समाधानाची नेमकी व्याख्या काय, ते कुठे मिळते? वाचा ही गोष्ट!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2021 08:00 AM2021-08-26T08:00:00+5:302021-08-26T08:00:12+5:30
कोणी आपल्याला चांगले म्हणावे, कोणी आभार मानावेत, ही भावना ठेवून केलेली मदत कधीच समाधान देऊ शकत नाही.
एका बिल्डिंगच्या बांधकामाच्या ठिकाणी एक मजूर अगदी प्रामाणिकपणे काम करत असे. त्याच्या चेहेऱ्यावर कायम मंद स्मित असे. त्याला पाहून ठेकेदाराला फार बरे वाटे. परंतु त्याच वेळेस मनात येई, की याला काही अडचणी येत नसतील का? याच्या चेहऱ्यावर एवढे समाधान कसे? अशा विचारात तो ठेकेदार त्याची परीक्षा घ्यावी असे ठरवतो.
एक दिवस तो कामात असताना त्याचा जेवणाचा डबा ठेकेदार लपवून ठेवतो. जेवणाची सुटी होते. तो आपला डबा शोधतो, पण त्याला तो मिळत नाही. तेव्हा त्याचे सहकारी सांगतात, 'काळजी करू नकोस आमच्यातले जेवण घे आपण मिळून जेवू.' क्षणापुर्वीचा त्याचा चिंतीत झालेला चेहरा पुन्हा समाधानाने उजळतो आणि त्याला जेवण देणाऱ्या सहकाऱ्याचा चेहरा आनंदाने उजळतो. ठेकेदार आणखी एक परीक्षा घेतो. एक दिवस तो जेवणाच्या डब्याच्या पिशवीत दोनशे रुपये ठेवतो.
जेवणाची सुटी होते. त्याच्या हाती पैसे लागतात. गेल्या वेळेस जेवण देणाऱ्या सहकाऱ्याच्या आजारी बायकोला औषधाची गरज असते. मागचा पुढचा विचार न करता तो ते पैसे मित्राला देऊन टाकतो. आता त्याचा चेहरा आनंदाने तर मित्राचा चेहरा समाधानाने उजळतो. ठेकेदाराला बोध मिळतो.
समाधान, आनंद हा घेण्यात नाही तर देण्यात आहे. तेही निरिच्छ मनाने! कोणी आपल्याला चांगले म्हणावे, कोणी आभार मानावेत, ही भावना ठेवून केलेली मदत कधीच समाधान देऊ शकत नाही. समोरच्याने आभार मानले तर अहंकाराला खतपाणी घालते जाते आणि आभार मानले नाही तर क्रोधाला हातभार लागतो. म्हणून निष्काम मनाने मदत करावी आणि परोपकाराचा भाव विसरून जावा . देव दयेने सगळे मिळत आहे, हे लक्षात घेऊन त्याचे आभार मानावे, यातच खरे समाधान आहे.