ज्याला तुम्ही शत्रू समजता, तोच तुमचा मित्र निघाला तर? वाचा ही बोधकथा!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2021 02:18 PM2021-11-29T14:18:54+5:302021-11-29T14:19:16+5:30
व्यक्त होण्याआधी परिस्थितीचा आढावा घ्या आणि या विश्वाशी मैत्रीचे नाते जोडत चला...!
जेव्हा गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाहीत तेव्हा आपण लगेच नाक मुरडून मोकळे होतो. परंतु जेव्हा खरी परिस्थिती कळते तेव्हा समोरच्या व्यक्तीला नजर देण्यासही आपण पात्र ठरत नाही. म्हणून एखाद्या गोष्टीवर पटकन प्रतिक्रिया न देता थांबून, विचार करून व्यक्त व्हा, म्हणजे पश्चताप होणार नाही आणि ज्याला शत्रू समजत होतात त्याच्याशी शत्रुत्व पण राहणार नाही.
एकदा एका खेडेगावात एक पोस्टमन होते. त्यांना जवळपास सगळी घरं परिचयाची होती. एक दिवस त्यांच्याकडे एक पार्सल आलं आणि ते पार्सल एका अनोळखी पत्त्यावर पोहोचवायचं होतं. पोस्टमन काका काम पूर्ण करायला म्हणून मजल दरमजल करत त्या पत्त्यावर पोहोचले. दुपारच्या उन्हात त्यांना घामाच्या धारा लागल्या. घशाला कोरड पडली. पोस्टांचं पार्सल देण्यासाठी ते त्या घरी पोहोचले आणि त्यांना दाराची कडी वाजवली.
आतून आवाज आला, 'कोण आहे?'
'पोस्टमनsss तुमचं पार्सल आलं आहे', पोस्टमन काका उत्तरले.
आतून परत आवाज आला, ' हो का? दारात ठेवून तुम्ही जा, मी घेते नंतर...'
पोस्टमन काकांना राग आला. एवढ्या रणरणत्या उन्हात मी दूरवर चालत पार्सल द्यायला आलो आणि घरातल्यांना दारापर्यंत यायला कष्ट लागतातेत? ते जरा रागातच म्हणाले, 'तुमच्या सही शिवाय ते देता येणार नाही. दार उघडा.'
आतून आवाज आला, 'हो का? आले आले.'
साधारण पाच मिनिटांनी दार उघडलं. एक लहान मुलगी व्हील चेअर वर बसून समोर आली आणि म्हणाली, 'काका, कुठे सही करू सांगा!'
तिला पाहून पोस्टमन काकांचे डोळे पाणावले. त्यांना वाईट वाटलं. सही घेतली पार्सल दिल आणि ते निघाले.
काही दिवसांनी पुन्हा त्याच घरी पार्सल देण्याची वेळ आली. तेव्हा पोस्ट्मन काका तिथे पोहोचले आणि दाराची कडी वाजवत सांगितले, 'पोरी दाराशी पार्सल ठेवले आहे, सावकाश ये मी थांबतो.'
मुलगी व्हील चेअर ढकलत आली. तिने स्मित हास्य करून काकांना सही दिली आणि थांबायला सांगून आत गेली. एक पार्सल बाहेर घेऊन आली व पोस्टमन काकांना देत म्हणाली, 'काका तुम्ही सगळ्यांसाठी एवढी मेहनत घेत अनवाणी फिरता हे मी गेल्या वेळेस पाहिलं म्हणून तुमच्यासाठी चपला मागवल्या, होतात का बघा बरं?'
पोस्टमन काकांना रडू कोसळलं... जिला स्वतःला पाय नाही तिने आपल्या पायांची काळजी वाहिली आणि मी मात्र माझे पाय सुरक्षित करूनही तिच्या पायांसाठी काहीच करू शकणार नाही... !
म्हणूनच व्यक्त होण्याआधी परिस्थितीचा आढावा घ्या आणि या विश्वाशी मैत्रीचे नाते जोडत चला...!