पिशवीत झाकून जपमाळ ओढण्यामागे शास्त्रं काही असतं का? जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 01:15 PM2022-06-28T13:15:18+5:302022-06-28T13:20:01+5:30

उपासनेचा एक भाग म्हणून काही भाविक जपमाळ पिशवीत झाकून नामजप करतात. धर्मशास्त्राच्या दृष्टीने ते बंधनकारक आहे की ऐच्छिक? चला जाणून घेऊ. 

What are the scriptures behind covering a bag and pulling a japmala? Find out! | पिशवीत झाकून जपमाळ ओढण्यामागे शास्त्रं काही असतं का? जाणून घ्या!

पिशवीत झाकून जपमाळ ओढण्यामागे शास्त्रं काही असतं का? जाणून घ्या!

Next

उपासना करण्याची पद्धत प्रत्येकाची वेगवेगळी असते.  काही जण मोठमोठ्याने स्तोत्र म्हणतात, काही जण मनातल्या मनात म्हणतात. काही जणांना तास दोन तास पूजा केल्याशिवाय समाधान मिळत नाही तर काही जण देखल्या देवा दंडवत करून मोकळे होतात. व्यक्ती तितक्या प्रकृती! अशात काही नवशिक्यांचा गोंधळ होतो, की उपासनेची नेमकी पद्धत कोणती?

याबाबतीत अनेक संतांनी, आध्यात्त्म मार्गातील अधिकारी पुरुषांनी मार्गदर्शन केलेले आहे. व्याख्याता धनश्री लेले 'सांगे कबीर' या व्याख्यानातून संत कबीरांचे या संदर्भात असलेले विचार मांडतात- साधना गुप्त असावी असे म्हणतात. अर्थात त्याचे प्रदर्शन नको!त्यादृष्टीने अनेक भाविक जपमाळ पिशवीत ठेवून जप करतात. जेणेकरून तो इतरांना कळू नये. वास्तविक पाहता पिशवीतील माळ दिसत नसली तरी जपमाळ ओढणे सुरू असल्याची क्रिया बाहेर प्रत्येकाला कळते. यावरून ती क्रिया गुप्त आहे असे समजावे का? तर संत कबीर म्हणतात, की माळ नुसती घालून उपयोग नाही, ती फिरलीही पाहिजे. फिरणाऱ्या मण्यांबरोबर देवाचं नावंही घेतले गेले पाहिजे. नाव नुसते घेऊन उपयोग नाही तर 'मनका मणका फेर' अर्थात प्रत्येक मण्याबरोबर मनही नाम:स्मरणात गुंतले गेले पाहिजे. 

माला फिरे करमाही, जीभ फिरे मुखमाही 
मनवा तो चहू दिसी फिरे, ये तो सुमीरन नाही।

म्हणजे हाताने जपमाळ ओढणे सुरु आहे, मुखाने नाव घेणेही सुरू आहे पण मन स्थिर नसेल आणि विषयात गुंतले असेल तर अशा नाम घेण्याचा काहीच उपयोग नाही. कबीरांना अपेक्षित असलेला जप कोणता, तर ' ना जीभ फिरे ना मन डोले' म्हणजेच वरवर नाव न घेता ते इतके मनापासून घेतले गेले पाहिजे की जीभ स्थिर असेल, मन स्थिर असेल तरी नामःस्मरण सुरू असेल. त्यासाठी अनुसंधान हवे. तेही कसे त्याचेही उदाहरण कबीर देतात -

सुमीरन की सुदी यो करे, जो घागर पनिहार, 
हाले डोले सुरतीमे, कहे कबीर विचार।

ज्याप्रमाणे एखादी स्त्री, डोक्यावर तीन चार घागरींचा भार वाहून नेत रस्त्याने चालत जाते तेव्हा वाटेत तिला अनेक जण भेटतात. त्यांच्याशी ती बोलते. गप्पा मारते. हसते. पण हे सगळं करताना पाण्याचा एक थेंबसुद्धा घागरीतून डचमळू देत नाही. याला म्हणतात अनुसंधान! 

आपल्याला नित्य कर्म करत राहायचे आहे. पण त्याबरोबर सातत्याने भगवंताचे नाव घेत राहायचे आहे. त्यासाठी हातात जपमाळ असो वा नसो, एवढी स्थितप्रज्ञता मिळवायला हवी की जीभ आणि मन स्थिर ठेवूनही नामःस्मरण सुरू राहील! ती स्थिती गाठेपर्यंत नामःस्मरण सातत्याने करत राहणे हाच उपाय आहे. त्यासाठी सुरुवातीला हातात जपमाळ लागेल आणि नंतर मनाची एकतारी सुद्धा पुरेशी ठरेल!

Web Title: What are the scriptures behind covering a bag and pulling a japmala? Find out!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.