अशाच एखाद्या शुक्रवारी तुमच्याही घरी लक्ष्मीची पावले उमटली तर? ती ओळखायला शिका!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 07:00 AM2022-06-30T07:00:00+5:302022-06-30T07:00:02+5:30

सदा सर्वदा देव सन्निध आहे, म्हणजे तो जवळच आहेल; पण त्याला कसे ओळखायचे ते शिकून घ्या!

What if Lakshmi's footsteps came to your house on such a Friday? Learn to recognize her! | अशाच एखाद्या शुक्रवारी तुमच्याही घरी लक्ष्मीची पावले उमटली तर? ती ओळखायला शिका!

अशाच एखाद्या शुक्रवारी तुमच्याही घरी लक्ष्मीची पावले उमटली तर? ती ओळखायला शिका!

एक मुलगा आपल्या पहिल्या पगारातून आपल्या आईसाठी चप्पल खरेदी करण्यासाठी जातो. दुकानदाराला लेडीजसाठी चप्पल दाखवा अशी विनंती करतो. दुकानदार पायाचे माप विचारतो. मुलगा सांगतो, माझ्याकडे माझ्या आईच्या पायाचे माप नाही, पण पायाची आकृती आहे, त्यावरून चप्पल देऊ शकाल का?
दुकानदाराला हे अजबच वाटले. दुकानदार म्हणाला,`याआधी अशी आकृती पाहून चप्पल आम्ही कधीच दिली नाही, त्यापेक्षा तुम्ही तुमच्या आईलाच का घेऊन येत नाही?'

मुलगा सांगतो, `माझी आई गावाला राहते. आजवर तिने कधीच चप्पल घातली नाही. माझ्यासाठी मात्र खूप कष्ट घेऊन तिने माझे शिक्षण पूर्ण करून दिले. आज मला माझ्या नोकरीचा पहिला पगार मिळाला आहे, त्यातून आईसाठी भेट म्हणून मी चप्पल घेणार आहे. हे ठरवूनच मी घरून निघताना आईच्या पायांची आकृती घेतली होती.' असे म्हणत मुलाने आईच्या पावलांच्या आकृतीचा कागद दुकानदाराला दिला.

दुकानदाराचे डोळे पाणावले. त्याने साधारण अंदाज घेत त्या मापाच्या चपला दिल्या आणि सोबत आणखी एक जोड घेत म्हणाला, `आईला सांगा, मुलाने आणलेला चपलेचा एक जोड खराब झाला, तर दुसऱ्या मुलाने भेट दिलेला जोड वापर, पण अनवाणी फिरू नकोस.'

हे ऐकून मुलगा भारावला. त्याने पैसे देऊन चपलांचे दोन्ही जोड घेतले आणि तो जायला निघाला. तेवढ्यात दुकानदार म्हणाला, `तुमची हरकत नसेल, तर आईच्या पायाची आकृती असलेला कागद मला द्याल का?' मुलाने प्रतिप्रश्न न करता तो कागद दुकानदाराला दिला आणि तो निघाला. 

दुकानदाराने तो कागद घेऊन आपल्या दुकानातल्या देवघरात ठेवला आणि श्रद्धापूर्वक नमस्कार केला. बाकीचे कर्मचारी अवाक झाले. त्यांनी कुतुहलाने दुकानदाराला तसे करण्यामागचे कारण विचारले. तेव्हा दुकानदार म्हणाला, `ही केवळ पावलांची आकृती नाही, तर साक्षात लक्ष्मीची पावले आहेत. ज्या माऊलीच्या संस्कारांनी या मुलाला घडवले. यशस्वी होण्याची प्रेरणा दिली. ही पावले आपल्याही दुकानाची भरभराट करतील, याची खात्री आहे. म्हणून त्यांना देवघरात स्थान दिले.'

अशा रितीने प्रत्येकाने जर आपल्या आईची किंमत ओळखली आणि तिचा योग्य सन्मान केला, तर केवळ श्रावण अमावस्याच नाही, तर प्रत्येक दिन हा मातृदिन म्हणूनच साजरा करता येईल!

Web Title: What if Lakshmi's footsteps came to your house on such a Friday? Learn to recognize her!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.