जन्म आणि मृत्यू यात अंतर किती? फक्त तीन फुटांचे! कसे? वाचा ही गोष्ट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 12:21 PM2021-03-01T12:21:45+5:302021-03-01T12:21:53+5:30
जिद्द कधीच सोडू नये. आपल्या आयुष्याला कलाटणी देण्यासाठी एक क्षणसुद्धा पुरेसा असतो. त्या क्षणाची जरुर प्रत्येकाने वाट बघावी.
एक तरुण सातत्याने येणाऱ्या अपयशामुळे खूपच खजिल झाला होता. कौटुंबिक समस्या आणि एकामागोमाग एक येणारे अपयश यांना तोंड द्यावे तरी कसे? प्रश्न संपत नव्हते, समस्या वाढतच होत्या, आशेचा किरण दिसत नव्हता. खिशात शंभर रुपयांची शेवटची नोट होती.
घरात मुला बाळांची, बायकोची आजच्या रात्रीची जेवणाची सोय लावून तो घराबाहेर पडला. काय करू, कसे करू, दारिद्रयाचा ससेमिरा कसा सोडवू असे नानाविध प्रश्न त्याच्या डोक्यात घुमत होते. प्रश्नांची यादी खूपच मोठी होती. ती या जन्मात संपणार नाही, या विचाराने तो निराश झाला. प्रश्न संपत नाहीत, मग आयुष्यच संपवून टाकावे, असा त्याने विचार केला.
मरणाचा निर्णय पक्का झाला. सगळ्या प्रश्नातून सुटका होणार या विचाराने त्याला हलके हलके वाटायला लागले. त्याने विचार केला, आता मरणाचा निर्णय पक्का झालाच आहे, तर मरणापूर्वी खिशातल्या १०० रुपयांत होईल तेवढी चंगळ करावी. काही क्षण स्वत:साठी जगावेत आणि मग मृत्यूला मिठी मारावी.
अशा विचारात त्याने नेहमी खुणावणारी पावभाजीची गाडी गाठली. बटर मारलेली पावभाजी खाल्ली. जीव तृप्त झाला. त्याच गाडीवर दोन कामगार पावभाजी खायला आले होते. ते अतिशय वैतागले होते. तरुणाने कानोसा घेतला. ते दोघे बोलत होते, `उगीच त्या ज्योतिषाच्या सांगण्यावरून ती बंद पडलेली खाण उकरत बसलो. वेळ आणि मेहनत वाया गेली. जाऊदे आपली रोजंदारीच बरी!' दुसरा म्हणाला, 'हो ना, हिरे तर दूरच, नुसता कोळसा हाती लागला.' असे म्हणत दोघे जण पावभाजी खाऊन निघून गेले.
तरुणाचे डोळे चमकले. त्याला वाटले, यांनी प्रयत्न केला, तसा आपणही प्रयत्न करून पाहिला तर? तसेही आपण जीवन संपवणार होतो. मरण्याआधी एक प्रयत्न करून पाहू. हा विचार येताच, मृत्यूचे विचार पावभाजीवरून ओघळणाऱ्या बटरसारखे मनातल्या मनात विरघळून गेले. तो खाणीचा शोध घेत अंधाऱ्या रात्री चंद्रप्रकाशात जवळपासचा परिसर धुंडाळू लागला. त्याला ती जागा सापडली.
त्या दोघांनी आधीच जिथे खोदून ठेवले होते, ती जागा त्याने दोन्ही हातांनी आणखीनच पोखरायला सुरुवात केली. तो वेगाने खाण उकरू लागला. एक जिद्द त्याच्या मनात होती. तो अथकपणे तीन तास एकाच जागी तीन फुटांपर्यंत खोदत राहीला. शेवटी थकून तो मटकन खाली बसला. उकरलेला कोळशाचा ढीग त्याच्या बाजूला होता. त्याला वाटले, हाही प्रयत्न फसला. आता आयुष्य संपवून टाकावे. हा विचार करत असताना बायको आणि मुलांचे चेहरे आठवले. त्यांच्या आठवणी डोळ्यातून वाहू लागल्या. जड अंत:करणाने त्याने शेवट करायचा निर्णय घेतला.
तोच त्याला कोळशाच्या ढिगाऱ्यात काहीतरी चमताना दिसले. त्याने डोळे पुसून नीट पाहिले. पाहतो तर काय आश्चर्य? त्याचा विश्वासच बसेना.कोळशाला चिकटून चार हिरे सापडले. आणखी एक हिरा घरंगळत त्याच्या पायाशी येऊन पडला. हिऱ्याची चमक त्याच्या डोळ्यात दिसू लागली. आपले सगळे प्रश्न संपले. आपले दारिद्रय संपले. आपल्या बायको मुलांचे कष्ट संपले. या आनंदात तो तिथून निघाला. घरी आला. बायकोला त्याने चार हिरे दाखवले आणि पाचवा हिरा दुसऱ्या दिवशी त्याने सरकारला सुपूर्द केला. सरकारने त्याच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले आणि घसघशीत बक्षिस दिले.
खाणकाम नव्याने सुरू झाले. खाणीतून अनेक हिरे सापडले. परंतु तरुणाने थोडक्यात आनंद मानल्यामुळे त्याची परिस्थिती पालटली आणि मनस्थितीही सुधारली. तो लखपती झाला.
एका पत्रकाराने त्याची मुलाखत घेत असताना विचारले, त्याच्या यशाचे गमक विचारले आणि त्याची करुण कहाणी विचारत मुलाखतीचा शेवट करताना विचारले, जन्म आणि मृत्यूत किती अंतर असते?'
यावर तरुण म्हणाला, फक्त तीन फुटांचे!
म्हणून जिद्द कधीच सोडू नये. आपल्या आयुष्याला कलाटणी देण्यासाठी एक क्षणसुद्धा पुरेसा असतो. त्या क्षणाची जरुर प्रत्येकाने वाट बघावी.