ब्रह्म मुहूर्ताची नेमकी वेळ कोणती? व्यक्तिमत्त्व विकासासाठी ती महत्त्वाची का मानली जाते?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2021 06:07 PM2021-04-14T18:07:21+5:302021-04-14T18:07:43+5:30
मनुष्यानेदेखील ब्रह्म मुहूर्तावर उठून आपली दिनचर्या सुरू केली, तर त्याला दीर्घायुष्य आणि सुदृढ आरोग्य तर प्राप्त होईलच, शिवाय ताणतणाव, नैराश्य, नकारात्मक विचार यापासून कायमची सुटका मिळेल.
सूर्योदयाच्या दोन तास आधीची वेळ म्हणजे साधारण पहाटे ४.३० ते ६.३० ही ब्रह्ममुहूर्ताची वेळ मानली जाते. त्या काळात उठून इतर कोणतीही कामे न करता स्वतःच्या व्यक्तिमत्त्व विकासावर भर दिला, तर त्याचा दसपटीने अधिक प्रभाव पडतो आणि फायदा होतो.
'लवकर निजे लवकर उठे त्यास आयु आरोग्य लाभे' असे धर्म शास्त्रात म्हटले आहे. परंतु ब्रह्म मुहूर्त दूरच आपण सूर्योदयाच्या वेळीदेखील उठत नाही. परिणामी दिवस उशिरा सुरू होतो आणि उशिरा संपतो. लवकर उठल्यामुळे पहाटेच्या शांत वातावरणात स्वतःवर लक्ष देता येते. त्या कालावधीत दिवसभराच्या तुलनेत कमी विचार असतात. त्यामुळे मन शांत होण्यास, एकाग्र होण्यास वेळ लागत नाही. आपल्याला ज्या क्षेत्रात पुढे जायचे आहे, त्याबद्दल जी तयारी करायची आहे, त्याची आखणी या कालावधीत करणे आपल्याला फायदेशीर ठरते. कारण त्या काळात आपला मेंदू सर्वात जास्त कार्यरत असतो. सकाळच्या वेळी केलेले पाठांतर, वाचन दीर्घकाळ लक्षात राहते. स्मरण शक्ती वाढते. सकारात्मकता वाढते.
पूर्वीच्या काळी ऋषी-मुनी ब्राह्ममुहूर्तावर उठून वेदपठण करत. रात्री वातावरणात रज-तम गुणांचे, म्हणजे त्रासदायक वाटण्याचे प्रमाण अधिक असते, तर पहाटे वातावरण सात्त्विक, म्हणजे आनंददायक असते. सकाळचे वातावरणही शुद्ध आणि पवित्र, तसेच शांत आणि थंड असते. या काळात केलेला नामजप भावपूर्ण होतो, तसेच अभ्यासही चांगला होतो. म्हणून साधकाने ब्रह्म मुहूर्तावर साधना करावी असे सांगितले जाते. आजही योग शिबिरांमध्ये ब्रह्म मुहूर्तावर उठवले जाते. तसेच गायक ब्रह्म मुहूर्तावर उठून रियाज करतात. विद्यार्थी पहाटे उठून अभ्यास करतात. रात्री जागरण करून केलेल्या अभ्यासापेक्षा पहाटे उठून केलेला अभ्यास गुणवत्ता वाढवतो.
पशु, पक्षी, निसर्गदेखील ब्रह्म मुहूर्तावर जागृत होतो. मनुष्यानेदेखील ब्रह्म मुहूर्तावर उठून आपली दिनचर्या सुरू केली, तर त्याला दीर्घायुष्य आणि सुदृढ आरोग्य तर प्राप्त होईलच, शिवाय ताणतणाव, नैराश्य, नकारात्मक विचार यापासून कायमची सुटका मिळेल. विश्वास बसत नसेल, तर किमान २१ दिवस ब्रह्म मुहूर्तावर उठण्याचा सराव करून पहा...!