडला आहे. भांडणारे कारण, आरोप, माफी, सारे काही त्या अभंगात एकवटून आले आहे. 

हेही वाचा : संत ज्ञानेश्वरांनी नामस्मरणाआधी घेतले होते योगसाधनेचे धडे!

तुझे म्हणविता काय नाश झाला, ऐके बा विठ्ठला किर्ती तुझी।
परी तुज नाही आमुचे उपकार, नामरूपा थार केलियाचे।
समूळी संसार केला देशधडी, सौडली आवडी ममतेची।
लोभ दंभ काम क्रोध अहंकार, यांसी नाही थार ऐसे केले।
मृत्तिका पाषाण तैसे केले धन, आपले ते कोण पर नेणो।
तुका म्हणे झालो देहासी उदार, आणीक विचार काय तेथे।

तुकाराम महाराज देवाजवळ ज्या सलगीने बोलता, भांडतात, लडिवाळपणाही करतात, त्याची बरोबरी क्वचितच दुसरा कोणी भक्त करत असेल. त्यांच्या संवादातून आपल्यासारख्या वाचकांना भक्तिभावनेचे एक मनोहर दर्शन घडते. ते म्हणतात, देवा, आम्ही भक्त स्वत:ला `देवाचे' म्हणवतो. त्यामुळे आमचे केवढे नुकसान झाले आहे, याची तुला थोडी माहिती देतो. विठ्ठला, तुझी कीर्तीच अशी आहे, की जो तुझ्या नादाला लागतो, `त्याचा संसार पार देशोधडीला लागतो. त्याच्या मनातील आप्तजनांबद्दलची ममता पार नाहीशी होते. 

त्याचे एरव्ही सतत साथ देणारे विकाररूपी मित्र, हो, विकारांचे लिसित म्हणजे प्रपंच! तेही निरश्रित होतात. लोभ नाही, दंभ नाही, काम नाही, क्रोध नाही, अहंकार नाही, सगळे सोडून जातात. कारण ज्या चित्तात कृष्ण विठ्ठलाने जागा व्यापली, तेथे या लोकांना राहायला थारा कुठला? धनाचा मान संसारात केवढा असतो? पण विठ्ठल विठ्ठल अशी धुन लागली की सोन्याची किंमत माती, दगडाइतकीच! आणि व्यवहारात जिथे आपला कोण, परका कोण याचे तारतम्य पाळावे लागते व धूर्तपणे आपला फायदा करून घेतला जातो, तीही सोय भक्ताला नाहीशी होते. त्याला आप-पर भाव उरत नाही. 

तुकाराम महाराज इथे छद्मी स्तुतीच त्या विठ्ठलाची करत आहेत. पुढे म्हणतात, प्रपंचात सगळे सांभाळायचे असते, तर आम्ही मात्र स्वत:चा देह सुद्धा उदारपणे  देवाच्या स्वाधीन केला आहे. आता आणखी हे विठ्ठला तुला काय सांगू?

विठ्ठलमय झालेले तुकाराम महाराज सांगतात, भगवंताशी इतके समरस व्हा, की अन्य दुय्यम गोष्टींना आयुष्यात थाराच उरणार नाही. सखा, सोबती भगवंत झाला, की प्रत्येक संवाद त्याच्याशीच होईल. मग ते लाडिक भांडण का असेना...!

हेही वाचा : कृष्णालाही भुरळ पाडणारी, मीराबाईंच्या भजनाची अवीट गोडी!

Web Title: What about you, even the saints used to quarrel with God!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.