अंतर्मनात नेमकं दडलंय काय !
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2020 06:12 PM2020-06-27T18:12:26+5:302020-06-27T18:12:40+5:30
आपल्या रंगावर नाही तर आपल्या अंतरंगात काय आहे यावर आपली उर्ध्व किंवा अधोगती ठरलेली असते.
- डॉ.दत्ता कोहिनकर -
एक फुगेवाला जत्रेमध्ये हेलियन वायू भरलेले (गॅसचे) फुगे विकून उदरनिर्वाह करायचा. मध्येच तो एखादा फुगा आकाशात सोडायाचा. उंच उडत जाणारा फुगा पाहून मुले फुगे घेण्यासाठी पालकांना आग्रह करायचे व त्याचा धंदा जोरात सुरू व्हायचा. एका लहान मुलाने या फुगेवाल्याला प्रश्न केला, काका या निळया रंगाच्या फुग्याप्रमाणे पिवळा रंगाचा फुगा पण आकाशात उडेल का ? मुलाची ही जिज्ञासा पाहून फुगेवाला म्हणाला, बाळा.. फुगा हा रंगामुळे नाही तर त्याच्या आत जे काही आहे त्यामुळे तो हवेत उंच उडत जातो. हीच गोष्ट आपल्या दैनंदिन आयुष्यातही लागू पडते, आपल्या रंगावर नाही तर आपल्या अंतरंगात काय आहे यावर आपली उर्ध्व किंवा अधोगती ठरलेली असते. अंतरंगातील ही गोष्ट म्हणजे आपला दृष्टीकोन, आपली मनोवृत्ती.
एखाद्या बीजामधून रोप झेपावते ! पण बीजच नसेल तर रोपाचे अस्तित्व असू शकेल काय ? अगदी त्याचप्रमाणे माणसाची प्रत्येक कृती ही त्याच्या विचारातून आकाराला येत असते. आपले मनातले विचार हे आपल्याला सुखी किंवा दुःखी करत असतात. आपले कर्म (कृती) हे विचारांचे बाहय प्रक्षेपण असतात.
मंगेश पाडगांवकर म्हणाले होते, ‘पेला अर्धा भरला की सरला’ हे तुम्हीच ठरवायचे असते. तुम्हाला सुखी व्हायचे असेल तर आपल्या विचारांना सकारात्मकतेचे बळ द्या. जसा विचार कराल तसेच तुम्ही व्हाल. भगवान बुध्द म्हणतात वाईट विचारांनी - वाईट कर्म करणार्या माणसाचे मागे दुःख अशाप्रकारे लागते जसे बैलगाडीला जुंपलेल्या बैलाच्या मागे बैलगाडीचे चाक आणि चांगल्या विचारांनी चांगले कर्म करणार्या माणसाच्या मागे असे सुख लागते की जशी त्याच्याबरोबर त्याची सावली. म्हणून नेहमी स्वतःबाबत आपण काय विचार करतो या स्वसंवादावर लक्ष देऊन नकारात्मकता हदद्पार करण्याची मनाला सवय लागली पाहिजे.
सफरचंद हातगाडीवर विकणार्या माणसाने सफरचंद 70 रू. किलो असा फलक गाडीवर लावला होता. संपूर्ण गावातून सफरचंद 70 रू. किलो असे ओरडत, दिवसभर गावातून फिरला पण त्याला असा एकही ग्राहक भेटला नाही. ज्याने त्याला 70 रू. पेक्षा जास्त रूपये किलोमागे दिले. लोकांनी त्यापेक्षा कमी भावाने त्याच्याशी व्यवहार केला गेला.
मित्रांनो या उदाहरणावरून एवढच शिकुया, आपण समाजात जेवढी आपली किंमत लावतो (स्वमुल्य) तेवढीच किंमत किंवा त्यापेक्षा कमी किंमत समाज आपल्याला देतो, म्हणून स्वतःला मूल्यवान समजा (सेल्फ रिस्पेक्ट). स्वतःविषयी खूप आदर बाळगा फक्त अहंकार बाळगू नका. तुमच्या विचारावर हे सर्व अवलंबून आहे.
हेलन केलरला एका श्रोत्याने विचारले ‘दृष्टीहिनते पेक्षा मोठे दुर्भाग्य काय आहे?’ त्यावर त्या म्हणाल्या दृष्टी असूनही ज्याच्यापुढे महान स्वप्ने नसणे, सकारात्मक दृष्टीकोन नसणे हे दृष्टीहिनतेपेक्षा मोठे दुर्भाग्य आहे.
हेलन केलर या अंध, मुक व बधिर असूनही त्यांच्या सकारात्मक वृत्तीच्या सहाय्याने त्यांच्या शिक्षीका अॅनी सुलिर्व्हेन यांच्या मदतीने त्यांनी लोकल्याणाच्या माध्यमातून अमेरिकेतील उच्चतम नागरी सन्मान मिळविला.
थॉमस अल्वा एडिसनच्या कारखान्याला वयाच्या 65 व्या वर्षी आग लागली आणि सर्व मालमत्ता जळून खाक झाली. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणाले ‘‘चला आयुष्यातील सर्व चुका जळून गेल्या, पुन्हा एकदा नव्याने कामाला सुरूवात करूया.’’ या घटनेनंतर सकारात्मक विचारांच्या उर्जेतून त्यांनी तीनच आठवडयात ग्रामोफोनचा शोध लावून उत्पादनाला सुरूवात केली. यशासाठी व आनंदी जीवन जगण्यासाठी असा सकारात्मक दृष्टीकोन हवा त्यानेच आयुष्य उन्नत होते.
शेवटी एवढंच सांगावसं वाटत...
‘‘मंजिले उन्ही को मिलती है,
जिनके सपनो में जान होती है ।
पंख होने से कुछ भी नही होता,
होसलो से उड्डान होती है ।’’