स्वर्ग आणि नरक यातला फरक काय? जाणून घ्यायचाय, मग वाचा ही गोष्ट!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2021 10:55 AM2021-06-01T10:55:41+5:302021-06-01T10:56:54+5:30

स्वर्ग चांगल्या कृतींनी तयार होतो, तर नरक वाईट कृतींनी तयार होतो.

What is the difference between heaven and hell? Want to know, then read this story! | स्वर्ग आणि नरक यातला फरक काय? जाणून घ्यायचाय, मग वाचा ही गोष्ट!

स्वर्ग आणि नरक यातला फरक काय? जाणून घ्यायचाय, मग वाचा ही गोष्ट!

googlenewsNext

एक आजी होती. ती एकटीच राहत होती. तिने आयुष्यभर अपार कष्ट केले होते. मृत्यूनंतर पुन्हा जन्ममरणाचा फेर नको, मोक्ष हवा, अशी ती रोज देवाकडे प्रार्थना करत असे. तिची स्वर्गप्राप्तीची तीव्र ईच्छा होती. ते पाहून एक दिवस खुद्द देव वेषांतर करून तिच्या भेटीस आले आणि आजीशी बोलू लागले.
बोलण्याच्या ओघात आजीने आपली स्वर्गप्राप्तीची ईच्छाही बोलून दाखवली. त्यावर वेषांतर करून आलेले देव म्हणाले, `त्यासाठी मृत्यूची गरज काय? स्वर्ग तर जिवंतपणीदेखील पाहता येतो!'

हे ऐकून आजी मोहरली. `खरंच की काय? तसे असेल तर मलाही स्वर्ग बघायचा आहे. देवाने आजीला आपल्या बरोबर नेले. एक मोठे प्रशस्त सभागृह होते. परीकथेतले चित्र वाटावे, असे भव्य आलिशान सभागृह पाहून आजीचे डोळे विस्फारले. आजी कुतुहलाने तो नजारा पाहत होती. तिथे एका दालनात जेवणाची सोय केली होती. स्वर्गातली भोजनव्यवस्था पाहण्यासाठी आजी उत्सुक होती. त्या दालनात तिने प्रवेश केला, तर तिथे तिला विचित्र गोष्टी आढळल्या. तिथे प्रत्येक जण आपल्या हक्कासाठी भांडत होता, हाणामारी करत होता, अपशब्द उच्चारत होता. ते पाहून आजीचा भ्रमनिरास झाला. 

मग देवाने आजीला दुसऱ्या दालनात नेले. ते दालन तिथल्या भव्य वास्तुला शोभतही नव्हते. कारण सर्वसाधारण घरांमधले चित्र तिथे दिसत होते. परंतु तिथल्या लोकांचे चेहरे समाधानाने तृप्त होते. लोक हक्कासाठी नाही, तर कर्तव्यासाठी धडपडत होती. एकमेकांना मदत करत होती. त्यांना पाहून आजीच्या तोंडून नकळत निघून गेले, हा खरा स्वर्ग!

आजीचे हे उद्गार ऐकून देवाने आपल्या मूळ रूपात आजीला दर्शन देत म्हटले, `स्वर्ग आणि नरक यातला खरा भेद तुला कळला. स्वर्ग ही आलिशान वास्तू नसून स्वर्ग ही आपण निर्माण केलेली जागा आहे. स्वर्ग या शब्दाची व्युत्पत्ती आहे, स्व म्हणजे स्वत: आणि ग म्हणजे आकाश, आपण स्वत: निर्माण केलेले आकाश, ज्याला आदि नाही आणि अंत नाही. जे विस्तीर्ण आहे. ज्यात सर्वांना सामावून घेण्याची ताकद आहे. असा स्वर्ग आपण मरणोत्तर नाही, तर जिवंतपणी निर्माण करू शकतो. आपल्या स्वभावाने, कर्तृत्त्वाने, चांगुलपणाने आपण स्वत:साठी आणि इतरांसाठी स्वर्ग निर्माण करू शकतो.'

हे ऐकून आजी म्हणाली, 'मग देवा नरक म्हणजे काय?'
देव म्हणाले, 'नरक शब्दातच त्याचे उत्तर आहे, नराने निर्माण केलेले. फक्त फरक एवढाच, की स्वर्ग चांगल्या कृतींनी तयार होतो, तर नरक वाईट कृतींनी तयार होतो. तुम्ही मानवाने सद्यस्थितीत निसर्गाची केलेली हानी, रोगराई, प्रदुषण, लोकसंख्यावाढ या गोष्टी नरक आहेत. तुम्ही नरकात जगत आहात. परंतु, काही लोकांच्या चांगुलपणामुळे पृथ्वीवर स्वर्गनिर्मिती होऊन लोकांचे जगणे सुसह्य होत आहे. म्हणून मृत्यूनंतरच्या स्वर्ग-नरकाची कल्पना सोडा आणि वास्तवात नरक असलेल्या जागी स्वर्ग कसा निर्माण करता येईल, याचा विचार करा!'

Web Title: What is the difference between heaven and hell? Want to know, then read this story!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.