साधनेच्या वेळी मन एकाग्र होण्यासाठी काय करावे? मन एकाग्र झाल्यामुळे काय प्राप्त होते, वाचा!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 02:50 PM2021-10-21T14:50:17+5:302021-10-21T14:50:36+5:30
साधनेच्या काळात प्रारंभी मनामध्ये एकाच वेळी शेकडो विचार उद्भवतात. त्यानंतर मन हव्या त्या गोष्टींवर केंद्रित होऊ लागते.
साधना सफल होण्यासाठी मनाची एकाग्रता व ती साधण्यासाठी साधना असा बीजांकुरन्याय साधना आणि मनाची एकाग्रता याबाबतीत लागू पडतो. साधना करताना प्रथम देह स्थिर ठेवावा लागतो. त्यानंतर इंद्रिये स्थिर ठेवावी लागतात. त्यानंतर इंद्रियांच्या मागून सैरभैर धावणारे मन हळू हळू स्थिर होऊ लागते.
साधनेचे पूर्ण यश पदरात पाडण्यासाठी साधकाने प्रथम आहार व आचारशुद्धी करावी. पूर्ण सात्विक आहार घेऊन शुद्ध आचार ठेवणारा साधक हळूहळू निश्चित प्रगतावस्थेत जातो. ज्यावेळी अल्प कष्टात पुष्कळ धनप्राप्ती, स्त्रीविषयक विचार, दुसऱ्याचा उत्कर्ष सहन न होणे, मृगजळवत सुखाच्या मागे धावणे, विविध समस्यांचे कर्तृत्त्व स्वत:कडे घेऊन त्यावर उपाय शोधत बसणे, परमार्थाला उपयुक्त नसणाNया वस्तूंची प्रिती बाळगणे अशा गोष्टी जोपासल्या जाताता तेव्हा मनाचा कार्यव्याप मोठा असल्यामुळे त्याला स्थिर होण्यासाठी सवडच सापडत नाही. कार्यव्याप कमी करण्यासाठी वरील गोष्टी सोडून देण्याचा सराव केला पाहिजे.
इकडे साधना व तिकडे सराव अशा दोन्ही गोष्टी चालू झाल्यावर हळूहळू मनाची चंचलता नष्ट होऊ लागते. साधनेच्या काळात प्रारंभी मनामध्ये एकाच वेळी शेकडो विचार उद्भवतात. त्यांच्यावर नियंत्रण घालण्यापेक्षा ते तसेच उद्भवू द्यावेत पण त्यांच्याकडे लक्ष देऊ नये. असे करता करता उद्भवलेले विचार दुसऱ्या खेपेस सौम्य होतात व अशा क्रमाने त्यांची तीव्रता नष्ट होते. त्यानंतर मन हव्या त्या गोष्टींवर केंद्रित होऊ लागते.
मनाला एकावेळी एकच विचार करण्याची सवय लागते. अशा वेळी मन अस्थिर झाले, तरी त्याला चिंतनाची व नामस्मरणाची सवय लागल्याने ते चटकन स्थिर होते. साधनेचा गाभा म्हणजे चिंतन मनन! प्रारंभीच्या अवस्थेत ते शक्य झाले नाही, तरी रोजच्या सरावाने या अवस्थेपर्यंत पोहोचून मनुष्य सच्चिदानंद प्राप्त करू शकतो.