पाचशे रुपयांचा पिझ्झा खाताना होणारा आनंद आणखी कोणालाही देता आला तर?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2021 03:03 PM2021-12-16T15:03:48+5:302021-12-16T15:04:17+5:30

आपण सगळेच जण आनंदाच्या शोधात असतो. परंतु हा आनंदाचा स्त्रोत आपल्यालाच होता आले तर? वाचा ही गोष्ट!

What if the pleasure of eating a five hundred rupees pizza could be given to anyone else? | पाचशे रुपयांचा पिझ्झा खाताना होणारा आनंद आणखी कोणालाही देता आला तर?

पाचशे रुपयांचा पिझ्झा खाताना होणारा आनंद आणखी कोणालाही देता आला तर?

googlenewsNext

एक तरुण दाम्पत्य छान सुखी जीवन जगत होते. त्यांच्याकडे एक मोलकरीण कामाला होती. कोणत्यातरी उत्सवाच्या निमित्ताने ती गावाला जाणार होती. यानिमित्ताने तिला हातखर्चाला पाचशे रुपए द्यावे असे तरुणीला वाटले. तिने हा प्रस्ताव नवऱ्यासमोर मांडला. त्याने रुक्षपणे प्रस्ताव झिडकारला. वरून म्हणाला, 'अशा सवयी लावून ठेवू नको. तिला दर वेळी पैसे मिळतील अशी आशा वाटत राहिल.'

तरुणी म्हणाली, `ती कधीतरीच गावी जाते. त्यात आनंदाचे वातावरण असणार आहे. म्हणून छोटीशी मदत द्यावे असे मला वाटले. तसाही आपण पाचशे रुपयांचा पिझ्झा खातो, मग पाचशे रुपयांची मदत करायला काय हरकत आहे?'

बायकोचा तर्कवाद त्याने मूकसंमती दिली. तरुणीने मोलकरणीला पाचशे रुपए दिले. ती आनंदाने उत्सवासाठी गावाला गेली आणि चार दिवसांनी परतली. 
ती परतल्यावर तरुणाने औपचारिकता म्हणून तिला विचारले, 'कसा झाला उत्सव?'

ती उत्साहाने म्हणाली, 'खूप छान झाला. ताईंनी पाचशे रुपये दिले त्यामुळे तर आणखी छान आनंद साजरा करता आला.'
तरुणाने कुतुहल म्हणून विचारले, `पाचशे रुपयात एवढा काय आनंद साजरा केलात?'
मोलकरीण म्हणाली, `नातीसाठी दीडशे रुपयाचा एक फ्रॉक घेतला. चाळीस रुपयांची बाहुली घेतली, पन्नास रुपये प्रवासभाड्यात गेले. साठ रुपयांची पूर्ण घरासाठी मिठाई घेतली. मुलीसाठी पंचवीस रुपयांच्या बांगड्या घेतल्या. जावयासाठी पन्नास रुपयांचे पैशाचे पाकीट घेतले. उत्सव होता म्हणून पन्नास रुपये दान केले. बाकी उरलेले पैसे नातीच्या शालेय वह्या पुस्तकांसाठी म्हणून मुलीच्या हाती देऊन आले.'

हे सगळे ऐकून झाल्यावर तरुण आश्चर्यचकित झाला. पाचशे रुपयांच्या पिझ्झाचे आठ तुकडे येतात. खाऊन पोट भरते. पण मन भरतेच असे नाही. मात्र याच पाचशे रुपयांत आपल्या मोलकरणीने स्वत:सकट कितीतरी जणांना पोटभर आनंद दिला. त्याला बायकोच्या निर्णयाचे कौतुक वाटले आणि त्याने खुल्या दिलाने मोलकरणीचेही कौतुक केले.

मित्रांनो, आपण आपल्या कपड्यांवर, जंक फूडवर , हॉटेलिंगवर अमाप पैसे खर्च करतो. मात्र, जेव्हा कोणाला आर्थिक मदत करण्याची वेळ येते, तेव्हा आपण संभ्रमात पडतो. पार्टीमध्ये सहज खर्च होणारे पाचशे रुपए एखाद्या गरजवंताला देताना आपण हात आखडता घेतो. पण जसा आपण आपला आनंद शोधतो, तसा दुसऱ्यांना आनंद देण्याचाही आपण प्रयत्न केला पाहिजे. जेव्हा, जशी मदत करता येईल तशी मदत करत राहा. आनंद वाटा, आनंद नक्की मिळेल. तुम्हालाही आणि इतरांनाही!

Web Title: What if the pleasure of eating a five hundred rupees pizza could be given to anyone else?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.