संतांची लक्षणे कोणती व ते कोणत्या कुळात जन्म घेतात, सांगताहेत तुकोबा महाराज!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2021 05:27 PM2021-02-16T17:27:34+5:302021-02-16T17:27:58+5:30
भक्तिमंदिराचा कळस म्हणून ओळखले जाणारे संत तुकाराम महाराज संतांची लक्षणे सांगत आहेत.
संतवृत्ती शिकवावी लागत नाही, तर ती उपजतच असावी लागते. मग हे संत कोठे जन्म घेतात, त्यांच्या जन्माची पार्श्वभूमी काय असते? कोणत्या परिस्थितीत त्यांची जडण घडण होते? ते समाजाला वळण कसे लावतात? या सर्व प्रश्नांचा उहापोह संत तुकाराम महाराजांनी प्रस्तुत अभंगात केला आहे.
शुद्ध बीजापोटी, फळे रसाळ गोमटी,
मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी,
सर्वांग निर्मळ, चित्त जैसे गंगाजळ,
तुका म्हणे जाती, ताप दर्शने विश्रांती।
संत तुकारामांचा हा अभंग फार प्रसिद्ध आहे व पहिले चरण तर मराठी भाषेतील सिद्धान्तरूप सुभाषित ठरले आहे. अनुहरण शास्त्राप्रमाणे ज्या कुळात उत्तमोत्तम पुरुष किंवा सद्गुणी स्त्रिया पूर्वापार जन्मत आल्या आहेत, त्या कुळात थोर अवतारी व्यक्ती जन्माला येतात हे सत्य आहे. कारण जे शरीर, भावना, मनोमय कोष अवतारी कार्याला आवश्यक असतात त्यांची उपलब्धता त्या कुळात जास्त असते.
तुकारामांच्या कुळातील पूर्वजही अनेक पिढ्या विठ्ठलभक्त होते. संत ज्ञानेश्वरांच्या कुळातही अनेक पिढ्या भक्तीमार्गातील उपासक झाले होते व नंतर त्या कुळात ज्ञानेश्वर व इतर तीन भावंडे जन्माला आली. असे संत कसे असतात? त्यांचे बोलणे मधुर असते, हितकारक असते, अमृतासारखे कल्याणप्रद असते व देवकार्यासाठी त्यांचा देह कारणी लागतो, कारण संसारातील छोट्या गोष्टीत त्यांना रस नसतो. ते शुचित्वसंपन्न असतात. शरीराने ओंगळपणाने राहत नाहीत. त्यांचे चित्तही गंगेच्या पाण्यासारखे निर्मळ असते. पावन असते. अर्थात त्यांच्या चित्ताला विकार शिवत नाहीत.त्यांच्या दर्शनाने, त्यांच्या भोवतीच्या वातावरणाने, त्यांची कृपादृष्टी झाल्याने लोकांच्या मनातील चिंताही दूर होते आणि मनस्ताप निवतो. त्यानेच लोकांना खूप शांती मिळते.
तुकाराम महाराजांनी केलेले हे वर्णन प्रत्ययकारी आहे. खरोखर अशा सुस्वभावी, पर कारुणिक संतांचा सहवास अमृतमयच असतो. मात्र असे संत उत्तम कुळातच सामान्यपणे जन्माला येतात विंâवा ज्या कुळात जन्माला येतात, त्या कुळाचा उद्धार करतात.