साडेसाती म्हणजे नेमकं काय?... घाबरण्याचा नव्हे; संघर्षातून समृद्धीकडे नेणारा परिवर्तनकारी काळ
By देवेश फडके | Published: July 25, 2022 10:20 AM2022-07-25T10:20:07+5:302022-07-25T10:26:57+5:30
तुमची साडेसाती सुरु आहे? ही एक शुद्धिकरण प्रक्रिया असून, शनीदेव कुणाचे वाईट करत नाहीत, असे सांगितले जाते. जाणून घ्या...
- देवेश फडके
साडेसाती हा शब्द केवळ उच्चारला किंवा कानावर पडला, तरी सगळ्यांच्या कपाळावर आठ्या पडतात. समोरच्या व्यक्तीची साडेसाती सुरू आहे, हे समजली की लगेचच भुवया उंचावतात. एकंदरीतच साडेसाती काळाबाबत अनेक समज, गैरसमज असल्याचे दिसून येते. साडेसाती म्हणजे अशुभ, प्रतिकूल, वाईट हीच संकल्पना रुजलेली दिसते. साडेसाती शनी ग्रहामुळे येत असल्याने शनी ग्रहाकडेही काहीश्या तुसड्या नजरेने पाहिले जाते. सर्वसाधारण आपल्या बोली भाषेत ‘साडेसाती’ आली असे अनेकदा एखाद्या व्यक्तीला उद्देशुन बोलल्याचे आपण ऐकतो. ज्याचे उपद्रवमूल्य अत्याधिक आहे किंवा ज्यांच्या अहेतुक कृतीची फलश्रृती ‘उपद्रव’ असते, अशाच व्यक्तीच्या आगमानास साडेसाती संबोधले जात असावे. लोकमानसात साडेसातीविषयी गैरसमज खूप खोलवर मुरला आहे, याचे उदाहरण म्हणजे विविध समस्यांचा एकत्रित उल्लेख साडेसाती या विशेषणाने केला जातो. ‘माझ्या मागे साडेसाती लागली आहे’ या एकावाक्याने सहज बोध होतो की माणूस तीव्र समस्येने गांजलेला आहे.
मात्र, तसे अजिबात नाही. साडेसाती हा संघर्षाचा काळ आहे. साडेसातीच्या काळात अनेकांवर कठीण प्रसंग येत असतात, असे असले तरी याच कालावधीत आपलं कोण आणि परकं कोण, याची नव्याने ओळख होते. साडेसातीच्या काळात आपले अनेक निर्णय चुकतात, योजना फसतात, अनेकदा जीवनही नकोसे वाटायला लागते. मात्र, स्वतःवर विश्वास आणि चिकाटी असलेली माणसं यातून तावून-सुलाखून बाहेर पडतात. ज्याच्यामुळे साडेसाती येते, तो शनी ग्रह असला, तरी ज्योतिषशास्त्र आणि नवग्रहांमध्ये त्याला देवाचे स्थान देण्यात आले आहे. शनी हा सूर्यपुत्र मानला जातो. शनी हा नवग्रहांमधील न्यायाधीश ग्रह आहे. तितकाच ते कर्मप्रदाता आहे. शनी वाईट काहीच करत नाही. उलट, आपण आपल्या पूर्वायुष्यात केलेल्या कर्माची फळे देतो.
ब्रह्मांडातील शनी स्थान
ब्रह्मांडात असलेल्या अनेकविध सूर्यमालांपैकी आपल्या सूर्यमालेचे विचार केल्यास, शनी हा सूर्यमालेतील सहावा ग्रह आहे. शनीचे अंतर सूर्यापासून सुमारे ८८ कोटी ६० लक्ष मैल (०१ अब्ज ४१ कोटी ७६ लक्ष किलोमीटर) तर आपल्या पृथ्वीपासून सुमारे ७९ कोटी २२ लक्ष ४८ हजार मैल (०१ अब्ज २७ कोटी ५० लक्ष किलोमीट) आहे. शनी ग्रहाचा व्यास सुमारे ७२ हजार मैल (०१ लक्ष १५ हजार किलोमीटर) आहे. शनीला स्वतःभोवती प्रदक्षिणा घालण्यास १० तास १४ मिनिटे लागतात. याची मंदगती शून्य कला ते ०७ कला इतकी असते, तर मध्यगती २ कला असते. या गतीने शनीला सूर्याभोवती प्रदक्षिणा करण्यास ३० वर्षे लागतात. पृथ्वीवरून दुर्बिणीने शनी पाहिल्यास तो अत्यंत तेजपुंज दिसतो. अगदी त्या शनीकडे पाहत राहावेसे वाटत राहील, इतका तो तेजस्वी, मनमोहक दिसतो.
नवग्रहांमधील न्यायाधीश शनी
ज्योतिषशास्त्रानुसार, शनी हा रविपुत्र असून, यमाचा मोठा भाऊ आहे. शनीला त्याच्या गतीमुळे मंद नाव प्राप्त झाले आहे. याशिवाय शनीला शनैश्चर, अर्की, सौर्य, कौण, रविपुत्र, यमाग्रज अशी नावे आहेत. इंग्रजी भाषेत यासा सॅटर्न म्हणतात. शनी हा दुःख, दैन्यकारक ग्रह आहे. लोखंड आणि काळ्या रंगावर याचा अंमल अधिक असतो. शनी हा सेवक आहे. तसेच तो पश्चिम दिशेचा स्वामी आहे. पापग्रहांमध्ये शनी अग्रगण्य आहे. शनी हा वायुतत्वाचा तमोगुणी अंत्यज आहे. ऋतुंमध्ये शिशिर ऋतु आणि कालामध्ये वर्षावर शनीचा अंमल आहे. षडरसांमध्ये शनीचा तुरट रसावर अंमल आहे. शनीला मृत्यूचा कारक ग्रह मानले जाते. शनी हा मकर आणि कुंभ या दोन राशींच्या स्वामी आहे. २७ नक्षत्रांपैकी पुष्य, अनुराधा आणि उत्तरा भाद्रपदा या तीन नक्षत्रांचे अधिपत्य शनीकडे आहे. अंकशास्त्रात ८ या मूलांकावर शनीचा अंमल आहे. तर हस्तसामुद्रिक शास्त्राप्रमाणे मधले बोट आणि त्याखालील उंचवटा यावर शनीचे स्थान मानलेले आहे. शनी हा गुरुला अध्यात्मिक गुरु मानतो. शनीचे रत्न नीलम असून, ब्रह्मा याची देवता आहे. शनीची उपास्यदेवता हनुमान आहे. तसेच शनी महादेव शिवशंकरांना आपल्या गुरुस्थानी मानतो, असे सांगितले जाते.
साडेसाती कर्तृत्वाने फुलणारी आनंदयात्रा
साडेसाती म्हणजे काय? ज्योतिषशास्त्रानुसार, गोचरी ग्रहरचनेच्या आधारे फलादेशाचा विचार केला जातो. साडेसाती हा त्यापैकीच अनन्यसाधारण महत्त्व असणारा योग आहे. साडेसातीचा विचार हा जन्मकुंडलीतील चंद्र व गोचरी शनी यांच्याशी निगडित आहे. चंद्रापासून ४५ अंश मागे शनीचे अंशात्मक भ्रमण सुरु होते, तेव्हा साडेसाती सुरु होते. चंद्रापासून ४५ अंशा पुढे शनी जाईल, तेव्हा साडेसाती संपते. मात्र सर्वसाधारण विचारकरता जन्मकुंडलीतील चंद्राच्या बाराव्या राशीत शनीने प्रवेश केला की, साडेसाती सुरु होते, ही पहिली अडीच वर्षे होतात. चंद्र राशीवरुन शनिचे भ्रमण सुरु झाले की, दुसरे अडीच वर्षे व चंद्रच्या दुसऱ्या राशीत शनीने प्रवेश केला की, तिसरी अडीच वर्षे सुरु झाली, असा हा सर्व मिळून साडेसात वर्षाचा काळ म्हणून यास साडेसाती म्हणतात. उदा. शनी मकर राशीत विराजमान असेल, तर धनु, मकर आणि कुंभ या राशींचा साडेसाती काळ सुरू असतो. कुंभ राशीपासून मकर रास बारावी येते. मकरेत शनी आला की, कुंभ राशीच्या साडेसातीचा पहिला टप्पा सुरू होतो. शनी जेव्हा कुंभ राशीत प्रवेश करतो, तेव्हा त्याचे भ्रमण चंद्रराशीवरून होत असते, याचा अर्थ साडेसातीचा पुढचा अडीच वर्षांचा काळ सुरू होतो. आणि शनीने मीन राशीत प्रवेश केला की, कुंभपासून चंद्राच्या दुसऱ्या राशीत तो जातो, तेव्हा शेवटचा आणि तिसरा अडीच वर्षांचा टप्पा सुरू होतो. या संपूर्ण कालावधीला साडेसाती असे म्हटले जाते. एखादा हिऱ्याचा दागिना होताना कच्च्या हिऱ्याला अनेकविध प्रकारचे घाव सोसावे लागतात. नंतर त्याला पैलू पडतात. अगदी तसेच साडेसातीचा काळ हा माणसाच्या आयुष्याला, जीवनाला पैलू पाडण्याचे काम करतो. या काळात माणूस न्यायीपणाने, अहंकार-गर्व बाजूला ठेवून सचोटिने वागला, तर सोसलेले घावांचे पैलू होऊन साडेसाती कर्तृत्वाने फुलणारी आनंदयात्रा ठरते.
शनीचे गुण, विशेष अन् वैशिष्ट्ये
साडेसाती योग हा शनीचा विशेषाधिकार मानला गेला आहे. शनी हा पापग्रहात अग्रस्थानी असल्यामुळे तो भले करण्याऐवजी फक्त आणि फक्त वाईटच करणार, असा समज आहे. मात्र, हे सत्य नाही. शनी हा माणसाचे मन स्वच्छ व शुद्ध करणारा, मनातील घाण कुविचार टाकून उच्चप्रतिला नेणारा हा एकच ग्रह आहे. शनी हा शिस्तीचा पाईक आहे. जीवनाचे मर्म जाणणारा आणि कटू सत्य उघड करून सांगणारा आहे. जे याची अवज्ञा करतील, त्यांना तो खाली ओढतो व माणसाच्या अहंकाराचा नाश करतो. जे शिस्तबद्ध, विनयशील, नम्र आहेत, त्यांना तो उच्च शिखरावर नेऊन बसवतो. शनी हा न्यायी, स्वार्थत्यागी, व्यवहारी, जबाबदारी घेणारा, करडी वागणूक असणारा, वैराग्यकारक, शिस्तबद्ध, नम्र, इंद्रियांवर ताबा ठेवणारा, ऐष आरामाचा तिटकारा असणारा, दीर्घोद्योगी, अंगी विलक्षण चिकाटी असणारा मृत्यूकारक ग्रह आहे. तसेच सहनशीलता, उद्योगतत्परता, काटकसर, कोणत्याही परिस्थितीत स्थैर्य, आत्मबल, ध्येयनिष्ठा, परोपकार, दूरदर्शीपणा हे त्याचे शुभ गुण आहेत. तर, किचकट मनोवृत्ती, छोट्या-छोट्या गोष्टींवरून वितंडवाद घालणे, अतिचिकित्सक वृत्ती, कठोर निर्दयी अंतःकरण, द्वेषी, मत्सरी, आळशी, आपमतलबीपणा हे दुर्गुण आहेत.
आयुष्यातील शुद्धिकरण प्रक्रिया म्हणजे साडेसाती
साडेसाती हा शनी चंद्राशी निगडीत ग्रहयोग आहे. चंद्र हा मनाचा व भाग्याचा कारक आहे, तर शनी ग्रहमंडळातील न्यायाधीश आहे. शनी हा कर्मकारक आहे. त्यामुळे शनी हा जीवनास कार्यरत करणारा महत्त्वाचा ग्रह आहे. आयुष्यात शुभ अथवा अशुभ होण्यासाठी कर्म हे करावेच लागते. गुरुची कृपा आहे म्हणजे शुभ निश्चित होणार, मात्र कर्मकारक ग्रहाचे पाठबळ नसेल, तर घटना घडणार नाही असेच म्हणावे लागेल. मानवाच्या पूर्वकर्मानुसार त्यास शुभाशुभ फळ देण्याचा सर्वाधिकार शनीग्रहास दिला आहे. त्यामुळे साडेसाती ही मानवाच्या आयुष्यातील शुद्धिकरण प्रक्रिया म्हणावी लागेल. मात्र साडेसातीच्या काळात अशुभ घटना ,भयावह स्थिती, सातत्याने अपयश मिळेल, असा कोणीही अर्थ लावू नये. केवळ जन्म राशीस शनी प्रतिकूल आहे, यामुळे प्रगतीचा मार्ग आकुंचन पावेल किंवा मार्गात अचानक गतीरोधक निर्माण होतील, असे मुळीच नाही. ज्याप्रमाणे आपल्या जन्मराशीस महत्त्व आहे, त्याचप्रमाणे जन्म नक्षत्र, जन्मचंद्राचे अंश, शनिचे भिनाष्टक वर्ग, कुंडलीचे सर्वाष्टक वर्ग, गोचर शनिचे सर्वांच्या चक्रातून होणारे कक्षात्मक भ्रमण, शनी भ्रमण करत असलेल्या राशीस्वामीचे जन्म कुंडलीतील स्पष्ट अंश, गोचर शनीचे नवमांश भ्रमण, कुंडलीतील महादशास्वामी, अंतर्दशास्वामी, गोचर गुरु- राहु-केतु याची साथ आहे का, या सर्वांची तौलनिक चिकित्सा केल्याशिवाय केवळ साडेसाती आहे, याचा एकमात्र अर्थ शनीमुळे समस्या, अडचणी येतातहेत, असा घेणे चुकीचे ठरले. साडेसाती सुरु झाली म्हणजे अनर्थ होणार आणि अनर्थकारक कोण तर शनीग्रह हा समज करणे अशास्त्रीयच म्हणावे लागेल. साडेसातीत भाग्योदयाचा अनुभव घेणारे पुण्यात्मे आहेत हे विसरुन चालणार नाही.
साडेसाती कालावधीतील उपाय
शनी हे न्यायसत्तेचे प्रतिक आहे. शनी न्यायदानाचे कठोरव्रत निर्लेपपणे आचरणात आणतो. म्हणून जगाचे व्यवहार सुरळीतपणे सुरु आहेत. शनीच्या दरबारात प्रकट अप्रकट सर्व सत्याचे शोध घेऊन न्यायदान केले जाते व ते मानवाच्या पारलौकिक गतीसाठी अमृतवत ठरते. त्यामुळे केवळ शनिकृपेसाठी नाही, तर साडेसातीच्या काळात यशाचे प्रधान कारण असणारे मनोबलप्राप्त व्हावे म्हणून काही उपाय सांगितले जातात.
- आपल्या इष्टदेवतेचा जप रोज करणे व जप करताना आकाश मुद्रा करणे लाभप्रद ठरते.
- स्वकष्टार्जीत धनातून गरजूंना अन्नधान्य देणे लाभप्रद ठरते.
- हनुमंताचे दर्शन घेणे, समर्थरामदासकृत मारुतीस्तोत्र म्हणावे.
- सुमिरी पवनसुत पावन नामू। अपने बस करि राखे रामू॥ हा मंत्र जप करणे. तसेच ॐ शं शनैश्चराय नम: नीलांजनसमाभासं रविपुत्रं यमाग्रजम। छायामार्तण्डसम्भूतं तं नमामि शनैश्चरम् । या मंत्रांचा जपही उपयुक्त ठरू शकतो.
- हनुमान चालीसा, बजरंगबाण किंवा सुंदरकांड ही हनुमंताच्या पराक्रमाचे गुणवर्णन करणारी स्तोत्रे म्हणावीत.
- पिंपळ पूजन, तेथे नियमितपणे दिवा लावणे, शनीच्या आवडत्या वस्तूंचे अर्पण, दान असेही काही उपाय सांगितले जातात.
अर्थात, शनीची चांगली वाईट फळे मिळणे हे प्रत्येकाच्या कुंडलीतीळ ग्रहांच्या स्थितीवर अवलंबून असते. शनी करतो, ते चांगल्यासाठी करतो, यावर विश्वास ठेवा. नकारात्मकता दूर सारा. सत्कर्म करत राहा. चांगले विचार, सकारात्मकता बाणवा. चिकाटीने टिकून राहा, स्वतःवरचा विश्वास ढळू देऊ नका. सर्वांत महत्त्वाचे साडेसातीला अजिबात घाबरू नका.