महालक्ष्मी, महाकाली आणि महासरस्वती ही देवीची तीन रूपं आपल्याला काय शिकवतात?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2023 07:00 AM2023-05-26T07:00:00+5:302023-05-26T07:00:02+5:30

देवीच्या त्रिगुणात्मक रूपाची आपण नेहमी पूजा करतो, त्यासाठी तीन रूपांचे प्रयोजन काय तेही जाणून घेऊ!

What do the three forms of Goddess Mahalakshmi, Mahakali and Mahasaraswati teach us? | महालक्ष्मी, महाकाली आणि महासरस्वती ही देवीची तीन रूपं आपल्याला काय शिकवतात?

महालक्ष्मी, महाकाली आणि महासरस्वती ही देवीची तीन रूपं आपल्याला काय शिकवतात?

googlenewsNext

>> मकरंद करंदीकर.

हजारो वर्षे जुन्या अशा आपल्या हिंदू धर्मामध्ये हजारो देवदेवता, विधी, कर्मकांडे, चिन्हे इत्यादी अनेक गोष्टी या सांकेतिक आहेत.  सर्वांनाच त्यांचा अर्थ कळतो असे नाही. जरी आपल्याला समजले नाही तरी श्रद्धेने हे सर्व पाळले जाते. पण जर या सर्वांचा अर्थ समजून या गोष्टी करता आल्या तर अधिक समाधान लाभते. म्हणूनच काही गोष्टींचा थेट सोपा अर्थ सांगण्याचा  हा  प्रयत्न  आहे.

महालक्ष्मीच्या अनेक देवळांमध्ये तिच्या एका बाजूला महाकाली आणि दुसऱ्या बाजूला महासरस्वती हमखास आढळते. नवरात्रीत या तिन्ही देवतांसाठी विशेष पूजा, अनुष्ठाने  केली जातात. अनेकांना या प्रतिकांचा अर्थ माहिती असला तरी तो सर्वांनाच माहिती असतो असे नाही.चित्रात किंवा मूर्तीमध्ये लक्ष्मी बहुतेकवेळा उभी दाखवलेली असते. कारण ती अस्थिर आहे. ती कायमची कुणाकडेही बसत / थांबत नाही. आज तुमच्याकडे असली तर उद्या असेलच असे नाही. त्यामुळे संपत्तीचा अहंकार कुणाला असू नये. ज्याच्याकडे ती विपुल प्रमाणात आहे त्याला तिचे रक्षण करता आले नाही तरी ती निघून जाते. चोरी, लुटमार, फसवणूक यातून तुमच्या संपत्तीला वाचवायचे असेल तर कणखर रक्षणकर्ती  महाकाली तिच्या एका बाजूला हवीच. म्हणजेच तुम्हाला तिचे रक्षण करता आले पाहिजे. लक्ष्मीचा म्हणजे संपत्तीचा वापर करतांना तुमच्यापाशी बुद्धी, विद्या, विवेक नसेल तर संपत्ती उधळली जाते. हल्ली आपण अगदी हास्यास्पद योजनांमध्ये पैसे गुंतविल्यामुळे ते साफ बुडल्याचे वारंवार पाहतो. म्हणून बुद्धी, विद्या, सारासार विवेक या सर्व गोष्टींची दात्री  सरस्वती ही दुसऱ्या बाजूला हवीच. 

एखाद्याने लक्ष्मी प्राप्तीसाठी जर फक्त बळाचा, शक्तीचा वापर केला असेल तर त्याला त्या संपत्तीचा गर्व होतो, अहंकार होतो. फक्त सरस्वतीच्या मार्गाने संपत्ती लाभलेला शक्तीचा उपहास करू शकतो. यासाठी या तिन्ही शक्तींचा समतोल आणि समन्वय अत्यावश्यक आहे.  काहीवेळा लक्ष्मीच्या शेजारी बुद्धिदाता गणपती असतो. गणपतीदेखील संपत्तीचा वापर, सारासार विवेक व बुद्धीचातुर्याने  करण्याचे सुचवतो. म्हणूनच संपत्ती सोबत तिच्या रक्षणाची शक्ती आणि योग्य वापराची बुद्धी देण्याची जरूर प्रार्थना करा ! 

Web Title: What do the three forms of Goddess Mahalakshmi, Mahakali and Mahasaraswati teach us?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.